पुनर्भेटीचा आनंद!
आम्ही इ. एस. आय. एस. चे ६५ ते ८२ वयाचे निवृत्त सहकारी गेली पाच वर्षे भेटतोय! गमतीजमती करतो, गाणी गातो, मजेशीर खेळ खेळतो, एकमेकांसोबत फोटो काढतो, दिवसभर धमाल करतो!
दिनांक ०७ मार्च,२०२५ रोजी एमआयजी क्लब, वांद्रे येथे आम्ही पुन्हा एकदा भेटलो. यासाठी गोवा, कणकवली, पुणे, तळेगाव,पाली असे विविध ठिकाणांहून आलेले १०९ सहकारी सहभागी झाले. हॉलच्या प्रवेशद्वारातच गुलाबाचे फुल देऊन प्रत्येकाचे स्वागत केले गेले आणि तिथूनच एकमेकांना आलिंगन देत भेटीला सुरूवात झाली.
प्रथम दिवंगत सहकारी यांचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
दुसऱ्या दिवशीच्या महिला दिनाचे औचित्य साधून जेष्ठ महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले व एक सुंदर भेटवस्तू देऊन उपस्थित सर्व महिलांचा गौरव करण्यात आला.
“तु बुध्दी दे…तु तेज दे….. नवचेतना विश्वास दे” हे प्रार्थना गीत सर्वांनी एकत्र गाऊन उत्साहवर्धक वातावरण निर्माण केले.
आजचा स्नेहमेळावा उत्तम पार पडावा म्हणून सुरूवातीलाच श्री. मोहन सावंत यांनी मालवणीत गाऱ्हाणे घातले व कार्यक्रमाची सुरुवात केली. स्नेहमेळाव्याच्या दिवशी व त्यांच्या आसपास दिवशी ज्यांचे वाढदिवस होते त्यांनी आणि ७५ वर्षापुढील सर्व सहकाऱ्यांनी एकमेकांना केक भरून आपला वाढदिवस साजरा केला.
`हे नुसतं भेटणं नव्हे. या भेटण्यात ज्यांच्या सोबत वर्षोनुवर्षे काम केले त्यांचं त्यांच्या सोबत एक वेगळा दिवस जगून बघण्यातील मजा अनुभवणे होते. सगळ्यांना आनंद वाटेल असं ‘अधिक काहीतरी’ करणं हाच या स्नेहमेळावाचा मुख्य उद्देश आहे!’ असं मायकल परेरा यांनी प्रास्ताविकात विशद केले.
`आपल्या निवृत्त सहकाऱ्यांची एक झलक सुध्दा आनंददायी असते. यांच्या दर्शनाने वा सोबतीने एक वेगळा आनंद मिळतो म्हणून असेच भेटत राहू या!’ असे श्री रवी पाटील यांनी मनोगतात सांगितले.
`तसे तर आपण आपल्यासाठी असतोच; पण आपलं ‘असणं’ जितकं महत्त्वाचं असतं तेवढंच आपलं ‘हसणं’ महत्वाचं आहे. त्यासाठी असं भेटणं गरजेचं आहे. भेटत राहा, हसत राहा व इतरांना हसवा!’ असे डॉ. हेमंत भारती यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
`आयुष्यातले काही क्षण आपल्यासाठी नेहमीच स्पेशल असतात म्हणून प्रत्येक क्षण समाधानाने, आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. गेली पाच वर्षे आयोजक अशा कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्याला आनंद देत आहेत. माझा सदैव अशा आयोजनाला पाठिंबा आहे. हे भेटणे असेच सूरू राहावे!’ अशा भावना डॉ. श्रीकृष्ण पवार यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या.
श्री. प्रकाश देवदेशमुख व श्रीमती सु.पा.पंडीत यांनी एक उत्कृष्ट व दर्जेदार स्नेहमेळावा आयोजित केल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद व शुभेच्छा दिल्या.
