श्रीसाईसच्चरित सखोल मराठी अर्थासह- अध्याय पहिला ( ओवी १ ते ५२)
।। हरि ॐ।। ।।श्रीराम।। ।।अंबज्ञ।। ।। नाथसंविध् ।।
(हेमाडपंतांनी या चरित्राला ‘सच्चरित (सत्+चरित)’ असे म्हटले आहे. सत् शब्दाचा अर्थ चांगले किंवा सत्य. पहा गीता अ. १७ श्लो. २६. साईबाबांचे हे चरित्र चांगले म्हणजे चांगल्या किंवा प्रशस्त कर्मानी युक्त तर आहेच; परंतु ते काल्पनिक किंवा तार्किक नसून जसे घडले तसे खरेखुरे वर्णिलेले आहे. श्रीसाईसच्चरिताच्या प्रस्तावनेत कै. बाळकृष्ण विश्वनाथ देव म्हणतात, “श्रीसाईसच्चरितात ज्या कथा अगर लीला वर्णिल्या आहेत त्यापैकी पुष्कळ श्री. अण्णासाहेबांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत व बाकीच्या ज्या भक्तांना श्रीबाबांचे प्रत्यक्ष व स्वप्नात अनुभव आले व त्यांनी ते त्यांच्या समजुतीप्रमाणे जसेच्या तसेच अण्णासाहेबांना लिहून कळविले अगर तोंडी निवेदन केले. त्या लीला व अनुभवांवर अण्णासाहेबांनी फक्त आपल्या प्रासादिक व रसाळ वाणीने कथास्वरूपाचा पद्यमय, मोहक व सुंदर पेहराव चढवून त्यांचे हृदयंगम वर्णन केले आहे.” यावरून या सर्व कथा व अनुभव अगदी विश्वासार्ह आहेत असे ‘सत्’ शब्दाने सुचविण्याचा हेमाडपंतांचा उद्देश असावा.)
मंगलाचरण (ग्रंथ, कथा, काव्य, पुराण इत्यादींच्या आरंभी केलेली ईश्वराची स्तुती)
||श्री गणेशाय नमः ।। श्री सरस्वस्त्यै नमः || श्री गुरुभ्यो नमः ।। श्रीकुलदेवतायै नमः ।। श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ।। श्रीसदगुरुसाईनाथाय नमः ||
प्रथम कार्यारंभस्थिती । व्हावी निर्विघ्न परिसमाप्ती । इष्टदेवत्तानुग्रहप्राप्ती । शिष्ट करिती मंगलें ।।१।।
मंगलाचरणाचें कारण । सर्व विघ्नांचे निवारण । इष्टार्थसिद्धी प्रयोजन । अभिवंदन सकलांचें ।।२।।
प्रथम वंदू गणपती । वक्रतुंड हेरंब मूर्ती । चतुर्दश विद्यांचा अधिपती । मंगलाकृति गजमुख ।।३||
पोटी चतुर्दश भुवनें मावती । म्हणोनि गा तुज लंबोदर म्हणती । परशु सतेज धरिसी हस्ती । विघ्नोच्छित्त्यर्थ भक्तांच्या ।।४।।
हे विघ्नविघातोपशमना । गणनाथा गजानना । प्रसाद पूर्ण करीं मद्वचना। साष्टांग वंदना करितों मी ||५||
तूं भक्तांचा साह्यकारी । विघ्ने रुळती तुझ्या तोडरीं । तूं सन्मुख पाहसी जरी । दरिद्र दूरी पळेल ||६||
तूं भवार्णाची पोत । अज्ञानतमा ज्ञानज्योत । तूं तुझ्या ऋद्धिसिद्धींसहित। पाहें उल्लसित मजकडे || ७ ||
जयजयाजी मूषकवहना । विघ्नकानन-निकृतना । गिरिजानंदना मंगलवदना । अभिवंदना करितों मी ।।८||
लाधो अविघ्न परिसमाप्ती । म्हणोनि हेचि शिष्टाचारयुक्ती। इष्टदेवता – नमस्कृत्ती । मंगलप्राप्त्यर्थ आदरिली ।।९।।
हा साईच गजानन गणपती । हा साईच घेऊनि परशू हातीं । करोनि विघ्नविच्छित्ती । निज व्युत्पत्ति करु कां ||१०||
हाचि भालचंद्र गजानन । हाचि एकदंत गजकर्ण । हाचि विकट भग्नरदन | हा विघ्नकानन-विच्छेदक ||११||
हे सर्वमंगलमांगल्या । लंबोदरा गणराया । अभेदरुपा साई सदया । निजसुखनिलया नेईं गा ।।१२ ।।
अर्थ:-
श्री गणेशाला नमस्कार असो. श्री सरस्वती देवीला नमस्कार असो. श्री गुरुमहाराजांना नमस्कार असो. श्री कुलदेवतेला नमस्कार असो. श्री सीता व रामचंद्र यांना नमस्कार असो. श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो.
