वैद्यकीय व सामाजिक सेवेचा शुभारंभ करण्यापूर्वी सदिच्छा भेट!

डॉ. सानिका मुग्धा मोहन सावंत यांनी महाराष्ट्राच्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या,
जेष्ठ विधिज्ञ निर्मलाताई सामंत – प्रभावळकर यांची सदिच्छा भेट घेऊन घेतले आशीर्वाद!

डॉ. सानिका मुग्धा मोहन सावंत यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम. एस. (Master of Surgery) ची वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली असून आपल्या वैद्यकीय व सामाजिक सेवेचा शुभारंभ करण्यापूर्वी त्यांनी मुंबईत महाराष्ट्राच्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जेष्ठ विधिज्ञ निर्मलाताई सामंत – प्रभावळकर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

मुंबईच्या माजी महापौर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या, तळागाळातील गरीब कष्टकरी जनतेचे प्रश्न जाणणाऱ्या सामाजिक आणि धडाडीच्या नेत्या विधिज्ञ निर्मला सामंत-प्रभावळकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन डॉ. सानिका मुग्धा मोहन सावंत यांनी सामाजिक कार्यासाठी मार्गदर्शन घेतले. त्यावेळी निर्मलाताईंनी डॉ. सानिका सावंत यांना आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. त्यावेळी डॉ. सानिका यांचे वडील मोहन सावंत उपस्थित होते.

राजकारणामध्ये प्रामाणिक, कार्यक्षम आणि विश्वासू नेतृत्व म्हणून विधिज्ञ निर्मला सामंत-प्रभावळकर यांची ओळख आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या १९९४ साली मुंबईच्या महापौर झाल्या. पेशानं वकील असलेल्या निर्मला सामंत-प्रभावळकर यांची ओळख सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जाण असणाऱ्या महापौर अशी होती. कुशाग्र बुद्धिवादी असलेल्या- सामान्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या विधिज्ञ निर्मलाताई प्रभावळकर राजकारणात असूनही खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांना नागरी समस्यांचा चांगला अभ्यास आहे. महिलांचे प्रश्न त्यांनी चांगल्या पद्धतीने मांडलेत. राजकीय कार्य असो वा सामाजिक कार्य; सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या काम करतात; अशी त्यांची ख्याती आहे.

अशा आदर्शवादी व्यक्तिमत्वाचे आशीर्वाद घेऊन वैद्यकीय व सामाजिक कार्याचा शुभारंभ करण्यासाठी डॉ. सानिका सावंत यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी डॉ. सानिका सावंत यांच्याशी निर्मलाताईंनी संवाद साधत अनेक विषयावर मार्गदर्शन केले. “आई वडिलांच्या सुसंस्काराने तू घडली आहेस. शासकीय सेवेत राहून सामाजिक बांधिलकी कशी जोपासता येते? हे तुझ्या वडिलांनी दाखवून दिले आहे. शिक्षिका असणाऱ्या आईने तुला सुसंस्कार दिले. त्यासाठी आईवडिलांनी खूप काबाडकष्ट केले आहेत. ही जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकी स्वीकारण्यास आता तू सज्ज झालेली आहेस. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव असतील.” असे उदगार विधिज्ञ निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी डॉ. सानिका यांच्याशी बोलताना काढले आणि डॉ. सानिकाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. सानिका मुग्धा मोहन सावंत अखिल भारतीय आयुर्वेद पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत संपूर्ण भारतातून ७६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. वडील मोहन सावंत शासकीय निवृत्त वरिष्ठ लिपिक आणि आई मुग्धा सावंत निवृत्त शिक्षिका यांच्या मार्गदर्शनातून आणि परमपूज्य सद्गुरु अनिरुद्ध बापूंच्या कृपेतून डॉ. सानिका यांनी मिळविलेले सुयश खरोखरच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे!

श्री. मोहन सावंत (पटेल सावंत) यांचे मुळ गाव कणकवली तालुक्यातील फोंडाघाट (गांगोचीवाडी) तर त्यांचे घर सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथे आहे. त्यांचे बालपण दादर येथील जुनी शिंदेवाडी अर्थात आताची शिवनेरी येथे गेले. ते शासकीय सेवेतून निवृत्त झाले असून त्यांनी राज्य कामगार विमा योजना रुग्णालय (महाराष्ट्र शासन), मंत्रालय, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, राज्य निवडणूक आयोग अशा विविध विभागात सेवा बजावली. त्याचप्रमाणे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचे स्वीय सहाय्य्क म्हणूनही अनेक वर्षे जबाबदारी स्वीकारली. सेवानिवृत्तीनंतर ते विविध सेवाभावी सामाजिक व आध्यात्मिक संस्थांमध्ये कार्यरत असून पाक्षिक `स्टार वृत्त’चे सहसंपादक म्हणून काम पाहतात.

भविष्यात डॉ. सानिका समाजातील दुर्लक्षित घटकांची सेवा करण्यासाठी उपलब्ध असतील. त्यासाठी आवश्यक असणारे सुसंस्कार त्यांना आई-वडिलांनी दिले आहेत. समाजहितासाठी विधायक विचारांची बैठक आणि त्या विचारांच्या अधिष्ठानातून नियोजनबद्ध कृती आवश्यक असते आणि असे कार्य मोहन सावंत नियमित करीत असतात. त्यांच्याच प्रेरणेने आणि शिस्तबद्ध आईच्या सहवासात डॉ. सानिका यांनी आपल्या ध्येय पूर्ततेची अंतिम पायरी गाठली आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा! वैद्यकीय सेवेचे खूप मोठे कार्य घडण्यासाठी डॉ. सानिका यांना सामर्थ्य मिळावे; ही आदिमाता आणि सद्र्गुरु चरणी प्रार्थना!

-सिद्धी हडकर