जागृती घरत, माधुरी परेरा, शुभदा राऊत, किशोर पांडे, दिव्या शहा, आशा करवीर व मायकल परेरा या सर्वांनी आनंदी जगण्यासाठी प्रवृत्त करणारे Motivational अनुभव स्वरचित चारोळीतून सादर केले.
गमतीशीर प्रश्नोत्तराचे खेळही खेळले गेले. श्री किशोर पांडे व विश्वनाथ सावंत या दोघांनी या गमतीशीर खेळांचे खुमासदार सुत्रसंचालन करून या खेळांची रंगत वाढवली.
शालिनी पाटील व स्नेहलता वतने यांनी मजेशीर आठवण सांगून हसवले. रत्नप्रभा तेंडुलकर यांनी एक थरारक अनुभव कथन केला. श्री. विनियक देशमुख, श्याम गीध, मोहन देसाई, श्रध्दा तेंडुलकर यांनी गाणी म्हटली .
गुणवंत कामगार-राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमती श्रद्धा तेंडुलकर ह्यांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी सेल्फी पॉईंटचीही व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांनी आपापल्या मित्र मैत्रिणींसह सेल्फी घेण्याची हौस पुरवली. ग्रुप फोटोही काढले. नेहमीप्रमाणे स्नेह भोजनाची व्यवस्था केली होती. त्याचा सर्वांनी आस्वाद घेतला.
आपले वय, वेदना, दुखणे विसरून आजही आपण नाचू शकतो हे सर्वांनी नाचात भाग घेऊन दाखवून दिले.
“काठी न घोंगड घेऊ द्या की रं” या पारंपरिक लोक गीतावर उत्कृष्ट नृत्य आविष्कार सादर करीत श्री. मोहन सावंत यांनी उपस्थितांची मनं जिंकली. वयाच्या सत्तरीत सुद्धा प्रचंड उत्साहात आणि आनंदाने श्री. मोहन सावंत यांनी केलेले नृत्य आम्हा उपस्थितांना नवीन उमेद देऊन गेले. काय तो आनंद, काय ती ऊर्जा, काय ते समाधान! हे सगळं कसं सहजपणे जीवनात आणायचं ते एका नृत्यातून मोहन सावंत यांनी दाखवून दिले. एवढंच नाहीतर त्यातून त्यांनी आनंदी जीवनाचा उपस्थितांना मंत्र दिला!
स्नेहमेळाव्याचे उत्तम नियोजनाबरोबर, श्री संतोष देसाई व रविंद्र चव्हाण यांनी स्नेहमेळाव्याचे आर्थिक व्यवस्थापन उत्तम करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. हा स्नेहमेळावा आपलाच आहे ही भावना जपणारे सर्व सहकारी तसेच हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल मान. ॲड. श्री. सुजीत चव्हाण, एमआयजी क्लबचे सेक्रेटरी सन्मा. श्री.श्रीकांत शेट्टी,आपले हितचिंतक व मार्गदर्शक डॉ. माया वानखेडे व सुधीर हडकर, `स्टार वृत्त’चे संपादक मान. श्री. नरेंद्र हडकर यांच्या सततच्या पाठिंबा दिल्याबद्दल श्री. विश्वनाथ सावंत यांनी या सर्वांचे आभार मानले. उत्कृष्ट बॅनर तयार करून दिल्याबद्दल श्री. नितीन शेट्टी यांचेही आभार मानण्यात आले.
‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्य गीत सर्वांनी एकत्र गाऊन कार्यक्रमाची अभिमानास्पद वातावरणात सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विश्वनाथ सावंत यांनी उत्तमरित्या केले व हा स्नेहमेळावा आणखी यादगार केला. `पुन्हा भेटू या’ म्हणत सर्वजण परतीच्या वाटेने गेले; पण जाताना मागे वळून वळून एकमेकांना निरोप देत होते.
-मायकल परेरा