युगपुरुष पी. ए. कर्ले साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
शिक्षणाच्या प्रसारासाठी समर्पित जीवन जगणारे
ज्ञानयोगी – कर्मयोगी युगपुरुष पुंडलिक अंबाजी कर्ले साहेब!
देवगड तालुक्यातील शिरगांव पंचक्रोशी म्हटल्यावर ज्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे, ज्यांचा आदर्श प्रत्येकाच्या जीवनात असावा आणि ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचा उभा केलेला हिमालय पाहावा; असे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे ज्ञानयोगी – कर्मयोगी युगपुरुष पुंडलिक अंबाजी कर्ले साहेबांचं!
शिरगांवसारख्या ग्रामीण भागात आपली नोकरी यशस्वीपणे सांभाळत शिक्षण प्रसारासाठी समर्पित जीवन जगणारे पुंडलिक अंबाजी कर्ले साहेबांची आज जयंती! त्यानिमित्ताने त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांचे पुण्यस्मरण करण्यासाठी शब्द फुलांची माळा मी शिरगांव पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांतर्फे कर्ले साहेबांना अर्पण करीत आहे.
समाजातील गरीब, कष्टकरी लोकांच्या मुलांना त्यांच्या गावाच्या आसपास जोपर्यंत शिक्षण मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्यांची प्रगती होणार नाही, त्यांचे जीवन सुखी- आनंदी होणार नाही आणि देश सामर्थ्यशाली होणार नाही; ही लोककल्याणाची अनमोल दृष्टी ठेऊन कर्ले साहेबांनी केलेल्या कार्याने त्यांच्या नावाचा उच्चार केला तरी, त्यांचे स्मरण केले तरी, त्यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले तरी जी ऊर्जा मिळते ती समाजाचं भलं करण्यासाठीचे बळ देऊन जाते; जी शुभ स्पंदनं मिळतात ती लोककल्याणाचे ध्येय निश्चित करते. सामाजिक जीवनात प्रामाणिक आणि कार्यक्षमतेने कार्य करण्याची समर्थता मिळते. त्या कर्ले साहेबांच्या महान कार्यासमोर नेहमीच नतमस्तक राहावंच लागतं.
कर्ले साहेबांसारखा एक सामान्य मनुष्य आपल्या कल्याणकारी ध्येयाला गवसणी घालून समाजाला शिक्षणासारखं मौल्यवान परीस देऊन ठेवतात; त्यामुळे ते युगपुरुषच ठरतात. अशा युगपुरुषाला सलाम करताना त्यांच्या ध्येयधोरणांशी आम्ही प्रतारणा तर करीत नाही ना! हा विचार आपण सर्वांनी नक्कीच केला पाहिजे. किमान युगपुरुषांनी उभ्या केलेल्या पवित्र संस्थेत कार्य करीत असताना, त्या संस्थेत पदांवर काम करीत असताना पुढील पिढीतील लोकांनी संस्थापक असणाऱ्या युगपुषांच्या ध्येय धोरणांशी एकनिष्ठ राहिलेच पाहिजे, प्रामाणिकपणा जपलाच पाहिजे, कार्यक्षमतेने काम केलेच पाहिजे. स्वतःच्या स्वार्थासाठी, पदाच्या हव्यासापोटी सत्य आणि वास्तव लपवून ठेवण्याचे पाप करता कामा नये! तरच युगपुरुष असणाऱ्या पुंडलिक अंबाजी कर्ले साहेबांना आणि त्यांना शिरगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था उभारणीस सहाय्य करणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांना विनम्र अभिवादन असेल.
चुकीच्या गोष्टींना विरोध करणाऱ्यालाच चुकीचा ठरविणे; हे कुठल्याही संस्थेच्या हितास बाधा आणणारे असते. पण काहीजण पावित्र्याचा व सोज्वळ असल्याचा आव आणून स्वस्वार्थ साधणारे संघटितपणे संस्थेच्या प्रगतीसाठी निर्भिडपणे व्यक्त होणाऱ्याला बाजूला करण्याचा गलिच्छपणा करतात. तेव्हा मात्र आपण पुंडलिक अंबाजी कर्ले साहेबांसारख्या युगपुरुषांनी निर्माण केलेल्या व दाखविलेल्या मार्गावरून बाजूला गेलेलो असतो; हे सदैव लक्षात ठेवणे म्हणजेच कर्ले साहेबांचे स्मरण ठेवणे होय.
युगपुरुष असणाऱ्या पुंडलिक अंबाजी कर्ले साहेबांनी पुढाकार घेऊन शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. शिक्षण संस्था उभारणीस अनेक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांनी त्यांना सहकार्य केले. त्यांनी फक्त आणि फक्त तळागाळातील कष्टकरी जनतेच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कार्य केले. अशा शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सदस्य म्हणून माझे आजोबा स्वर्गीय केशव सिताराम धोपटे, स्वर्गीय गोविंद महादेव धोपटे यांनी कार्य केले; तसेच मी मागील दहा वर्षे शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळात कार्यकारणी सदस्य म्हणून संस्थेच्या हितासाठी प्रामाणिकपणे सडेतोडपणे विचार मांडतोय. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणतोय. ह्या सर्वाचा मला अभिमान आहे.
युगपुरुष पुंडलिक अंबाजी कर्ले साहेब हे माझे दैवत आहे. त्या दैवताची शपथ घेऊन सांगतोय की, संस्थेत काम करताना मी माझा स्वार्थ (आर्थिक असो वा पदाचा) अजिबात साधला नाही, साधत नाही आणि साधणार नाही. तसेच संस्थेच्या हितासाठीच झगडत राहीन! त्या दैवताला पुन्हा एकदा विनम्र अभिवादन!
– श्री. संदिप गोपीचंद धोपटे
कार्यकारणी सदस्य- शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई