चरबी घटवा, सुदृढ व्हा!

जाड आहे का मी व माझे बाळ?
मलाच पोट मोजून कळेल…

जाड मुले बारीक करायची गोष्ट

शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी झाली. दर तिसरा चौथा मुलगा जाड होता म्हणून पालक सभा भरली होती. बहुतेक जाड मुलांचे पालकपण जाड होते. ते काळजीत होते. डॉक्टर जोशींना मार्गदर्शनासाठी बोलाविले होते. पालकांनी विचारले, “आम्ही व मुले जाड आहोत का? हे कसे कळेल?”

डॉक्टर जोशी म्हणाले, “ पोटाचा घेर मोजून कळेल. पोटाचा घेर जास्त तर आपण व मुल जाड म्हणजे आजारी. आयुष्य कमी.

शोले चित्रपटात सचिनचा मृत्यू बघून ए. के. हंगल म्हणतो, “जगात सर्वात मोठे दुःख कोणते? आपल्या मुलांचे मरण बघणे.” जाडेपणा नावाच्या आजाराने आपल्या घरी हे होऊ नये.

हे पोट जास्त असेल तर येथे दिलेल्या जादूने मी ते कमी करेन. रक्तदाब, मधुमेह, जाडेपणा यातून मुक्त होऊन १०० वर्षे मस्त जगेन. कापड मोजायचा टेपने (मोजपट्टीने) आपल्या पोटाचा घेर मोजा.

मोठ्या बाईचे किंवा माणसाचे पोट ८० सेंटीमीटर म्हणजे ३२ इंचापे क्षा जास्त असेल तर आपण जाड. ८० सेंटीमीटर (३२ इंच) मापाची चड्डी लागत असेल तर आपण जाड.

मुलांमध्ये दोन वर्षाला पोटाचा घेर ४९ सेंटीमीटर असेल तर ते बाळ जाड. ३ वर्षाला पोटाचा घेर ५० सेंटिमीटर म्हणजे २० इंच असेल तर ते जाड. पोटाच्या घराचा हा आकडा यानंतर दरवर्षी ३ सेंटीमीटरने (१.२) वाढतो.

बाळाच्या पोटाचा घेर किती सेंटिमीटर असेल तर ते बाळ जाड?

३ वर्षाला ५० सेंटीमीटर
४ वर्षाला ५३ सेंटीमीटर
५ वर्षाला ५६ सेंटीमीटर
६ वर्षाला ५९ सेंटीमीटर
७ वर्षाला ६२ सेंटीमीटर
८ वर्षाला ६५ सेंटीमीटर
९ वर्षाला ६८ सेंटीमीटर
१० वर्षाला ७१ सेंटीमीटर
११ वर्षाला ७४ सेंटीमीटर
१२ वर्षाला ७७ सेंटीमीटर
१३ वर्षाला व त्या पुढे ८०सेंटीमीटर असेल तर ते बाळ जाड.

मोठ्यांचा रक्तदाब, मधुमेह लहानपणीच जाडेपणासह सुरू होतो.

तो लहानपणीच बरा करा. पोट दिसते म्हणजे अंगात चरबी, साखर व रक्तदाब जास्त आहे. त्यानंतर ७ वर्षांनी मधुमेहाचे निदान होते असे वैद्यकीय निदान आहे. उच्चरक्तदाब असतोच. ही बुडणारी नाव असते. सर्व औषध करूनही २०-३० वर्षात मरण हा अनुभव आहे. असे आपले व आपल्या मुलांचे आपल्या डोळ्यासमोर होऊ नये म्हणून ही जादू करा.

वजन व पोट कमी करायची जादू

यातील जे जे जमेल ते आतापासून करा.

१) पाणी, ताक, भाज्या, कोशिंबिरी व कमी शर्करायुक्त फळे (उदा. संत्री, मोसंबी, पेरू, खरबूज, कलिंगड, आवळा, बोरे, जांभळे, करवंदे इ.) भरपूर खा. त्याने वजन, चरबी, पोट कमी होते.

२) १ चहा किंवा १ नाश्ता किंवा १ पोळी किंवा १ वाटी भात रोज कमी करा. वर्षाला तीन किलो वजन घटते. चहा, बिस्कीट, बेकरीचे व बाहेरचे पदार्थ टाळा. त्याऐवजी पाणी, ताक, भाज्या, कोशिंबीर व कमी शर्करायुक्त फळे खा.

३) जमले तर रात्री जेवू नका. त्याऐवजी कोशिंबिरी, कमी शर्करायुक्त फळे खा. पाणी प्या.

४) कमी बसा. शक्य तेवढी कामे उभ्याने करा. चरबी दुप्पट वेगाने जळते. वजन घटते. डिजिटल काटा घ्या. रोज वजन करा. असे रोज कराल तर रोज शंभर ग्रॅम वजन कमी होईल; महिन्याला तीन किलो.

५) पण एकदा खूप जेवलात की एक किलो वजन वाढेल.

६) भूक लागली तर खा. कमी खा. शिजवलेले अन्न कमी करा. दरवेळी पाणी जास्त प्या.

