समर्थ रामदास स्वामींचा आदर्श मांडण्यास `श्री राम समर्थ’ चित्रपट यशस्वी!
सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पूर्ती ॥धृ॥
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी, कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥
लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पूर्ती ॥३॥
ही गणपतीची आरती आम्हा सर्वसामान्य भक्तांना अगदी परिचयाची असते. अशा देवांच्या अनेक आरत्या समर्थ रामदास स्वामींनी रचल्या. समर्थ रामदास स्वामी यांचे अवतार कार्य अखंड विश्वासाठी निरंतर प्रेरणादायी असे आहे आणि दीपस्तंभाप्रमाणे आम्हा मानवांना अखंडपणे समर्थ बनविण्यासाठी सक्षम आहे. त्यांनी केलेले मार्गदर्शन आजच्या आधुनिक युगातही मानवासाठी बहुमोल असे आहे. समर्थांची वाणी, समर्थांचे साहित्य, समर्थांची कृती, समर्थांचे कार्य, समर्थांची जीवनगाथा सर्वकाही मानवाच्या सर्वांगिण कल्याणासाठी आजही उपयुक्त आहे आणि भविष्यातही त्याची उपयुक्तता अधिकाधिक वाढत जाईल.
कारण आधुनिक युगामध्ये मानव टेक्नॉलॉजीच्या आधारे संपन्न होत असताना दुसऱ्या बाजूला त्याची शारीरिक-मानसिक अवस्था दुर्बल होत चालली आहे. मानसोपचार तज्ञांकडे गर्दी वाढत आहे. मानसिक दुर्बलता वाढत असताना शारीरिक स्वास्थ्य सुद्धा बिघडत आहे. आपल्या मुलांवर संस्कार कसे करायचे? हेच पालकांना समजत नाही. संस्कार नसलेली तरुण पिढी भरकटली आहे. या तरुण पिढीकडून संपन्न समर्थ देशाच्या उभारणीची अपेक्षा ठेवायची कशी?
मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अखंड जीवनाच्या कल्याणासाठी समर्थ रामदास स्वामींनी दाखविलेला मार्ग आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले, जनाचे नाही. ज्याचे मन समर्थ त्याचे जीवन समर्थ; हे समर्थांनी जाणले म्हणून मनाचे श्लोक आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करीत राहतात. दासबोधसारखा ग्रंथ आमचा खराखुरा वाटाड्या ठरतो. समर्थांचे कार्य आजच्या पिढीला समजले पाहिजे. त्यासाठी आजच्या पालकांनी समर्थांनी दाखविलेल्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच आपल्या मुलांचे भविष्य सुखाचे होऊ शकते. म्हणूनच काल प्रदर्शित झालेला `श्री राम समर्थ’ चित्रपट पाहायला हवा.
‘श्री राम समर्थ’ चित्रपट १ नोव्हेंबर २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. विप्र एंटरटेनमेंटच्या अश्विनी माहेश्वरी आणि दिशादीपा फिल्म्सच्या दीपा सुरवसे यांची निर्मिती असलेला हा चित्रपट भारती झुंबरलाल राठी आणि संजय राठी यांनी प्रस्तूत केला आहे. दिग्दर्शक संतोष तोडणकर यांनी दिग्दर्शित केलेल्या `श्री राम समर्थ’ चित्रपटची मूळ संकल्पना विधीतज्ञ विजया माहेश्वरी यांची आहे.
समर्थांचा आदर्श आणि मार्गदर्शन ‘श्री राम समर्थ’ चित्रपटात उलगडले आहे. अफाट ज्ञान आणि रामरायाच्या भक्तीत आकंठ बुडून प्राप्त केलेली सिद्धी समर्थांच्या ठायी पाहायला मिळते. समर्थांचे विचार रुजविण्याचा प्रयास ह्या चित्रपटाने केला आहे. ‘श्री राम समर्थ’ चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन संजय मराठे आणि महेश नाईक या जोडीने केले. सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे तसेच नवोदित गायक बाळासाहेब सावंत आणि गायिका मीना निकम यांच्या आवाजात पाच गाणी आहेत. अभिनेता शंतनू मोघे, अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, महेश कोकाटे, सौरभ गोखले, सयाजी शिंदे, प्रकाश सुरवसे, हृदयनाथ राणे, करण बेंद्रे, विजयासुमन, बालकलाकार अद्वैत राईलकर आणि अनेक नवोदित चेहरे चित्रपटात आहेत. कथा-पटकथा, संवाद- प्रकाश जाधव, मनोज येरुणकर, विठ्ठल आंबुरे यांनी केले आहे. छायांकन समीर आठल्ये, संकलन सुबोध नारकर, कला महेंद्र राऊत, नफत्यदिग्दर्शन सुजित कुमार यांनी दिले आहे.
समर्थ रामदास स्वामींवरील हा चित्रपट सिनेकलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे नेहमीच स्मरणात राहील. संपूर्ण चित्रपटाची मांडणी समर्थांची शिकवणूक प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी चित्रांकित होईल. म्हणूनच `श्रीराम समर्थ’ चित्रपट आपण आपल्या कुटुंबियांसोबत पाहिलाच पाहिजे.
– सौ. सिद्धी नरेंद्र हडकर