महाराष्ट्रात ५१ हजार ९२१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्यांवर कायम – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई:- राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६८ टक्के एवढा आहे. राज्यात आज १३१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ५९ हजार १६६ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३३०७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५१ हजार ९२१ रुग्णांवर (अ‍ॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४३ खाजगी अशा एकूण ९८ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ९५४ नमुन्यांपैकी १ लाख १६ हजार ७५२ नमुने पॉझिटिव्ह (१६.६५ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ८२ हजार ६९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५५५ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ८० हजार ५४५ खाटा उपलब्ध असून सध्या २७ हजार ५८२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ११४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-७८ (मुंबई ७७, मीरा भाईंदर १), नाशिक- ११(जळगाव ७, नंदूरबार २, मालेगाव २), पुणे- २२ (पुणे ३, पुणे मनपा १८, पिंपरी चिंचवड १), लातूर-२ (लातूर २), अकोला-१ (यवतमाळ १).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८८ पुरुष तर २६ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ११४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७६ रुग्ण आहेत तर ३० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या ११४ रुग्णांपैकी ८४ जणांमध्ये (७३.७ टक्के) मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५६५१ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *