निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना बाजार भावाने नुकसान भरपाई मिळावी; प्रशासनाने कागदी घोडे नाचवू नयेत- मोहन केळुसकर
कणकवली:- कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्हांतील निसर्ग चक्री वादळग्रस्तांना राज्य शासनाने बाजार भावाने नुकसान भरपाई द्यावी. तसेच चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाई देताना प्रशासनाने कागदी घोडे न नाचविता विनाविलंब शासकीय आर्थिक मदत हस्तांतरित करावी, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहनराव केळुसकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
आजवर कोकणातील अशा नैसर्गिक आपत्तीच्यावेळी नुकसान भरपाई देताना प्रशासनातील अधिकारी कागदी घोडे नाचवून खूप विलंब लावत असल्याचे अनुभव आले आहेत. अशावेळी कोकणातील लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरून आपदग्रस्तांना विनाविलंब नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या कामी प्रशासनावर अंकुश ठेवला पाहिजे, असे नमुद करून श्री केळुसकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांसह महाआघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांसह विरोधी पक्ष नेत्यांनीही वादळग्रस्त भागाची तातडीने पाहाणी केली. हे पहिल्यादा घडत आहे. आता खरी जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र प्रशासनावर अंकुश ठेवला तरच वादळग्रस्तांना न्याय मिळेल.
या भागातील कोविआचे पदाधिकारी उपाध्यक्ष बळीराम परब, मुकुंद वाजे, नरेंद्र म्हात्रे आदी कार्यकर्ते लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले.