आनंदाच्या भेटी आणि भेटीचा आनंद…
वर्तमानकाळातील प्रत्येक `क्षण’ क्षणाक्षणाला भूतकाळात जात असतो. हा भूतकाळ पुन्हा आणता येत नाही; हे खरं असलं तरी त्या भूतकाळातील आनंदाचे क्षण पुन्हा पुन्हा व्यक्त करता येतात, अनुभवता येतात आणि त्याची अनुभूती काही औरच असते. भूतकाळातील आनंदाचे क्षण पुन्हा अनुभवण्याची अनुभूती जीवनात चिरंतर टिकून राहते. हे आम्ही सर्वांनी अनुभवलं…
कामगार राज्य विमा योजना, मुंबई येथील कार्यालयातून १५-२० वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या सहकाऱ्यांनी आनंदाचे क्षण दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ रोजी पुन्हा जीवंत करण्याचा प्रयत्न केले.
आयुष्यातील ३५ ते ४० वर्षांचा खूप मोठा काळ ज्यांच्यासोबत घालविला; एकमेकांच्या सुख – दुःखात सहभागी झालो; त्या माणसांना एकत्रित भेटीचा आनंद खूप मोठा. एकेकाळी आपल्यावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी, मनातलं सगळंच आपल्याला सांगणारी, आमच्या ऑफिस जगतातील आमचे आदर्श सहकारी, हितचिंतक, सहृदयी मित्र यांच्या भेटीचा आनंद शब्दांकित करणं सोपं नाही.
कोरोना महामारीच्या काळात एकमेकांकडे जाणं-येणं बंद झालं होतं. प्रत्यक्ष भेट नाही, एकमेकांचं दर्शन नाही. अशा परिस्थितीत सरासरी वय वर्षे ७० असलेले १५० सहकारी एमआयजी क्रिकेट क्लब, वांद्रे, मुंबई येथे एकत्र आले, आनंद लुटण्यासाठी!
‘अरे, किती दिवसांनी भेटतोस?’
‘अरे तुझा चेहरा आज असा का दिसतोय?’
‘अय्या! तू किती दिवसांनी दिसली?’
‘आपण किती दिवसांनी भेटतोय?’
‘ मी पण खरे तर खूप मिस करत होते गं!’
असे शब्द कानी पडू लागले.
मग एकमेकांशी गळाभेट, पाठीवरील मायेचे हात फिरू लागले. प्रेमळ विचारपूस. काहींच्या डोळांच्या कडा ओल्या. असा माहोल.
जे सहकारी आता नजरेतही दिसेनासे झाले त्यांच्याही आठवणींनी हळवेही झालो.
अनेकजण आपले आजार, वेदना, विवंचना विसरून आले. हैद्राबाद येथून श्री. सुरेंद्र पसनुरी, गोव्यातून श्री. विनोद गुळगुळे, कणकवलीहून श्रीमती ज्योती आमणे, सोलापूरहून श्री. नागनाथ लुथे, पुण्यातून डॉ. उत्तम कुरे, श्री. अशोक मगर आले. तर जे सहकारी काही कारणास्तव येऊ शकले नाहीत, त्यांनी हा भेटीचा योग हुकल्याची खंत व्यक्त केली.
आमचे आदरणीय सहकारी श्री. बी. जी. साळुंके साहेब यांच्या १०४ वर्षे वयाच्या वडीलांच्या प्रकृती सध्या बरी नाही. त्यामुळे त्यांना वैयक्तिकरित्या हजर राहता येत नसल्याने खंत व्यक्त केली व सगळ्यांप्रती स्नेह व्यक्त करून स्नेहसंमेलनास शुभेच्छा दिल्या.
प्रत्येकजण एकमेकांच्या भेटीसाठी आतुर होते. चेहऱ्यावर उत्सुकता होती. गुलाब पुष्प देऊन प्रत्येकाचे स्वागत झाले. सगळे आसनस्थ झाल्यावर जे सहकारी आज हयात नाहीत त्यांना उभे राहून त्यांना दोन मिनिटे मुक श्रध्दांजली अर्पण केली.
तदनंतर दीप प्रज्वलन झाल्यावर श्री. विश्वनाथ सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. श्री. मायकल परेरा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात स्नेहसंमेलनाचा हेतू सांगितला. डॉ. राजेश स्वामी यांनी आपल्या मनोगतात स्नेह मेळाव्याची गरज नेमक्या शब्दात व्यक्त केली. डॉ. हेमंत भारती यांनी स्नेहसंमेलनाची उपयुक्तता सांगून असे स्नेहमेळावे नियमित व्हायला हवेत; असे आपल्या मनोगतात म्हटले.