सुरुवात केलेल्या कार्याच्या स्थितीची समाप्ती निर्विघ्नपणे व्हावी म्हणून विद्वान (शिष्ट) लोक अगोदर ‘मंगलाचरण’ करून आपल्या इष्ट देवतेचा अनुग्रह प्राप्त करून घेतात. मंगलाचरण म्हणजे सगळ्यांना (देवांना, ऋषींना व वडीलधाऱ्यांना) नमस्कार (अभिवादन) करणे होय. ते करण्याचा हेतू सर्व विघ्नांचे निवारण व इच्छित ध्येयाची सिद्धी प्राप्त करून घेणे होय. वाकडी सोंड असलेला (वक्रतुंड), दीनांचा पालनकर्ता (हेरंब. हे = दीन, रंब = पालनकर्ता), चौदा विद्यांचा (४ वेद, ६ वेदाङ्गे, धर्मशास्त्रे, मीमांसा, तर्क किंवा न्याय व पुराणे) अधिपती, मंगल रूप (आकृति) असलेला, हत्तीचे तोंड असलेला (गजमुख) अशा गणपतीला प्रथम वंदन असो. पोटात चौदा भुवने (७ स्वर्ग म्हणजे भूर्लोक, भूवर्लोक, स्वर्लोक, महर्लोक, जनलोक, तपलोक आणि सत्य किंवा ब्रह्मलोक. सात पाताळ म्हणजे अतल, वितल, सतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताल किंवा नागलोक) मावतात म्हणून तुला लंबोदर (मोठे पोट असलेला) म्हणतात. भक्तांच्या विघ्नांचा नायनाट (उच्छेद) करण्यासाठी धारदार परशू तू हातात धरतोस, हे विघ्न व घातपात यांचे निवारण करणाऱ्या (विघ्न+विघात+उपशमना) गणनाथा, गजानना माझ्या शब्दांना प्रसादपूर्ण कर, मी तुला साष्टांग नमस्कार करतो. तू भक्तांचा मदतगार आहेस. विघ्ने तुझ्या तोरड्याशी (पायातल्या दागिन्याशी) लोळतात (वठणीस येतात). तू (कोणाकडे) समोर (नुसता) जरी पाहशील तरी (त्यांचे) दारिद्र्य दूर पळेल. तू संसाररूपी सागराची नाव (पोत) आहेस. अज्ञान रुपी अंधारासाठी ज्ञान ज्योत आहेस. तू तुझ्या (पत्नी) ऋद्धी व सिद्धी यांच्यासह माझ्याकडे उल्हासाने पहा. हे उंदीर वाहन असलेल्या (मुषक-वहना), विघ्नरूपी अरण्याचा विध्वंस करणाऱ्या (विघ्न-कानन-निकृंतना) गिरिजेच्या पूत्रा, मंगलवदना, मी तुला अभिवाद (नमस्कार) करतो. निर्विघ्नपणे सर्व समाप्ती होण्यासाठी आणि मंगल (लाभदायक) होण्यासाठी इष्टदेवतेला नमस्कार करण्याची ही शिष्टाचाराची युक्ती मी अमलात आणली. हा साईच गजानन गणपती आहे. हा साईच हातात परशू घेऊन विघ्नांचा नाश करून स्वतःच स्वत:चे सविस्तर निरूपण (व्युत्पत्ति) करणारा आहे. हाच भालचंद्र (कपाळावर चंद्र शोभा देत असलेला), गजानन (हत्तीचे तोंड असलेला) आहे. हाच एकदन्त (एकच दात असलला), गजकर्ण (हत्तीसारखे मोठे कान असलेला) आहे. हाच विकट (प्रचंड किंवा मोठा), भग्नरदन (दात तुटलेला) आहे, आणि हाच विघ्नरूपी अरण्याचा चुराडा करणारा (विघ्न-कानन-विच्छेदक) आहे. हे सर्व मगल-मांगल्या (सर्व कल्याणकारी गोष्टींपेक्षा कल्याणकारी), लंबोदरा, साईनाथांशी एकरूप असणाऱ्या (साईअभेदरूपा) कृपाळू गणराया! मला आत्मसुखाच्या ठिकाणी (निलया) घेऊन जा.
