अस्मिता भवनात भारताचा ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा
शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून नवा आदर्श!
मुंबई:- जोगेश्वरी पूर्व येथील अस्मिता भवनात भारताचा ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थिनी कु. प्रांजल पवार व कु. पूर्वा पालकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अस्मिता संस्थेने नवा आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी ‘बलसागर भारत होवो’ हे सांघिक गीत उपस्थित सर्वांनी गायले. संस्थेचे अध्यक्ष श्री.शेखर पारखी यांच्या शुभहस्ते मार्च २०१९-२० आणि २०२०– २१ दहावीत गुणानुक्रमे पहिल्या आलेल्या तीन विद्यार्थ्यांचा तसेच स्कॉलरशिप व वक्तृत्व स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संतोष फडतरे तसेच शिक्षणप्रकल्प प्रमुख श्री. सुनील जाधव आणि संस्थेचे अध्यक्ष श्री. शेखर पारखी सर यांनी उपस्थितांना शुभसंदेश दिले. उपस्थित सर्वांचे आभार प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.रचना पवार यांनी मानले.
अस्मिता संस्थेच्या तीनही विभागाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थचे विश्वस्त, सदस्य व कर्मचारी सहभागी झाले होते.
रक्तदान शिबिर संपन्न…
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही १५ ऑगस्टला रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले. श्रीकृष्ण (दादा) घैसास स्वास्थ्य सेवा केंद्र आणि अस्मिता माजी विद्यार्थी संघाच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर ज. पारखी यांच्या हस्ते झाले. रक्त संकलन करण्यासाठी जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयातील रक्तपेढीचे सहकारी व डॉक्टर्स यांचे सहकार्य लाभले. एकूण ६३ रक्तदात्यांनी याप्रसंगी रक्तदान देऊन हा उपक्रम यशस्वी केला.