वायु प्रदूषणामुळे दरवर्षी ७० लाख लोक मृत्युमुखी! -WHO
जगातील ९० टक्के नागरिकांना घ्यावा लागतोय प्रदूषित श्वास!
वायु प्रदूषणामुळे दरवर्षी ७० लाख लोक मृत्युमुखी! -जागतिक आरोग्य संघटना
मुंबई:- मोठ्या प्रमाणावर औद्योगिक प्रगती आणि पर्यावरणाचा ऱ्हास ह्यामुळे वायू प्रदूषणाची समस्या जगामध्ये अतिशय गंभीर झाली असून वाढत्या वायू प्रदूषणामुळे जगातील ९० टक्के नागरिकांचा श्वास प्रदूषित झाला आहे, असा खळबळजनक अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने पूर्वीच दिला असून दरवर्षी ७० लाख लोक प्रदूषित हवेचे शिकार होतात.
शहरांमध्ये वायू प्रदूषणाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहेच; शिवाय ग्रामीण भागातील हवाही अनेक कारणांनी प्रदूषित होत आहे. जगातील ९२ टक्के जनता ही अत्यंत खराब वायू प्रदूषण असलेल्या भागात राहते. जागतिक आरोग्य संघटनेने निकषांपेक्षाही या भागातील प्रदूषण अधिक आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांनी भागणारे नाही. रस्त्यावर वाहनांची संख्या, कचरा व्यवस्थापनात सुधारणा आणि भोजनासाठी स्वच्छ इंधन पुरवणे गरजेचे आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे.
वायू प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी ६ लाख तर बांगलादेशात ३७ हजार जणांना प्राणाला मुकावे लागेल, असा इशारा संघटनेने दिला होता. त्यासाठी जगातील तीन हजार ठिकाणचा अभ्यास करण्यात आला होता.