——————————-
आतां नमूं ब्रह्मकुमारी । सरस्वती जे चातुर्यलहरी । या मम जिव्हेसी हंस करीं । होईं तिजवरी आरुढ ||१३ ||
ब्रह्मवीणा जिचे करीं । निढळी आरक्त कुंकुमचिरी | हंसवाहिनी शुभ्रवस्त्री । कृपा करी मजवरी ।।१४ ।।
ही वाग्देवता जगन्माता । नसतां इयेची प्रसन्नता| चढेल काय सारस्वत हाता । लिहवेल गाथा काय मज||१५||
जगज्जननी ही वेदमाता । विद्याविभव गुणसरिता। साईसमर्थचरितामृता। पाजो समस्तां मजकरवीं।।१६ ||
साईच भगवती सरस्वती । ॐकारवीणा घेऊनि हातीं। निजचरित्र स्वयेंचि गाती। उद्धारस्थिती भक्तांच्या।।१७ ।।
अर्थ:-
आता शहाणपण हाच स्वभाव असलेल्या (चातुर्य-लहरी) ब्रह्माच्या कन्येला सरस्वती देवीला नमस्कार असो, ती माझ्या जिभेला हंस (स्वत:चे वाहन) करो आणि तिचेवर आरूढ होवो (बसो). जिच्या हातात ब्रह्म (एक विशिष्ट प्रकारची) वीणा आहे. जिच्या कपाळावर (निढळी) कुंकवाची बारीकशी रेखा (चिरी) आहे, जिने शुभ वस्त्र धारण केलेले आहे आणि हंस जिचे वाहन आहे, ती (सरस्वती देवी) माझेवर कृपा करो. ही वाचेची देवता व जगताची माता प्रसन्न झाल्याशिवाय काव्य व कथा असलेले वाड्मय (सारस्वत) साध्य होईल का? (हाता चढेल का?) आणि माझ्याकडून ही गाथा (चरित्र) लिहवेल का? ही जगज्जननी. वेदमाता, विद्यासंपत्तीची गणरूपी नदी (सरिता) माझ्याकडून श्रीसाईसमर्थ चरित्ररूपी अमृत सर्वांना पाजो. (मला वाटते) श्रीसाई भगवान स्वत:च भगवती सरस्वती होऊन ॐकार वीणा हातात घेऊन स्वत:चे चरित्र भक्तांच्या उद्धारासाठी स्वत:च गात आहेत. (ओ. १३-१७)
——————-
उत्पत्तिस्थितिसंहारकर। रजसत्त्वतमगुणाकार। ब्रह्मा विष्णु आणि शंकर| नमस्कार तयांसी||१८||
हे साईनाथ स्वप्रकाश। आम्हां तुम्हीच गणाधीश। सावित्रीश किंवा रमेश। अथवा उमेश तुम्हीच।।१९ ||
तुम्हीच आम्हांतें सदगुरु। तुम्हीच भवनदीचे तारुं। आम्ही भक्त त्यांतील उत्तारु। पैल पारु दाविजे।।२०।।
कांहीतरी असल्याशिवाय। पूर्वजन्मींचे सुकृत्तोपाय। केवी जोडतील हे पाय। ऐसा ठाय आम्हांतें।।२१।।
अर्थ:-
उत्पत्ती, पालन (स्थिती) आणि संहार करणारे रज, सत्त्व आणि तम या गुणांचे मूर्तिमंत रूप असणारे ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांना नमस्कार असो. हे स्वयंप्रकाशी साईनाथा आम्हाला तुम्हीच गणपती आहात, तुम्हीच ब्रह्मा (सावित्रीश), विष्णू (रमेश) किंवा शंकर (उमेश) आहात. तुम्हीच आमचे सद्गरू आहात. तुम्हीच संसाररूपी नदीतील (भवनदी) नौका (तारु) आहात. त्यातील आम्हा उतारू भकांना पलीकडला किनारा (पैलपारू) दाखवा. काहीतरी पूर्वजन्मीचे चांगल्या कर्माचे साधन (सुकृत-उपाय) असल्याशिवाय हे पाय कसे जोडले जातील आणि हे ठिकाण आम्हाला कसे लाभेल? (ओ. १८-२१)
