गांधी विचार कृतीत आणणाऱ्या जेष्ठ आदर्शाला सलाम!

ज्येष्ठ गांधीवादी- सर्वोदयी कार्यकर्ते जयवंत मटकर यांचे पुण्यात निधन!

गोपुरी आश्रमाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते, महात्मा गांधी प्रस्थापित वर्धा आश्रमाचे माजी अध्यक्ष, सर्वोदयी परिवाराचा आधारवड जयवंत मटकर यांचे मंगळवार दिनांक- १४, मार्च, २०२२ रोजी सायंकाळी ८.४५ वाजता पुणे येथे वयाच्या ८१ व्या वर्षी दुःखद निधन झाले.

जयवंत मटकर यांनी ऐन तारुण्यात गांधी विचारांच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. आणि ते शेवटपर्यंत गांधी विचारांच्या व सर्वोदयी विचारांच्या चळवळीशी निष्ठावंत राहिले. संपूर्ण देशभर सर्वोदय विचार तळागाळात पोचण्यासाठी ते सातत्याने क्रियाशील राहिले. सर्वोदय चळवळीतील कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात ते सक्रिय सहभागी असत. कार्यकर्त्यांच्या अडीअडचणींत ते स्वतः पदरमोड करून मदत करत असत. सर्वोदयी कार्यकर्ते त्यांना आदराने ‘बापू’ असे म्हणायचे.

गेली दोन वर्षे कोरोना महामारीच्या काळात त्यांना घरातून बाहेर पडता आले नाही, म्हणून त्यांची प्रचंड घुसमट होत होती, असे ते कार्यकर्त्यांना नेहमी फोनवर सांगत असत.

गोपुरी आश्रम हे त्यांनी आपल्या जीवनाचे मिशन मानले होते. अप्पासाहेब पटवर्धन यांनी निर्माण केलेला गोपुरी आश्रम अबाधित राहायला हवा, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असायचे. अलीकडे त्यांची तब्येत त्यांना साथ देत नव्हती; तशा परिस्थितीतही ते सातत्याने गोपुरी आश्रमाचीच चौकशी राहीले. रुग्णालयात अतिदक्षता विभागात असताना सुद्धा गोपुरी आश्रमाची चौकशी करायचे.

कुडाळ येथे स्वतःची पदरमोड करून तळागाळातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी १९७८ साली ‘बॅरिस्टर नाथ पै हायस्कूल’ सुरू केले. सुरुवातीच्या काळात शाळेला अनुदान नव्हते. अशा वेळी प्रसंगी पत्नीचे दागिने गहाण ठेवून शिक्षकांचा पगार देत असत.

एका सच्च्या, प्रामाणिक गांधीवादी कार्यकर्त्याच्या काळाच्या पडद्याआड जाण्याने महाराष्ट्रातील सर्वोदय परिवार, गोपुरी आश्रम परीवार आणि बॅ. नाथ पै विद्यालयाची न भरून निघणारी हानी झाली आहे.

जयवंत भटकर यांच्या पश्चात त्यांची सर्वोदयी विचारांच्या चळवळीची पेरणी तळागाळात पोहोचवण्याचा प्रयत्न करणे; हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे. विचारांशी प्रामाणिक राहणारा कार्यकर्ता म्हणून जयवंत मटकर (बापू) आमच्या हृदयात कायम राहतील.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन विवाहित मुली,जावई, नातू असा परिवार आहे. तसेच सर्वोदय कार्यकर्त्यांचा परिवार हा सुद्धा त्यांचाच परीवार त्यांनी मानला होता.

गोपुरी आश्रमाच्यावतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या जाण्याने गोपुरी आश्रमाची न भरून निघणारी हानी झालेली आहे. त्यांची गोपुरी आश्रमाविषयाची तळमळ आमच्या कायम स्मरणात राहील. त्यांच्या विचारांची कृती आम्ही सातत्याने करत राहू! अशा शब्दात गोपुरी आश्रमाच्या संचालक मंडळाने त्यांना आदरांजली वाहिली आहे. गांधी विचार कृतीत आणणाऱ्या जेष्ठ आदर्शाला सलाम!

-प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर
अध्यक्ष- गोपुरी आश्रम

You cannot copy content of this page