सिंधुदुर्गातील मुंबई गोवा महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम!
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब लक्ष देतील काय?
`राज्यकर्त्यांचा दुर्लक्ष, प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि ठेकेदार कंपनीचा उन्मत्तपणा‘ याचे जीवंत उदाहरण म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेले महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम!
१९३० साली मुंबई-गोवा महामार्ग सुरु झाला; परंतु तो नेहमीच दुर्लक्षित राहिला. ह्या महामार्गावर वाहने चालविणे म्हणजे कधीही अपघाताला सामोरे जाणे. तरीही कोकणवासियांना दुसरा पर्यायच उपलब्ध नसल्याने ह्याच महामार्गाचा वापर अनेक दशके केला गेला. अनेक लोकांचे जीव रस्ते अपघातात गेले. कोकणात शासनाचे अद्ययावत रुग्णालय नसल्याने अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना मुंबईत किंवा गोव्यात नेण्याशिवाय दुसरा पर्याय नसायचा आणि उपचाराच्या विलंबामुळे त्यांचे जीव जायचे. त्यामुळे `मुंबई-गोवा महामार्ग चार पदरी उत्कृष्ट दर्जाचा असावा’ हे कोकणवासियांचे स्वप्न अनेक वर्षांपासूनचे! `हा मार्ग मृत्यूचा सापळा आहे!’ असे खरे विधान केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१५ साली लोकसभेमध्ये केले होते. हा मार्ग होण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकारने पुढाकार घेऊन कोकणवासियांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला. चार पदरी महामार्गाचे काम सुरु आहे.
हा मार्ग पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला तो खरोखरच कौतुकास्पद असा आहे; परंतु ह्या महामार्गाचे काम सुरू असताना अनेक घटना-दुर्घटना घडल्या. त्याचप्रमाणे महामार्गाचे काम कसे निकृष्ट दर्जाचे आहे? हे सातत्याने समोर आले. तरीही ठेकेदारांवर कोणतीही कारवाई होत नाही, ह्याचे आश्चर्य वाटते. `ठेकेदार, प्रशासन आणि राज्यकर्ते यांच्या संगनमताने महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे होत आहे’ असा आरोप आता सर्वसामान्य जनता करू लागली आहे.
पुढील शंभर वर्षे नादुरुस्त न होणारे मजबूत रस्ते बांधण्याचे आश्वासन नेहमीच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देत असतात. मग सिंधुदुर्गात महामार्ग बांधकामाच्या ज्या त्रुटी समोर आल्या त्यातून काय सिद्ध होते? बांधकाम सुरु असतानाच बांधकाम कोसळू लागले तर ते पुढील दहा वर्षे तरी टिकेल काय? हा मोठा गंभीर प्रश्न आहे.
मागील दोन वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्ग बांधकामामध्ये अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. त्याचप्रमाणे ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे अनेकांचे जीव अपघातांमध्ये गेले. तरीही ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी कोणतीही उपाययोजना करण्यास तयार नाहीत. हे शासनकर्त्यांचं दुर्लक्ष नाही का?
कणकवली शहरातील एस. एम. हायस्कूल समोरील बॉक्सवेलची भिंत १३ जुलै २०२० रोजी कोसळली. आज शिवाजी चौकातील उड्डाणपुलाचा भाग स्लॅप ओतण्याचे काम चालू असताना कोसळला. असे छोटे मोठे प्रकार गेल्या महिन्यात १०-१२ वेळा घडले. कसाल, कुडाळ, पणदूर येथील पुलांची अवस्थाही बिकट असल्याचे स्थानिक सांगत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खचले. रस्ते बांधत असताना- तयार करत असताना जर अशाप्रकारे बांधकामाचा सुमार दर्जा समोर येत असेल तर हा रस्ता पुढील शंभर वर्षे टिकणार कसा? हा प्रश्न आहे. पुढील दहा वर्षात या महामार्गाची स्थिती किती विदारक भयावह असेल याचे चित्र स्पष्ट होत आहे. ह्या महामार्गासाठी शासनाचे अर्थात जनतेचे हजारो कोटी रुपये खर्च होणार आहेत.
मागील वर्षी सुद्धा या महामार्गावर अनेक दुर्घटना घडल्या. महामार्ग लगतच्या घरांना त्याचा त्रास झाला, अतोनात नुकसान झाले. रस्त्यावरून वाहने चालवणे म्हणजे जीवावर उदार होऊन प्रवास करणे. यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी अनेकवेळा महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तसेच संबंधित ठेकेदारांना जाणीव करून दिली; परंतु महामार्गाच्या निर्मिती कार्यामध्ये कोणताही बदल ठेकेदाराने केला नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या कामकाजाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले, हे स्पष्ट होत आहे. गेल्यावर्षी आमदार नितेश राणे यांनी हेतुपुरस्करपणे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांबाबबत कठोर भूमिका घेतली; ती खरोखरच कायद्याला धरून नसली तरी लोकभावनेचा तो उद्रेक होता. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतरही ठेकेदार आणि अधिकारी यांनी आपले वर्तन सुधारले नाही. हीच दुर्दैवाची बाब आहे.
प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि ठेकेदार कंपनीचा उन्मतपणा थांबविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी करावी. ह्या संपूर्ण महामार्गाचा दर्जा शास्त्रीयदृष्या तपासावा, स्थानिकांचे प्रश्न त्यांनी समजून घ्यावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युती शासनाच्या कालावधीत महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून केलेले कार्य नेहमीच स्मरणात राहणारे आहे. कारण मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे, त्याचप्रमाणे ५५ उड्डाण पुल आणि त्यांच्या कारकिर्दीत झालेले रस्ते त्यांच्या कारकिर्दीची यशस्वी पताका फडकवीत आहेत. केंद्रीय मंत्री म्हणूनही नितीन गडकरी यांचे काम दैदिप्यमान आहे. त्यांच्या प्रामाणिक आणि कार्यक्षम कार्याला त्यांचेच अधिकारी आणि मस्तवाल ठेकेदार गालबोट लावीत आहेत. आता हे थांबवा…
अन्यथा सगळा दोष शासनकर्त्यांवर येणार आहे.
-नरेंद्र हडकर
अवश्य वाचा… जनतेच्या जीवावर उठणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना कुठली भाषा समजणार?