————–
नमन माझे कुलदैवता । नारायणा आदिनाथा । जो क्षीरसागरी निवासकर्ता। दुःखहर्ता सकाळांचा।।२२।।
परशुरामें समुद्र हटविला। तेणें जो नूतन भूभाग निर्मिला। प्रांत ‘कोंकण’ अभिधान जयाला। तेथ प्रगटला नारायण।।२३।।
जेणे जीवांसी नियामकपणे। अंतर्यामित्वं नारायणें। कृपाकटाक्षे संरक्षणे। तयांच्या प्रेरणेआधीन मी।।२४।।
तैसेंचि भार्गवें यज्ञसांगतेसी। गौडदेशीय ज्या महामुनीसी। आणिलें त्या मूळपुरुषासी। अत्यादरेंसी नमन हे।।२५।।
आतां नमू ऋषिराज। गोत्रस्वामी भारद्वाज। ऋग्वेदशाखा शाकल पूर्वज। आद्यगौड द्विजजाती।।२६ ||
पुढती वंदू धरामर । ब्राह्मण परब्रह्मावतार। मग याज्ञवल्क्यादि योगीश्वर। भृगु पराशर नारद ।।२७।।
वेदव्यास पाराशर। सनक सनंदन सनत्कुमार। शुक शौनक सूत्रकार। विश्वामित्र वसिष्ठ।।२८।।
वाल्मीक वामदेव जैमिनी। वैशंपायन आदिकरुनी। नवयोगींद्रादिक मुनी। तयां चरणी लोटांगण||२९ ||
आतां वंदूं संतसज्जनां। निवृत्ति ज्ञानेश्वर-मुक्ता-सोपाना। एकनाथा स्वामी जनार्दना। तुकया कान्हा नरहरि।।३० ।।
सकळांचा नामनिर्देश। करुं न पुरे ग्रंथावकाश। म्हणोनि प्रणाम करितों सर्वांस। आशीर्वचनास प्रार्थितों मी ||३१||
अर्थ:-
माझे कुलदैवत आदिनाथ ‘नारायण’ ज्याचा क्षीरसागरी निवास आहे व जो सर्वांची दु:खे हरण करणारा आहे. त्याला नमस्कार असो. परशुरामाने समुद्र हटविल्यामुळे जो जमिनीचा नवा भाग निर्माण झाला ज्याला ‘कोंकण’ प्रांत हे नाव प्राप्त झाले तेथे ‘नारायण’ प्रकट झाला. जो (सर्व) जीवांच्या अंतःकरणात बसून (अंतर्यामित्वे) नियमन करून (नियामकपणे) कृपादृष्टीने त्यांचे संरक्षण करतो त्या नारायणाच्या प्रेरणेअधीन मी आहे. तसेच यज्ञाच्या साङ्गतेसाठी भार्गवाने (परशुरामाने) ज्या गौड देशातील (बंगाल देशातील एक भाग) महामुनीला (कोंकण प्रांतात) आणले त्या मूळ पुरुषाला माझा अत्यंत आदराने नमस्कार असो.