स्वयंभगवान त्रिविक्रमाचे प्रेमाने नाम घेतल्यानेच श्रद्धावानाचा सर्वांगिण विकास!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पंधरावा
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्
प्रेमे जो माझे घेई नाम, त्याचे काम सर्व पुरवीन।
संपन्न करीन त्याचे धाम, भरीन शांती समाधान॥
आधीच्या वचनात ‘ कामक्रोध ( हे दुर्गुण ) भरलेले असले तरी माझे नाव माझ्या भक्ताला तारून नेईल ‘ असे त्रिविक्रम म्हणतात आणि या वचनात सांगतात की; प्रेमाने जो माझे नाम घेईल त्याचे सर्व ‘काम’ मी पुरवीन. किती गंमत आहे?
जेव्हा एखादा श्रद्धावान दुसऱ्या कुठल्या फारशी भक्ती नसणाऱ्या माणसाला काहीतरी हितकर सांगतो; तेव्हा तो माणूस पहिले हेच विचारतो की याने माझा काय फायदा होईल? रामनामाचा जप केला तर मला काय मिळेल? माझी कुठली अडचण दूर होईल? ठीक आहे. त्याने कसा विचार करायचा हा त्याचा प्रश्न, प्रार्थना करायची की नाही हा त्याचा प्रश्न आणि त्याच्या प्रार्थनेला उत्तर कसे द्यायचे हा भगवंताचा प्रश्न! आपण काय पाहायचे ? तर त्रिविक्रम काय म्हणतात तेवढेच. ते म्हणतात, प्रेमाने जो माझे नाव घेईल… म्हणजेच काय तर कोणतीही अपेक्षा ठेवता निव्वळ त्यांच्यावरील प्रेमाने जो त्यांचे नाव घेईल त्याच्याविषयी हे वचन आहे. आता लाभेवीण प्रीतीने जो नाम घेतो त्याच्या मनात कुठला काम असणार? फक्त परमात्माविषयी प्रेम हाच एकमेव काम उरला आहे तोच प्रेमाने नाम घेऊ शकतो. बाकीचे सकाम प्रेमाने नाम घेतात. अशा निव्वळ प्रेमाने नाम घेणाऱ्याचा ‘परमात्म्याविषयी प्रेम हा एकमेव काम’ ते अनन्य प्रेमस्वरूप स्वयंभगवान पुरवितातच.
तुलसीदास म्हणतात की रामनाम तीन प्रकारचे आहे.
‘श्रवणात्मक ध्वन्यात्मक वर्णात्मक विधि तीन,
त्रिविध शब्द अनुभव अगम तुलसी कहहिं प्रवीन।’
वर्णात्मक म्हणजे जे लिहिता येऊ शकते असे. यासाठी बापूंनीन आम्हाला रामनाम वही दिली आहे आणि नाम स्पर्शही शिकविला आहे. ध्वन्यात्मक म्हणजे जप करता येईल असे. जसा आम्ही त्रिविक्रम मंत्रगजर करतो. श्रवणात्मक हे सगळ्यात महत्वाचे आणि सगळ्यात खोल गेलेले नाम. हे कसे असते ? तर आम्ही नामाचे लेखन न करता, उच्चारण न करता जे ऐकू येईल असे नाम! अनिरुद्ध पाठात डाॅ योगीन्द्रसिंह म्हणतात त्याप्रमाणे-
अनिरुद्ध माझा वैकुंठीचा राजा
मज तन्नामाचा जडो छंद।
हृदयाचे स्पंदन श्वासाचे चलन
होवो त्यात गान अनिरुद्ध।
परा व पश्यंती मध्यमा वैखरी
गावोत एका स्वरी अनिरुद्ध।
नसांत भिनावे रक्तात भिजावे
कंठी प्रगटावे गुरुनाम।
सकाम असो वा निष्काम ; प्रेमाने नाम घेणा-या अशा भक्ताच्या सर्व पवित्र इच्छा त्रिविक्रम पूर्ण करतात. त्याचे धाम त्रिविक्रम संपन्न करतात, म्हणजेच सर्व संपत्तीने युक्त असे करतात. स्थूल पातळीवर तर हे होतेच. पण थोड्या वेगळ्या पातळीवर धाम म्हणजे मनबुद्ध्यादिसहित मी ज्यात राहतो ते शरीर. ते दैवी संपत्ती ने युक्त फक्त देवच करू शकतो. ही दैवी संपत्ती कोणती हे भगवंतांनी गीतेत सांगितले आहे.
अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः।
दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् ॥
अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम् ।
दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् ॥
तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता ।
भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत ॥
श्रीमद्भगवद्गीता अध्याय १६ / १,२,३
हे आमचे धाम श्री त्रिविक्रम शांतीने आणि समाधानाने परीपूरित करतात. बाकी कोणतीही संपत्ती असली पण शांती आणि समाधान नसले तर ती निरुपयोगी ठरते. शांती आणि समाधान हे कोणत्याही परिस्थितीला आनंददायी करणारे परिस आहेत. म्हणूनच आम्ही कोणत्याही उपासनेनंतर किंवा सेवाकार्यानंतर शांति मंत्र म्हणतो.
नाम घ्यायची इच्छा असते, प्रेमही असते. पण नाम जास्त वेळ एकाग्रतेने घेणे होत नाही. वेगवेगळ्या विचारांत मन भरकटते. प्रेमाने नाम घेण्यासारखी सोपी गोष्टही नीट जमत नाही अशा; माझ्यासारख्या साध्या श्रद्धावानाने काय करायचे? आपल्या परमप्रिय अशा सद्गुरूचे आश्वासक, सुंदर रुप सतत आठवायचे. त्याची प्रतिमा सतत पहायची. डोळ्यांसमोर त्याचे रुप राहिले तर, तो अनन्यप्रेमस्वरूप अनिरुद्ध माझ्या कर्मात, उपासनेत प्रेम भरेल! तो रामनामतनु अनिरुद्ध माझ्या मनात रामनाम उतरवेल!! त्या नामाच्या अनाहत ध्वनीने माझ्या जीवनाच्या गोंगाटात त्याच्या बासरीचे सूर उमटतील!!! आणि बाकी काय ते तो माझा बाबा त्याच्या वचनाप्रमाणे करेलच!!!!
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्
– डाॅ आनंदसिंह बर्वे
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक चौदावा वाचण्यासाठी इथे क्लिक करा!