त्यानंतर जेष्ठतम सहकारी श्रीमती मुरुडेश्वर, श्री.मधु चव्हाण, श्री. एम. आय. पांगारकर व त्याच दिवशी वाढदिवस असलेले श्री. दिलीप पवार यांच्या हस्ते केक कापून भेटीच्या आनंदाची सुरुवात झाली. नंतर गप्पागोष्टी, गाठीभेटींचा उत्सव सुरू झाला.
या गाठीभेटी आणि गप्पागोष्टीत सगळे गुंग झाले. श्रीमती सुनिता पंडित, श्रीमती वृंदा पारकर या जेष्ठ सहकाऱ्यांसह सर्वजण आपापला आनंद शोधत आणि तो वाटत होते. जेवणाची वेळ झाली आहे हेही विसरून गेले. कोणालाही जेवणाचे भानही नव्हते. `जेवायला चला’ असे वारंवार सांगूनही कोणी जागचे हलत नव्हते.
बरेच वेळा विनंती केल्यानंतर सगळ्यांनी भोजन घेतले व करमणूकीला सुरूवात झाली. आमचे सहकारी मित्र श्री. शरद इंगळे यांनी काही बहारदार गाणी पेश करून सगळा माहोल बदलला. त्यांच्या गाण्यांना सर्वांनी भरभरून दाद दिली. नंतर श्री. श्याम गीध व श्री. विनायक देशमुख यांनीही छान गाणी म्हणून रंगत आणली. श्री.शरद इंगळे यांनी गायिलेल्या `भोली सुरत दिलके खोटे, नाम बडे और दर्शन छोटे’ या बहारदार गाण्यावर श्री. मोहन सावंत, डॉ. माया वानखेडे, डॉ. पुप्षा गायकवाड, श्री.चंद्रकांत शिरोडकर, श्रीमती दिव्या शहासह अनेकांनी आपले वय विसरून नृत्याचा आनंद घेतला.
श्री. विश्वनाथ सावंत यांनी एक प्रश्न मंजूषेचा मजेशीर कार्यक्रम घेऊन सर्वांना त्यात सहभागी करून घेतले. स्त्री सहकाऱ्यांनी याचा जास्त आनंद घेतला. वेळ तर पुढे सरकत गेला व हॉल रिकामा करण्याची वेळ झाली. सगळे आनंदात दंग होते. त्यामुळे इच्छा नसताना आम्हाला आवरते घ्यावे लागले.
या भेटीगाठीत, गप्पागोष्टीत लहान मोठ्या सीमारेषा धूसर झाल्या. भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागले नाही. चेहऱ्यावर येणारे भावच सर्व गोष्टी व्यक्त करीत होते. असा हा भेटीचा आनंद दिल्याबद्दल प्रत्येकजण आयोजकांना धन्यवाद देत होता. परंतु आपल्या साऱ्या विवंचना, आजार, वेदना विसरून १५० सहकारी आनंद भेटीत सहभागी झाले. त्यांच्या सहभागामुळेच या स्नेहसंमेलनाची शोभा वाढली व स्नेहसंमेलन यशस्वी झाले हे सत्य आहे. त्यामुळे या आनंदी भेटीचे खरे मानकरी हे सर्व सहकारी आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद!
श्री. विश्वनाथ सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम करून स्नेहसंमेलनात रंगत आणली. डॉ. राजेश स्वामी आणि डॉ.श्रीकृष्ण पवार यांचे मार्गदर्शन व सहकार्य व श्री.संतोष देसाई व श्री.रविंद्र चव्हाण वेळोवेळी घेतलेल्या सर्व प्रकारच्या तपशीलवार नोंदी यामुळे हे स्नेहसंमेलन खूप यशस्वी झाले. श्री.मोहन सावंत यांनी एमआयजी क्रिकेट क्लब वांद्रे येथील हॉल मिळवून देण्यासह हरप्रकारे मदत केली. तसेच हा आनंद सोहळा यशस्वी करण्यास श्री. विश्वनाथ सावंत, श्री. संतोष देसाई, श्री.रविंद्र चव्हाण, श्री. किशोर पांडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शेवटी श्री. विश्वनाथ सावंत यांनी उपस्थितांचे परत एकदा आभार मानले व पसायदानाने या आनंद भेटीची सांगता झाली. `पुन्हा लवकरच भेटू’ हा संकल्प करून ह्या एकाच निर्धाराने एकमेकांचा निरोप घेतला.
शब्दांकन:- मायकल परेरा
संपादकीय संस्कार:- मोहन सावंत