बाळासाहेबांचा कोहिनुर हिरा- सन्मा. मनोहर जोशी सरांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

शिवसेनेचा निष्ठांवंत पाईक, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विश्वासू सवंगडी, आदर्श शिक्षक, कायद्याचे पदवीधर, कला विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेले, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व असलेले, मुंबईचे नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष, मुंबईचे महापौर, अखिल भारतीय महापौर परिषदेचे अध्यक्ष, विधानपरिषदेत तीन वेळा आमदार, विधानसभेचे आमदार, शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री, तेराव्या लोकसभेत खासदार, अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष, प्रतिकूल परिस्थितीशी झगडत ज्यांनी राजकारणात, समाजकारणात कोहिनुरत्व प्राप्त केले अशा सन्मानिय मनोहर जोशी सरांना वाढदिवसानिमित्त पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा!

मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी येथे झाला. जोशी सरांचे बालपण अतिशय गरिबीत गेले. त्यांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती. पनवेलमध्ये महाजन नावाच्या शिक्षिकेने त्यांना सात घरांत नेऊन सात जेवणांची सोय केली. पाचवीच्या वर्गात असताना ते स्वतःच्या पायांवर उभे राहिले. नंतर मुंबईत आल्यावर महापालिकेत त्यांनी अँक्टिंग असिस्स्टंट टेंपररी क्लार्कच्या पदावर नोकरीला लागले. परंतु नोकरी करायची नाही, काहीतरी उद्योग करायचा ह्या विचाराने त्यांनी लहानमोठे व्यवसाय केले. मुंबईत कोहिनूर या नावाचे शिकवणीचे वर्ग सुरू केले. पुढे बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाल्यावर दिवस पालटले आणि मनोहर जोशी यांची समाजकारणासह राजकारणात भरभराट झाली.

जोशी सरांचे शिक्षण मुंबईत झाले. ते कायद्याचे पदवीधर आहेत आणि त्यांनी कला विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांनी कोहिनूर क्लासेस, मनोहर जोशी कॉलेज ऑफ आर्ट्‌स, सायन्स ॲन्ड कॉमर्स (धारावी-मुंबई), कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट, कोहिनूर हॉटेल मॅनेजमेन्ट अँड टूरिझम कॉलेज अशा शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. `आयुष्य कसे जगावे?’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे.

त्यांची तीक्ष्ण राजकीय कुशाग्रता, नेतृत्वगुण आणि प्रशासकीय क्षमतांमुळे त्यांना जनतेची कार्यक्षमतेने सेवा करता आली. जोशीसर त्यांच्या स्पष्ट विचारांसाठी ओळखले जातात आणि त्यांचा असा ठाम विश्वास आहे की जबाबदार आणि निरोगी विरोधक लोकशाही राज्यव्यवस्थेच्या बळकटीसाठी खूप योगदान देतात. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात स्वेच्छेने सहकार्य असेल तिथेच लोकशाहीचा विकास होतो. त्यांनी देशातील विरोधी पक्षनेत्यांची राष्ट्रीय संघटना सुरू केली.

केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी पेलण्यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्यातील विविध क्षमतांचा समृद्ध अनुभव उपयुक्त ठरला. केंद्रीय मंत्री या नात्याने त्यांनी अनेक महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेऊन अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम क्षेत्राला बळकटी देण्यात मोलाची भूमिका बजावली. तत्कालीन लोकसभा अध्यक्ष, श्री.जी.एम.सी. बालयोगी यांचे हेलिकॉप्टर अपघातात दुःखद निधन झाल्यानंतर, काही काळ सभापती पद रिक्त होते आणि उपसभापती श्री.पी.एम. सईद यांनी सभापतीपदाची जबाबदारी पार पाडली. १० मे २००२ रोजी, पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वत: श्री मनोहर जोशी यांची लोकसभेचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड व्हावी म्हणून प्रस्ताव मांडला; या प्रस्तावाला गृहमंत्री श्री लालकृष्ण अडवाणी यांनी अनुमोदन दिले. हा प्रस्ताव विचारार्थ आणि मतदानासाठी सभागृहासमोर ठेवल्यावर सभागृहाने तो एकमताने स्वीकारला आणि जोशीसर यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली.

शिवसेनेतील निष्ठावंत शिवसैनिकाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा!

-मोहन सावंत