सामान्य मराठी शिवसैनिकाला उमेदवारी द्या! …अन्यथा मी निवडणूक लढण्यास सज्ज!

शिवसेनेचे वर्सोवा मतदार संघाचे संघटक व लीगल सेलचे समन्वयक
ऍड. अनिल दळवी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

मुंबई (प्रतिनिधी):- मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अमोल गजानन कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर झाली असताना युतीतर्फे अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे अभिनेता गोविंदा बाळासाहेबांच्या शिवसेनेत सक्रिय झाले आहेत; तर काँग्रेसचे नेते संजय निरुपम भाजपात जाण्याची शक्यता आहे. बाळासाहेब शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आपल्याच नेत्याविरुद्ध विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांच्याविरुद्ध जोरदार आघाडी उघडली आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेत राहून विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर आपल्या मुलाला सहकार्य करतील; असा रामदास कदम यांचा आरोप आहे. एवढेच नव्हेतर रामदास कदम यांनी आपल्या बाजूला संघटनेतील बहुतेक पदाधिकाऱ्यांना वळविले आहे. त्यामुळे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांची भूमिका नरमाईची असून ह्या मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अमोल गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात उमेदवार अद्याप निश्चित होत नाही; हे वास्तव आहे.

ह्या सर्व घडामोडींचा परिणाम बाळासाहेब शिवसेनेवर होत असून सर्वसामान्य शिवसैनिक निराश झाला आहे. म्हणून बाळासाहेब शिवसेनेचे वर्सोवा मतदार संघाचे संघटक व लीगल सेलचे समन्वयक ऍड. अनिल दळवी यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया सर्वसामान्य शिवसैनिकांना दिलासा देणारी आहे. ह्या मतदार संघात जर सर्वसामान्य निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी मिळाल्यास तो निवडून येईल; हा आशावाद निश्चितच शिवसैनिकांना प्रेरणादायी आहे.

“मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडे सक्षम उमेदवार नसल्याच्या बातम्या पसरून संघटनेच्या नेत्यांचे, शिवसैनिकांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा विरोधकांचा व प्रसार माध्यमांचा डाव दिसतो. त्यामुळे हा मतदारसंघ युतीतील इतर राजकीय पक्षांना द्यावा, असे दावे करण्यात येत आहेत. ह्या घटनांमुळे शिवसैनिक म्हणून आम्ही व्यथित आहोत. अडीच लाखापेक्षा अधिक मताधिक्य घेऊन जिंकलेला मतदार संघ युतीतील इतर राजकीय पक्षांना न देता त्या ठिकाणी सामान्य मराठी शिवसैनिकाला उमेदवार म्हणून घोषित करावे! आम्ही सर्वजण आपल्या नेतृत्वाखाली सामन्यातील सामान्य शिवसैनिकाला खासदार म्हणून निवडून आणू; याची हमी आम्ही आपणास देतो. तसेच आपण सामान्य शिवसैनिकाला – मराठी माणसाला निवडून आणून देऊ शकता व शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करू शकता; हे सिद्ध होईल! जर कोणी उमेदवारी घेण्यास तयार नसतील तर आपल्या आदेशाने व आपल्या नेतृत्वाखाली – कुशल मार्गदर्शनाखाली एक मराठी माणूस आणि सामान्य शिवसैनिक म्हणून मी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यास आणि निवडून येण्यास सज्ज आहे!” अशी जाहीर मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे वर्सोवा मतदार संघाचे संघटक व लीगल सेलचे समन्वयक ऍडव्होकेट अनिल दळवी यांनी केली आहे.

सामान्य मराठी शिवसैनिकाला उमेदवारी मिळाल्यास शिवसेनेच्या शिंदे गटाचा उमेदवार नक्कीच निवडून येईल; अशी भावना आमच्या प्रतिनिधीकडे अनेक शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे ऍड. अनिल दळवी हे शिवसेनेत गेली तीस वर्षे कार्यरत असून त्यांच्या ह्या मतदार संघात दांडगा संपर्क आहे. ह्या मतदार संघात त्यांनी मतदारांची मूलभूत नागरीसेवेची केलेली असंख्य कामे आहेत. एक सुशिक्षित, निष्ठावंत, मराठी उमेदवार म्हणून ऍड. अनिल दळवी यांना मतदार पसंती देऊ शकतो; असे मत जाणत्या राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.