उतू नका मातू नका… मतदारांचा निर्णायक कौल!
लोकशाहीमध्ये अंतिमतः मतदार हाच राजा असतो. तो ठरवतो प्रत्येक पक्षाची आणि प्रत्येक उमेदवाराची पात्रता. ही पात्रता टिकून ठेवण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी राजकारण्यांना विविध प्रकारे कार्य करावे लागते. मतदारांचा कौल मात्र नेहमी सर्व अंदाज-आखाडे चुकवत अनेक मुद्दे पुढे आणत असतो. आजच महाराष्ट्र विधानसभेचे निकाल जाहीर झाले आणि मतदाराने राज्यकर्त्यांना आणि विरोधी पक्षांना ठामपणे संदेश दिला; उतू नका मातू नका… जबाबदारीने कार्य करण्याचा वसा टाकू नका! महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल सत्ताधाऱ्यांना ताकीद देणारा आहे. तसेच विरोधकांना सत्तेसाठी अजूनही अपात्र ठरविणारा आहे.
सत्ताधाऱ्यांनी विकासाचे अनेक योजना आणल्या, परंतु प्रत्यक्षात विकास मतदारांपर्यंत पोचला का? त्यातून जनतेचं किती भलं झालं? जनता त्यावर समाधानी आहे का? यासंदर्भात जनतेने दिलेला कौल खरोखरच सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणणार आहे. सत्ताधाऱ्यांनी आपल्या परीने अनेक योजना आणल्या व त्याच्या मोठ्या प्रमाणावर जाहिराती केल्या. पण महापुरामध्ये कागदावरचा विकास टिकला नाही. सर्वसामान्य जनतेला काय हवे आहे? सर्वसामान्य जनता ही शासनाकडून कोणत्या अपेक्षा ठेवते? याचे भान येण्यासाठी सत्ताधाऱ्यांना अजून पाच वर्ष मिळणार आहेत. त्या संधीचा फायदा त्यांनी घेतला नाही तर मतदार शहाणे आहेत.
मागील पाच वर्षांमध्ये विरोधक संपूर्णपणे नामशेष कसा होईल? याची काळजी सत्ताधाऱ्यांनी घेतली. शेवटच्या वर्षामध्ये विधानसभेचा विरोधी पक्षनेता आपल्या पक्षात आणला. अनेक आयाराम पक्षात आणून पावन करून घेतले. मतदार विसरभोळा असतो; अशी समजूत जणूकाही राज्यकर्त्यांनी करून घेतली आणि ईडीच्या चौकशीला घाबरणारे व सत्तेची लालसा असणारे आयाराम जमा होत गेले. भारतीय जनता पक्ष हा विश्वातला सर्वात मोठा पक्ष जणूकाही समुद्र हो! पवित्र नद्या समुद्रात मिळतात; त्याचप्रमाणे मोठी `गटारं’ सुद्धा समुद्रात विलीन झालेली दिसली. ही गोष्ट मतदारांना खटकली म्हणून अनेक ठिकाणी आयारामांचा पराभव झालेला आहे. पाच वर्षांपूर्वीची १२२ ही संख्या टिकवताना भाजपाला नाकीनव आले तर ६३ पर्यंत पोचताना शिवसेनेला दम लागला. शिवसेनेचे १०० जागांचे तर भाजपचे १५० जागा मिळविण्याचे स्वप्न मतदारांनी प्रत्यक्षात उतरविले नाही.
गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे १९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्याचप्रमाणे ३७,००० बालके जन्माला येण्यापूर्वी आणि जन्माला आल्यानंतर काही महिन्यातच गतप्राण झाली. देशामध्ये मंदीची लाट आहे, त्याचा फटका राज्यालाही बसला. उद्योगधंदे ठप्प झाले. त्यामुळे रोजगार बुडाला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. ओला दुष्काळ-सुका दुष्काळ पडला आणि शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी जनता त्रासली. शासनाची मदत अपुरी पडली. म्हणूनच मतदारांनी सत्ताधारांचे पाय जमिनीला टेकविण्यास भाग पडले. तर विरोधी पक्षाला म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षात ठेऊन जागा वाढवून दिल्या. विरोधी पक्ष बनवा म्हणून मनसे प्रमुखांनी सांगितले; पण मतदारांनी मनसेऐवजी काँग्रेस आघाडीलाच विरोधी पक्षासाठी मजबूत केले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका मतदारांना पटते; पण सत्तेच्या उलाढालीत निवडणुका जिकंण्यासाठी आणखी अनेक गोष्टींची आवश्यकता असते ती मनसेकडे नाही. वंचित फॅक्टर उमेदवार निवडून आणण्यासाठी कुचकामी ठरला.
जोपर्यंत विरोधी पक्ष जनतेच्या प्रश्नावर शासनाला टक्कर देत नाही आणि राज्यकर्ते सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून क्रियाशील होत नाहीत तोपर्यंत जनतेच्या कल्याणाच्या गोष्टी आकारास येणार नाहीत म्हणूनच मतदारांचा कौल स्वीकारून महाराष्ट्र घडवा!