संपादकीय- कोकण सर्वांगिण विकसित करण्यासाठी प्रयास करणारा नेता हरपला!

प्राध्यापक महेंद्र नाटेकर यांच्या निधनाची बातमी मनाला वेदनादायी होती; कारण खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान आणि सर्वांगिण विकसित कोकणचे स्वप्न पाहणारा नेता म्हणून त्यांनी त्यासाठी केलेले प्रयास आम्ही अगदी जवळून पाहिले. त्यांच्यासारखा अभ्यासू नेता जेव्हा जातो तेव्हा अतीव दुःख होते. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजात जन्माला आलेले नाटेकर सर यांनी समाजासह बहुजन समाजाच्या आणि कोकणच्या विकासासाठी जीवनभर राखलेला समर्पित भाव लोप पावला.

मी `उपसंपादक’ म्हणून दैनिक `सिंधुदुर्ग समाचार’मध्ये काम करीत असताना प्राध्यापक महेंद्र नाटेकर कार्यालयात यायचे. तिथूनच आमच्या ओळखीला सुरुवात झाली. तेव्हा त्यांच्याशी सखोल चर्चा करायची संधी मिळायची. दैनिक `सिंधुदुर्ग समाचार’चे संपादक प्राचार्य मुकुंदराव कदम, प्राचार्य आर. आर. लोके आणि प्रा. महेंद्र नाटेकर यांच्या कोकण विकासावरील चर्चेत एक विद्यार्थी म्हणून मी अनेकवेळा सहभागी झालो. कोकण विकासासाठी वैचारिक संकल्पनेचे अधिष्ठान त्या चर्चेत असायचे. खरेखुरे विद्वान, उच्चशिक्षित, अभ्यासू, व्यासंगी, प्रामाणिक आणि कार्यक्षम असणाऱ्या ह्या तीनही थोर व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेल्या असल्या तरी त्यांनी दिलेला विचार आणि केलेला त्याग कोकणच्या विकासासाठी नेहमीच दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक राहील. या तीनही गुरुवर्यांची तपस्या मला जवळून पाहता आली; हेच माझं भाग्य! त्यांच्या विचारांच्या प्रेरणेने आजची युवापिढी कोकणासाठी समर्थपणे उभी राहू शकते; असं माझं मत आहे.

प्रा. महेंद्र नाटेकर यांनी कोकण विकासाची संकल्पना मांडताना कोकणच्या भौगोलिक परिस्थितीचा सखोल अभ्यास केला होता. ते नेहमी सांगायचे की, राज्य सरकारने नेहमीच आणलेल्या योजना – विकासाचे आराखडे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे समोर ठेवून आखण्यात आले. त्यामुळे त्याचा फायदा कोकणाला कधी झाला नाही. प्रचंड पाऊस असूनही पाण्यासाठी वणवण करावी करायची. नैसर्गिक साधनसंसाधने अमाप असताना कोकण कधी समृद्ध झाला नाही. सिधुदुर्ग जिल्ह्याची ओळख `मनीऑर्डरवर जगणारा जिल्हा’ म्हणून व्हायची. कोकणाला कधीच विकासाचा निधी पूर्णपणे मिळाला नाही आणि जो मिळाला तो अर्धवट वापरला गेला. कोकण म्हणजे दुर्लक्षित! अशा परिस्थितीत प्रा. महेंद्र नाटेकर यांनी कोकणला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यासाठी लढा उभारला. पण राजकारणात `अर्थ’कारणाने केलेला शिरकाव आणि ठेकेदारांनी मिळवलेला कब्जा एवढा वरचढ ठरला की, स्वतंत्र कोकण राज्याच्या मागणीला राजकारण्यांनी दुर्लक्षित केले; हे वास्तव आहे. तत्ववादी नेते जर हे राजकारणात स्थिरावले तर आपले काही खरे नाही; अगदी आपल्याला गुरे राखायलाही कोणी देणार नाही; ह्याची जाणीव असलेल्यांनी पैशाचा, गुंडगिरीचा, दबावाचा वापर करून राजकारणात स्थान पक्के केले आणि महेंद्र नाटेकर यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला पुरेसा वाव दिला नाही. म्हणूनच आजही कोकणात शेतीवर आधारित रोजगार नाही, सहकार बहरला नाही, शैक्षणिक संस्थांचे जाळे म्हणावे तसे विणले गेले नाही. त्यामुळे मुंबई- पुण्यासारख्या शहरात जाऊन तरुणांनी आपली विद्वत्ता जगाला दाखवून दिली. मात्र आमचा कोकण शापित राहिला. कोकणात जाणारा महामार्ग आजही पूर्णत्वास जात नाही; हे स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झालेल्या देशातील आणि राज्यातील राज्यकर्त्यांना शोभणारे नाही म्हणूनच प्रा. नाटेकर यांच्या विचारांचे मूल्य खूप मोठे होते आणि ते जपले पाहिजे.

