अर्पिता मुंबरकर महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने सन्मानित
कणकवली- गोपुरी आश्रमाच्या संचालक, `नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई’च्या जिल्हा संघटक, मिठमुंबरी ता.देवगड येथील पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा, मिळून साऱ्याजणी मासिकाच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी अर्पिर्ता मुंबरकर यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणारा सन २०१८-१९ या वर्षाचा ‘महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ चंद्रपूर येथे एका विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे दारूबंदी खात्याचे मंत्री मा. राजकुमार बडोले यांच्या हस्ते व महाराष्ट्रातील जेष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग व डॉ.राणी बंग, जेष्ठ अभिनेत्री निशीगंधा वाड यांच्या उपस्थितीत चंद्रपूर येथे देण्यात आला.
अर्पिता मुंबरकर यांनी वयाच्या १६ व्या वर्षांपासून समाजकार्याची सुरुवात पूणे येथील कुष्टरूग्ण सेवेपासून केली. त्यानंतर गागोदे ता.पेण येथील विनोबा भावे यांच्या आश्रमात काही काळ वास्तव्यानंतर रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आदिवासी मुकबधीर मुलांच्या शाळेची शिक्षिका, पनवेल येथील शांतीवन संस्थेच्या ग्रामीण विकास प्रकल्पातील आदिवासी बालकांच्या शिक्षणाचे कार्य आणि त्यानंतर कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रमातील वास्तव आणि कामातील सहभाग, महिला बचत गटांना व्यावसायिक पातळीवर मानसिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठीचा प्रयत्न ते याच महिला वर्गांच्या कुटूंबातील व्यसनांच्या प्रश्नावर कार्य… असा अर्पिता मुंबरकर यांच्या समाजकार्याचा प्रवास थक्क करणारा आहे. महाराष्ट्र शासनाने अर्पिता मुंबरकर यांचा केलेला गौरव त्यांच्या कार्याला सार्थक आणि प्रोत्साहन देणारा आहे.
अर्पिता मुंबरकर या सातत्याने व्यसन मुक्तीविषयी प्रबोधन करत असतातच. त्याचबरोबर महिला सक्षमिकरणाच्या उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. पंचायतराजमधील महिला वर्ग नेतृत्व म्हणून सक्षम व्हावा म्हणून त्या मुंबईच्या डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्टच्यावतीने सातत्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला वर्गासाठी प्रशिक्षणे आयोजित करतात. बचत गटाच्या महिला व्यावसायिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात; यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. युवाई मानसिक दृष्टीने सक्षम व्हावी; याकरिता त्यांच्यासाठी वाचन संस्कृती व व्यक्तीमत्व विकास शिबिरांचे आयोजन व व्यसन मुक्तीसंदर्भात मार्गदर्शन, महिला वर्गासाठी मिळून साऱ्याजणी मासिकाच्यावतीने विविध उपक्रम अशा वेगवेगळ्या समाजकार्यात सातत्याने सहभाग असतो.
या पुरस्काराविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना अर्पिता मुंबरकर म्हणाल्या की, या पुरस्कारामुळे जबाबदारी अधिक वाढली आहे. महिला वर्गावर व्यसनांमुळे होणारे अत्याचार- हिंसाचार जेव्हा थांबतील, व्यसनाधिन कुटूंबे व्यसनमुक्त होऊन सूखी आनंदी जीवन जगू लागतील; तेव्हाच हा पुरस्कार घेतल्याचे समाधान होईल! या पुढच्या काळात या कार्यासाठी जिल्ह्यातील व्यसनमुक्तीमध्ये कार्य करण्याची आवड असलेल्या शासकीय तसेच निमशासकीय व सर्व स्तरातील आपण सर्वजण मिळून प्रयत्न केल्यास सिंधुदुर्ग जिल्हा व्यसन मुक्तीच्या दिशेने वाटचाल करेल. विशेषतः युवा वर्गावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, गावागावातील महिला, सखी मंच-कणकवली, माझ्या मिठमुंबरी ता.देवगड, गावातील सर्व नागरीक महिला, जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, तसेच गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र मुंबरकर, जेष्ठ सर्वोदयी विचारवंत, आदरणिय जयवंत मटकर या सर्वांची साथ आणि प्रेरणा मिळाली. यामुळे मी या पुरस्काराची मानकरी होऊ शकले. अशी प्रतिक्रिया अर्पिता मुंबरकर यांनी व्यक्त केली.