आता (आमच्या) गोत्राचे (कुळाचे) स्वामी, (आमच्या) ऋग्वेद ‘शाकल’ शाखेचे आदिगौड जातीच्या ब्राह्मणाचे पूर्वज ऋषिराज भारद्वाज यांना नमस्कार असो. नंतर पथ्वीवरचे (साक्षात) देव (धरमार) व परब्रह्माचे अवतार असे जे ब्राह्मण त्यांना वंदन असो. मग योगीश्वर याज्ञवल्क्य भृगु, पराशर आणि नारद वगैरे (ऋषींना) नमस्कार असो. पराशरांचे चिरंजीव वेदव्यास, ब्रह्माचे मानसपुत्र सनक, सनंदन, सनत्सुजात व सनत्कुमार, शुक, सूत्र रचणारे शौनक, विश्वामित्र, वशिष्ठ, वाल्मीक, वामदेव, जैमिनी, वैशंपायन आणि नऊ योगींद्रादिक मुनी (कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविहोत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन- भागवत स्कंध ११ अध्याय २) यांचे चरणी लोटांगण असो. आता निवृत्ती, ज्ञानदेव, मुक्ताबाई, सोपान, एकनाथ, स्वामी जनार्दन, तुकाराम, कान्होबा, नरहरी वगैरे संतसज्जनांना नमस्कार असो. (आणखी) सगळ्यांचा उल्लेख करण्यास ग्रंथात जागा पुरणार नाही म्हणून (राहिलेल्या) त्या सर्वांना मी प्रणाम करतो आणि त्यांनी मला आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करतो. (ओ. २२-३१)
————————-
आतां वंदूं सदाशिव। पितामह जो पुण्यप्रभाव। बदरीकेदारी दिला ठाव। संसार वाव मानुनी।।३२ ||
पुढे वंदूं निजपिता। सदा सदाशिव आराधिता। कंठी रुद्राक्ष धारण करिता। आराध्यदेवता शिव जया।।३३ ||
पुढती वंदूं जन्मदाती। पोसिलें जिनें मजप्रती। स्वयें कष्टोनी अहोरातीं। उपकार किती आठवू ||३४||
बाळपणी गेली त्यागुनी। कष्टं सांभाळी पितृव्यपत्नी। ठेवितों भाळ तिचे चरणी। हरिस्मरणीं निरत जी।।३५।।
अवघ्यांहूनि ज्येष्ठ भ्राता। अनुपम जयाची सहोदरता। मदर्थ जीवप्राण वेंचिता। चरणीं माथा तयाचे।।३६ ||
अर्थ:-
आता सदाशिव नावाचे माझे पुण्यवान आजोबा (पितामह) ज्यांनी संसार निरर्थक (वाव) मानून (हिमालयाच्या पायथ्याशी) बद्रीनाथ व केदारनाथ या ठिकाणी निवास केला होता त्यांना मी वंदन करतो. पुढे माझे वडील जे सदा शंकराची उपासना करत होते, गळ्यात रुद्राक्षांची माळ घालत होते व शिव हे ज्यांचे आराध्यदैवत होते त्यांना मी वंदन करतो. नंतर माझी जन्मदाती आई जिने मला रात्रंदिवस कष्ट करून पोसले तिला मी वंदन करतो. तिचे उपकार मी किती आठवू? ती मला लहानपणी सोडून गेली आणि माझ्या काकूने (पितृव्य पत्नी) मला कष्टपूर्वक संभाळले. ती सदा हरीचे स्मरण करण्यात दंग असे. तिच्या चरणी मी मस्तक ठेवून नमस्कार करतो. सर्वांहून माझा मोठा भाऊ (ज्येष्ठ भ्राता) ज्याचे बंधुप्रेम अप्रतिम होते व जो माझ्याकरिता जीव की प्राण खर्च करण्यास तयार असे, त्याच्या चरणावर मस्तक ठेवून मी नमस्कार करतो. (ओ. ३२-३६)
——————-