प्रत्येक पाऊण घास भाजी कोशिंबिरीचा हवा.
तेल, तूप, गहू, तांदूळ, मीठ, घराबाहेरचे अन्न कमी वा बंद करा.
नकळत जास्त बसून जास्त अन्न खाऊन जाडेपणा येतो. तो कमी खाऊन व कमी बसल्याशिवाय इतर कशानेही जाणार नाही. थकल्याशिवाय बसू नये. थकवा गेल्यावर बसू नये. शक्य तेवढी कामे उभ्याने व चालत फिरत करावी. टीव्हीसमोरच्या खुर्च्या काढा. शक्य तेवढे जलद चाला, फिरा, धावा. तासभर खेळून-कष्ट करून घाम गाळा. जगायची किंमत आहे. ह्यानेच चरबी जळेल. नाहीतर चरबी आपल्याला वाळवीसारखी आतून खराब करून वीस वर्षात मारेल.

एक किलो वजन जास्त झाले की दोन मिलिमीटरने रक्तदाब वाढतो. वजन घटले की त्याप्रमाणे रक्तदाब व साखर घटते. आपण रक्तदाब व मधुमेह मुक्त होऊ शकतो.

एक डिजिटल वजन काटा घ्या.

रोज सकाळी प्रातर्विधीनंतर उपाशीपोटी वजन करा. ते भिंतीवरील दिनदर्शिकेवर (कॅलेंडरवर) लिहा. वजन रोज घटेल. उत्साह वाढेल. आदल्यादिवशी काय खाल्ल्याने ते घटले / वाढले ते कळेल. तसा बदल आपोआप होईल. पोट वाढले की रक्तदाब वाढतो. प्रत्येकाचा रक्तदाब दर वाढदिवसाला बघा. मुलांचा वाढदिवस दर सहा महिन्यांनी करा. त्यांची वाढ मोजून करा.

मुलांच्या वजन व उंचीची वाढ आणि रक्तदाब मोजा. त्यांच्या वाढीचा आलेख काढा. जाडेपणा हा घरी सर्वांचा आजार असतो. हे सर्वांसाठी करा. वाढलेले वजन सहजासहजी घडत नाही. मनाने पक्के ठरवा. बारीक व्हायचा हट्ट धरा. शपथ घ्या, नवस बोला. तरच जाडेपणा कमी होतो.

उभ्याने कामे करा. आपण बसतो तेव्हा तासाला फक्त एक चमचा चरबी कमी होते. आपण उभे राहतो तेव्हा तासाला दोन चमचे चरबी कमी होते. आपण चालतो तेव्हा तासाला तीन चरबी कमी होते. आपण जिने चढत होतो तेव्हा तासाला चार चमचे चरबी कमी होते. आपण नाचतो तेव्हा तासाला पाच चमचे चरबी कमी होते.

चरबी जाळा बारीक व्हा…

चरबी जाळा नाहीतर ती आपल्याला चितेवर जाळेल.

आपण जाड का होतो?

खावे काय व किती? हे माहीत नाही म्हणून…

मोठ्याने रोज असे जेवावे…

आयुर्वेद सांगतो की, मोठ्यांनी नेहमी अर्धी भूक राखूनच जेवावे.

जगभरातील वैद्यकीय तज्ञ सांगतात,
१) भूक लागली तरच खा.
ताटाचे चार भाग करा. एक भाग डाळ किंवा मांसाहार, एक भाग भात किंवा पोळी व दोन भाग भाजी, कोशिंबीर, फळे खा.

वाटीभर दही घ्या. त्याने जीवनाश्यक `ब १२’ जीवनसत्व मिळेल. हे सर्व भारती जनतेमध्ये कमी असते. फक्त दुधातून मिळते. दुधापेक्षा दह्यात जास्त असते. आपण रोज दही खावे. जमल्यास सर्व दुधाचे दही करावे. चिमूटभर मीठ पुरे. त्यापेक्षा जास्त मिठाने रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. भारतात रक्तदाबी हे प्रमुख मृत्यूचे कारण आहे. स्वयंपाक घरात मीठ-साखर यांचे प्रमाण कमी असावे. जेवल्यावर पान खा. त्याने पोट भरेल. समाधान मिळेल. चुना मिळेल. त्याने दात व हाडे बळकट होतील. दात किडण्याचे प्रमाण कमी होईल. ज्याचे/जिचे पोट दिसते त्याने/तिने पाऊण भाग भाजी / कोशिंबीर / फळे व एक भाग डाळ घ्यावी. भात / पोळी कमी करावी.

मुलांसाठी

बाळ जन्मताच त्याला आईने हृदयाशी कवटाळावे.
जन्मानंतर सहा महिने फक्त आईचे दूध द्यावे. बाळ ६ महिन्याचे झाले की त्याला मांडीवर बसून घरचे सर्व अन्न मऊ करून द्यावे. दरवेळी आईच्या दुधा आधी द्यावे. त्यांना सर्व चवी कळतात. सर्व पदार्थ द्या. वाढदिवसापर्यंत घरचे सर्व जेवण द्या. १८ वर्षाची होईपर्यंत मुले वाढतात. तोपर्यंत त्यांना पोटभर व जास्त वेळा अन्न द्यावे.

गरजेपेक्षा जास्त खाल्लेल्या प्रत्येक घासाची चरबी होते.

आपले पोट दिसते तेव्हा वजनाच्या अंदाजे पावभाग वजन चरबीचे असते. आपण जेवत नाही तेव्हा ती वापरली जाते. पोट दिसते तेव्हा व्यक्ती न जेवता शंभर दिवस राहू शकते. आठवड्याला दोन उपास करणे चांगले आहे. डॉक्टरवर विश्वास ठेवा. हे सर्वांना सांगा.

-डॉ. हेमंत जोशी
जोशी बालरुग्णालय, विरार ४०१३०३

You cannot copy content of this page