श्यान नाय तर शेती छान नाय… ट्रॅक्टर नांगरणीमुळे आगामी काळात जमीन नापिकी होणार! -भाई चव्हाण

कणकवली:- शेतीमध्ये आधुनिकीकरण आले आहे. ट्रॅक्टरने शेतीची नांगरट केली जात आहे. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी गुरे-ढोरे बाळगायचे सोडून दिले आहे. जमीनीमध्ये शेण मिसळले जात नाही. केवळ रासायनिक खतांचा मारा केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात या शेतजमिनी नापिकी होणार आहेत. `शेतात श्यान नाय तर शेती छान नाही’ अशी परिस्थिती निर्माण होणार आहे! असे मत कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक, पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी पत्रकातून व्यक्त केले आहे.

धनगर समाजातील किर्लोस येथील माडावरील नारळ काढणारे श्री. जंगले यांनी हा इशारा दिल्याचे श्री. चव्हाण यांच्या स्पष्ट करून ते म्हणतात, कोकण वगळता उर्वरित राज्यातील, देशातील शेतकरी आजही आपल्या दारात मोठ्या प्रमाणात गोधन, म्हैशी, शेळी, कोबंड्या आदी पशुपक्षी सांभाळतात. त्यामुळे त्यांच्या शेत जमिनीत मोठ्या प्रमाणात शेण, विष्ठा वापरतात. त्यामुळे एकीकडे दुधाचे उत्पन्न मिळते. तर दुसरीकडे त्यांना शेतासाठी शेणखत मिळते. त्यामुळे उत्पन्न चांगले मिळते.

कोकणामध्ये गेल्या काही वर्षात बहुतांश शेतकऱ्यांनी शेती करायची सोडून दिली आहे. त्याचबरोबरीने दारातील पाळीव जनावरे विकली. दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ मिळत असल्याने शेती कशाला करायची? अशी मानसिकता वाढीस लागली आहे. दर्जाच्या दृष्टीने हे धान्य कमी प्रतीचे आहे; हा विचार दुय्यम ठरला; असे स्पष्ट करून ते म्हणतात, जोत बांधून नांगरणी आदी कामे केल्यास जमिनीतील जीवाणू जीवंत रहातात. सोबत शेणखताचा, कोबंड्या-शेळ्यांच्या विष्टेचा वापर केल्यास जीवाणूंची झपाट्याने वाढ होते. शेती-बागायती चांगली बहरते. मात्र ट्रॅक्टरच्या वापरामुळे जीवाणू नष्ट होतात. त्यामुळे जमीनी नापिकी होण्यापासून वाचवण्यासाठी आता कोकणातील शेतकर्यांनी आपली मानसिकता बदलून पूर्वीप्रमाणेच दुहेरी उत्पनाच्या दृष्टीने पाळीव जनावरे बाळगायला सुरुवात केली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page