महाराष्ट्रात यंदा ३० हजार कोटींचा निधी केवळ रस्ते विकासासाठी
राज्यात रस्ते विकासाचा भरीव कार्यक्रम
आळते येथे पेयजल योजनेसह पूल व रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
कोल्हापूर:- राज्यात रस्ते विकासाचा भरीव कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून यंदा राज्य शासनाने ३० हजार कोटींचा निधी केवळ रस्ते विकासासाठी उपलब्ध करुन देऊन राज्यात रस्ते विकासाचे जाळे निर्माण करण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी क!! आळते येथे बोलताना केली.
हातकणंगले तालुक्यातील क!! आळते येथे ६ कोटी ३८ लाख रुपये खर्चाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेचा आणि नाबार्ड योजनेंतर्गत १ कोटी ४३ लाख रुपये खर्चाच्या भीमनगर ते क!! आळते ओढ्यावरील पूल बांधणी व रस्त्याच्या कामाचा शुभारंभप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सुरेश हाळवणकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. सुजित मिणचेकर, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक , माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा परिषदेचे जेष्ठ सदस्य अरुण इंगवले आदि उपस्थित होते.
राज्यातील जनतेला रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य अशा पायाभूत सुविधा देण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले की, राज्याला गेल्यावर्षी रस्ते विकासासाठी १७ हजार कोटीचं बजेट होतं यामध्ये वाढ करुन यंदा ३० हजार कोटी रुपये करण्यात आले आहे. याशिवाय केंद्र शासनाकडून १ लाख ६ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य आणून त्यामधून गेल्या चार वर्षात २२ हजार किलोमिटर्सचे सिमेंट क्राँक्रिटचे चार पदरी रस्ते करण्याचा क्रांतीकारी उपक्रम शासनाने हाती घेतला आहे. त्यामुळे येत्या मार्चनंतर रस्त्यांची बहुतांशी कामे पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गेल्या साडेचार वर्षात राज्यातील जनतेच्या गरजा पूर्ण करण्यास प्राधान्य देऊन निश्चित दिशेने शासनाने काम केले. आरोग्य स्वच्छतेत महाराष्ट्राचे काम देशात उल्लेखणीय झाले आहे. घराघरात शौचालय निर्माण करुन संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुकत केला आहे. आरोग्यामध्ये तर आयुष्यमान भारत योजनेसारख्या क्रांतीकारी योजनानी फार मोठी मदत केली आहे. जगातील सर्वात मोठी योजना म्हणून आज आयुष्यमान भारत योजनेकडे पाहिले जात आहे. देशातील १० कोटी कुटुंबातील ५० कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचेही ते म्हणाले.
जिल्हा परिषदेचे जेष्ठ सदस्य अरुण इंगवले यांनी या परिसरात विकास कामांचा डोंगर उभा केला असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, श्री. इंगवले यांच्या कामांची दखल घेऊन त्यांना लवकरच मोठया पदाची संधी उपलब्ध करुन दिली जाईल. त्यांनी या परिसराचा विकास कामाच्या माध्यमातून कायापालट केला असून पाणीपुरवठा तसेच रस्ते तसेच पुलाच्या उभारणीमुळे या परिसराला विकासाची मोठ संधी मिळत असल्याचेही ते म्हणाले.
याप्रसंगी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, यांच्यासह अनेक मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी जिल्हा परिषदेचे जेष्ठ सदस्य अरुण इंगवले यांनी स्वागत करुन आळते आणि परिसरात केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. सरपंच सविता कांबळे यांनी पाहुण्याचा सत्कार केला तर उपसरपंच सुदाम चव्हाण यांनी आभार मानले.