आतां नमूं श्रोतेजन। प्रार्थितों आपुलें एकाग्र मन। आपण असतां अनवधान। समाधान मज कैंचें।।३७ ।।
श्रोता जंव जंव गुणज्ञ चतुर। कथाश्रवणार्थी अति आतुर। तंव तंव वक्ता उत्तरोत्तर। प्रसन्नांतर उल्हासे।।३८ ||
आपण जरी अनवधान। काय मग कथेचे प्रयोजन। म्हणोनि करितों साष्टांग वंदन। प्रसन्नमन परिसावें।।३९ ||
नाहीं मज व्युत्पत्तिज्ञान। नाहीं केले ग्रंथपारायण। नाहीं घडलें सत्कथा श्रवण। हें पूर्ण आपण जाणतां।।४० ||
मीही जाणे माझे अवगुण। जाणे माझें मी हीनपण। परी करावया गुरुवचन। ग्रंथप्रयत्न हा माझा||४१।।
माझेंचि मन मज सांगत। की मी तुम्हांपुढे तृणवत। परी मज घ्यावें पदरांत। कृपावंत होऊनि।।४२ ।।
अर्थ:-
आता मी (तुम्हा) श्रोतेजनांना (ही पोथी ऐकणाऱ्यांना) नमस्कार करतो. तुमचे लक्ष जर (पोथीकडे) नसेल तर मला समाधान कसे लाभेल? श्रोता जसजसा चतुर व गुणांची योग्यता ओळखणारा (गुणज्ञ) असेल व कथा ऐकण्यासाठी अगदी आतुर असेल तसतसा वक्त्याला (पोथी सांगणाऱ्याला) मनात अधिकाधिक (उत्तरोत्तर) उत्साहपूर्वक आनंद वाटतो. तुम्हा (श्रोत्यांचे) लक्ष नसले तर मग कथेचा काय उपयोग?
म्हणून तुम्हाला मी साष्टांग नमस्कार करतो आणि प्रसन्न मनाने ऐकावे अशी विनंती करतो. मला शास्त्र वाङ्मयाचा परिचय (व्युत्पत्तिज्ञान) नाही, मी कधी ग्रंथांचे पारायण केले नाही आणि कधी संतांच्या कथा ऐकल्या नाहीत; हे तुम्ही पूर्णपणे जाणताच. मलाही माझे अवगुण आणि हीनपणा ठाऊक आहे. परंतु गुरुंचे शब्द खरे करण्यासाठी हा माझा ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न आहे. माझे मन मला सांगते की, मी तुमच्या तुलनेने गवताच्या एका काडीसारखा (तृणवत) आहे; तरीपण तुम्ही कृपावंत होऊन मला पदरात घ्यावे. (ओ. ३७-४२)
——————-
आतां करुं सद्गुरुस्मरण। प्रेमें वंदू तयाचे चरण। जाऊ कायावाचामनें शरण। बुद्धिस्फुरणदाता जो।।४३ ।।
जेवणार बैसतां जेवावयास। अंती ठेवितो गोड घांस। तैसाचि गुरुवंदन – सुग्रास। घेऊनि नमनास संपवू||४४ ।।
ॐ नमो सद्गुरुराया। चराचराच्या विसाविया। अधिष्ठान विश्वा अवघिया। अससी सदया तूं एक।।४५ ।।
पृथ्वी सप्तदीप नवखंड। सप्तस्वर्ग पाताळ अखंड। यांतें प्रसवी जें हिरण्यगर्भांड। तेंचि ब्रह्मांड प्रसिध्द।।४६ ||
प्रसवें जी ब्रह्मांडा यया। जी नामें ‘अव्यक्त’ वा ‘माया’। तया मायेचियाही पैल ठाया। सद्गुरुराया निजवसती।।४७ ।।
तयाचें वानावया महिमान। वेदशास्त्रीं धरिलें मौन। युक्तिजुक्तीचे प्रमाण। तेथें जाण चालेना।।४८।।
