तेजस्विनीला अखेरचा सलाम!

कर्तबगार महिला पोलीस अधिकारी अनिता चव्हाण हिला भावपूर्ण श्रद्धांजली!

दादरच्या शिंदेवाडीतील शिवनेरी इमारतीमधील मंदाकिनी शांताराम परब (हिवाळेकर) विवाहानंतरच्या अनिता अनिल चव्हाण हिचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

अनिता अनिल चव्हाण ह्या बालपणापासून अतिशय हुशार, हजरजबाबी, मेहनती आणि कर्तृत्ववान! त्या एसएनडीटी महाविद्यालयामधून पदवीधर झाल्या! महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी एनसीसीत प्रवेश घेतला, सिव्हिल डिफेन्स व कराटे इत्यादींचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. त्या धाडसी, कष्टाळू आणि ध्येयवादी असल्याने त्यांनी प्रत्येक ठिकाणी यशाचा पाया रोवला. पोलीस विभागात अधिकारी पदावर त्यांची नियुक्ती झाली व सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरून २०१४ रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या. दरम्यानच्या काळात त्यांनी मुंबई येथील सांताक्रुज पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून तर महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे १९९० ते ९३ दरम्यान ४२ महिला पोलीस उपनिरीक्षकांना प्रशिक्षण दिले. कोकणच्या नागरी हक्क संरक्षण शाखेतही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. पोलीस प्रशिक्षण खंडाळा-लोणावळा येथे त्यांनी उपप्राचार्य म्हणून अनेक वर्षे सेवा दिली. रत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी डिवायएसपी म्हणून काम केले. व्हीआयपी संरक्षण व सुरक्षा शाखा मुंबई येथून त्या २०१४ साली सेवानिवृत्त झाल्या.

पोलीस खात्यात त्यांनी प्रामाणिक, कार्यक्षम व निष्कलंक सेवा देऊन अनेक पारितोषिके मिळविली. पोलीस खात्यात एक आदर्श महिला अधिकारी म्हणून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने शिवाजी नाट्य मंदिर येथील सभागृहात त्यांचा भव्य सत्कार करून मराठा तेजस्विनी पुरस्कार – २०१४ मध्ये प्रदान करण्यात आला होता.

त्यांच्या पश्चात पती ऍड. अनिल चव्हाण, दोन मुली, एक मुलगा, जावई नातू असा परिवार आहे. रत्नागिरी जिल्हयातील वाटुळ पंचक्रोशीतील आदर्श विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय प्रशालेत अनिता चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

शिवनेरी इमारतीमधील आदर्शवत अशा कर्तबगार महिला पोलीस अधिकारी म्हणून नावाजलेल्या अमिताचे जाणे शिवनेरीवासियांना दुःख देणारे आहे.

-मोहन सावंत