आमच्याकडे असलेली संसाधने वापरण्यासाठीही परमात्म्याचे सहाय्य लागते!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक दुसरा
मी तुम्हांसी सहाय्य करीन निश्चित।
मात्र माझे मार्ग त्रि-नाथांसीच ज्ञात॥
या दुसऱ्या वचनात स्वयंभगवान त्रिविक्रम अनिरुद्ध सांगतात की, मी निश्चितपणे तुम्हाला सहाय्य करेन. आम्हाला दिसो न दिसो , कळो न कळो ; पण त्याचे सहाय्य प्रत्येक दिवशी २४ तास निश्चितपणे मिळत असतेच.
या ‘निश्चित’ सहाय्यावर ज्याचा ठाम विश्वास; तोच ‘निश्चिंत’ राहू शकतो.
‘सहाय्य’ म्हणजे काय? माझ्या मानवी मर्यादांच्या पलीकडे जाऊन एखादे संकट, समस्या असेल तेव्हा ‘त्याची’ मदत मिळतेच. असे ‘अनुभव’ प्रत्येक श्रद्धावानाला येतातच आणि त्याची भक्ती दृढ होत जाते. पण एक गोष्ट आम्ही विसरतो की, आमच्याकडे असलेली संसाधने वापरता येण्यासाठीही त्याचेच सहाय्य लागते. माझ्याकडे बुद्धी असूनही मी फसू शकतो, पैसे असूनही कार्ड हरवल्यामुळे ते काढू शकत नाही; अशा असंख्य गोष्टी…
महाभारतात आम्ही बघतो. कर्णाला ब्रह्मास्त्र ज्ञात होते. पण जेव्हा सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा उपयोग झाला नाही. का ? कारण भगवंताचे सहाय्य नव्हते. म्हणजे ‘या’चे सहाय्य प्रत्येक क्षणी किती आवश्यक आहे हे लक्षात ठेवायला हवे.
हे सहाय्य करण्याचे `त्याचे’ मार्ग मात्र मानवी आकलनाच्या पलीकडील आहेत. ते फक्त त्रिनाथांनाच ज्ञात आहेत.
बायबलमधे एक वचन आहे. परमेश्वर म्हणतो, ”माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहे.”(यशया 55:8,9)
दाविदानेही सर्वसमर्थ देवाच्या उद्देशापुढे व अमर्याद ज्ञानापुढे वंदन केले व म्हटले, “माझे मन गर्विष्ठ नाही, माझी दृष्टी उन्मत्त नाही. मोठमोठ्या व मला असाध्य गोष्टीत मी पडत नाही” (स्तोत्र १३१:१). महान व अद्भुत गोष्टी म्हणजे देवाचे गुप्त हेतू. आणि ते सफळ करण्याची त्याची अमर्याद साधने. ती समजून घेण्याची दाविदाने कसरत केली नाही. तर तो देवाच्या अधीन राहिला. देवावर भरवसा ठेवून शांत राहिला. देवावर भरवसा ठेवावा, त्याची शांती प्राप्त करावी.
श्रीसाई सच्चरित्रात आपण पाहतो; जेव्हा साईनाथांना भक्ताला ‘आध्यात्मिक उपदेश’ हे सहाय्य करायचे आहे – राधाबाई देशमुख बाईंना ते वेगळ्या मार्गाने करतात, नानासाहेब चांदोरकरांना गीता श्लोकाच्या माध्यमातून वेगळ्या मार्गाने करतात, माधवरावांना विष्णुसहस्त्रनाम देऊन वेगळ्या मार्गाने करतात आणि दासगणूंना काकांच्या मोलकरणीकडून वेगळ्या मार्गाने करतात. असे का ? ‘त्या’लाच माहित! तो एकमेवच कर्तुम् अकर्तुम् अन्यथा कर्तुम् अशी लीला करण्यास समर्थ आहे. एक फार छान सुभाषित आहे
कर्तुमकर्तुं शक्त: सकलं जगदेतदन्यथा कर्तुम् |
यस्तं विहाय रामं, कामं मा धेहि मानसमन्यस्मिन् ||
अर्थ – अखिल जगतात कर्तुम् अकर्तुम् अन्यथा कर्तुम् अशी लीला करण्यास समर्थ अशा श्रीरामांना सोडून अन्य कशातही इच्छा ठेवू नकोस.
आम्हाला त्याचे मार्ग कळण्याची गरज नाही. ‘ निश्चित सहाय्य ‘ करणारा ‘त्या’चा अदृश्य हात दिसायला हवा आणि मुखात ‘ अंबज्ञ ‘ यायला हवे ! बस्स !
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्
(क्रमश:)
– डाॅ आनंदसिंह बर्वे
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पहिला