प्रा. महेंद्र नाटेकर यांचे मूळगाव मालवण तालुक्यातील वडाचापाट. ते कलमठ – शिक्षक कॉलनी येथे राहायचे. प्रा. महेंद्र नाटेकर यांनी विकासासाठी अनेक आंदोलने केली, अनेक सभा घेतल्या, गावागावांत बैठका घेतल्या, वैयक्तिक संपर्क साधला! कोकण विकासाचे ध्येयच त्यांच्या जीवनाचे प्रमुख अंग होते. त्यांनी रामेश्वर हायस्कूल, मिठबांव येथे `शिक्षक’ म्हणून काम केले. जांभवडे हायस्कूल-ज्यु. कॉलेज मध्ये ते प्राध्यापक होते. महाराष्ट्र सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. एवढेच नाही तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी केलेले कार्य आणि सभागृहात मांडलेली भूमिका कोकण विकासाला बळ देणारी होती. ते चांगले वक्ते होते, तसेच लेखक होते. सोनवडे घाट मार्ग होण्यासाठी त्यांनी चाळीस वर्षे लढा दिला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अंतुले असताना त्या मार्गाची त्यांनी मंजुरी मिळवली. दुसर्‍या बाजूला जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेल्या वयोवृद्धांना पेन्शनबाबत येणाऱ्या अडचणी – समस्या सोडविण्यासाठी पेन्शनर संघटना स्थापन केली. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार या चरित्रकोशात त्यांच्या कार्याचा समावेश करण्यात आला होता. त्यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार मिळाला होता. कोकण विकास महामंडळात त्यांनी संचालक म्हणून काम केले. वृक्षमित्र सेवा संघाचे ३० वर्षे अध्यक्षपद भूषविले. जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते, सेवादल अध्यक्ष आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख म्हणूनही राजकारणात काम केले. ते सिंधुदुर्ग जिल्हा साक्षरता अभियानाचे प्रचारप्रमुख होते.

ज्वलंत ग्रामीण शैक्षणिक समस्या, शिक्षण विचारधारा, शैक्षणिक युद्धभूमीवर, स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती, सौ. माधुरी महेंद्र नावांची पुस्तके त्यांनी लिहून प्रकाशित केली. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. संदीप नाटेकर, सून डॉ. प्रतिमा नाटेकर, मुलगी डॉ. सई लळीत, जावई सतीश लळीत तसेच नातवंडे असा परिवार आहे.

कोकणावरील अन्याय दूर होण्यासाठी कोकणाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीचा लढा त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत दिला. प्रा. महेंद्र नाटेकर सरांनी संपूर्ण जीवनात कोकण विकासासाठी- सामाजिक- शैक्षणिक कार्यासाठी जो लढा दिला, जो त्याग केला त्याला लाख लाख सलाम! त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन!

-नरेंद्र हडकर

You cannot copy content of this page