ज्या ज्या दुज्या तुज उपमावें। तो तो आहेस तूंचि स्वभावें । जें जें कांहीं दृष्टि पडावें । तें तें नटावें त्वां स्वयें।।४९ ||
ऐसिया श्रीसाईनाथा। करुणार्णवा सद्गुरु समर्था। स्वसंवेद्या सर्वातीता। अनाद्यनंता तुज नमो||५० ||
प्रणाम तूतें सर्वोत्तमा। नित्यानंदा पूर्णकामा। स्वप्रकाशा मंगलधामा। आत्मारामा गुरुवर्या।।५१।।
करुं जातां तुझें स्तवन। वेदश्रुतीही धरिती मौन। तेथें माझें कोण ज्ञान| तुज आकलन कराया।।५२ ।।
अर्थ:-
आता बुद्धीला स्फुरण देणाऱ्या सद्गुरूंचे स्मरण करू या. त्यांचे प्रेमाने चरण वंदू या आणि त्यांना काया, वाचा, मनाने (शरीर, वाणी व मनासह) शरण जाऊ या. जेवणारा जेवावयास बसत असताना जसा गोड घास शेवटी ठेवतो तसा गुरुवंदनाचा सुग्रास (मिष्टान्नाचा घास) घेऊन या नमनास संपवू या. ॐ रूपी श्रीसद्गुरुराया तुला नमस्कार असो. तू चर व अचर प्राण्यांचा विसावा आहेस. दयाळू असा तू अवघ्या विश्वाचे एकच निवासस्थान (अधिष्ठान) आहेस, हिरण्यगर्भाचे (ब्रह्माचे) अंडे जे सात द्वीपांची (जंबु, कुश, प्लक्ष, शाल्मली, क्रौंच, शाक व पुष्कर अशा मोठ्या विभागांची) व नऊ खंडांची (आणखी लहान विभागांची) पृथ्वी, सात स्वर्ग व सात पाताळ उत्पन्न करते तेच ब्रह्मांड म्हणून प्रसिद्ध आहे. या ब्रह्मांडाला जी जन्म देते (प्रसवे) तिला ‘अव्यक्त’ किंवा ‘माया’ म्हणतात. त्या मायेच्याही पलीकडल्या ठिकाणी गुरुमहाराज स्वत: राहतात. त्यांच्या महिन्याचे वर्णन करता येत नाही म्हणून वेदांनी आणि शास्त्रांनी मौन धरले. तेथे नाना प्रकारच्या युक्त्यांचे पुरावे (प्रमाण) चालत नाहीत; हे लक्षात ठेवा. (हे सद्गुरो !) तुला ज्याची ज्याची उपमा द्यावी ती ती (वस्तू) नैसर्गिक गुणांमुळे तूच आहेस. जे जे काही दृष्टीस पडावे ते ते .रूपही तू स्वत:च धारण केलेले असते. अशा हे दयेच्या सागरा, समर्थ सद्गुरो, स्वत:च स्वत:ला जाणू शकणाऱ्या (स्वसंवेद्या), सर्व गोष्टींच्या पलीकडे असलेल्या (सर्वातीता), आदी व अंत नसलेल्या श्री साईनाथा; तुला नमस्कार असो. हे सर्वोत्तमा, नित्यानंदा, पूर्णकामा (तृप्त, ज्याच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत), स्वप्रकाशा, मंगलधामा, आत्मारामा, गुरुवर्या तुला प्रणाम असो. तुझे स्तवन करू जाता वेद-श्रुतींनी मौन धरले तेथे माझे (अल्प) ज्ञान तुला जाणायला (आकलन कराया) कोठून पुरेल ? (ओ. ४३-५२)
क्रमशः
।। हरि ॐ।। ।।श्रीराम।। ।।अंबज्ञ।। ।। नाथसंविध् ।।