दूरदर्शी नेत्याच्या संकल्पनेतून साकारली बारामती!

बारामती येथील २ मार्च २०२४ च्या नमो रोजगार मेळाव्याची चर्चा व त्याची प्रसिद्धी खूप झाली आणि भविष्यातही होत राहील. ह्याची कारणे आपल्या सर्वांना ठाऊक आहेतच!

या मेळाव्याचे आयोजक महाराष्ट्र शासन होते. सर्व सरकारी शिष्टाचार (Protocol) पाळणे हे शासनाला बंधनकारक असते. कोणाची कितीही राजकीय आणि वैचारिक अडचण असली तरी! कायद्याच्या आणि नियमांच्या वर कोणीही नाही ( निदान कागदोपत्री तरी )! असे असूनही आपल्या राजकीय महत्वकांक्षेपोटी आडव्या येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचा प्रयास झाला खरा; पण लोकप्रिय आदर्शवत नेतृत्वाला टाळणे काही शक्य झाले नाही! अशा भव्यदिव्य उपयुक्त कार्यक्रमाला लोकप्रिय आदर्शवत नेतृत्वाने येऊच नये; आले तर उलट आपलीच पंचाईत होईल आणि आयोजकांना त्याचा राजकीय फायदा होणार नाही; प्रसिद्धी मिळणार नाही; अशी धास्तीवजा भीती आयोजकांच्या मनात होती, ते उघड झाले. जाणूनबुजून सबबी सांगून `टाळणे’ चालूच होते आणि प्रसारमाध्यमांनी हाच मुद्दा ठळक केला. आयोजकांवर प्रश्नांचा भडीमार झाला. जाणतेपणी राजशिष्टाचारचा भंग आयोजकांनी केला होता. कुठल्याही कार्यक्रमाची निमंत्रण-कार्यक्रम पत्रिका महत्वपूर्ण असते. मात्र सन्माननिय शरद पवार साहेबांचे नाव कार्यक्रम पत्रिकेवरून गायब केले गेले. ह्यालाच हिंदीमध्ये `घटिया’ राजनीती म्हटले जाते.

ह्यामध्ये राजकीय दबावाखाली काम करणारे सनदी अधिकारी जबाबदार नव्हते; तर त्यामागे `बोलविते  तीन धनी’ ह्यांचा राजकीय हव्यास होता. कोणी कोणाला नाराज करायचे नाही; असा हा पोरकट खेळ! इथे कोणाची नावे लिहिण्याची मला गरज वाटत नाही. वाचक तेवढे निश्चितच सुज्ञ आहेत! पण गेल्या पाच दशकांपेक्षा अधिक कालावधीत प्रतिकूलतेचे रूपांतर जनतेच्या कल्याणासाठी-फायद्यासाठी कसे करायचे? हे माहित असलेले शरद पवार साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला!

पुर्वी राजकीय विरोधकांचे वैचारिक मतभेद असायचे;  पण व्यक्तिगत मनभेद नसायचे. (पण हल्ली संशयकल्लोळ व भयगंड ह्यांना कमालीचे चांगले दिवस आले आहेत!) शेवटी नाविलाजाने चुकीची दुरुस्ती केली गेली आणि शरद पवार साहेबांच्या व्यासपीठावरील उपस्थितीने जाणत्या नेत्याला जनतेला पाहता आले. (`आखिर वही होता है जो मंज़ूर-ए-ख़ुदा होता है।’) उपस्थित लोकांनी जोरदार शिट्ट्या आणि टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. त्यामुळे आयोजकाना `दिल अपना और प्रीत पराई…’ ह्या सुप्रसिद्ध गाण्याचा एहसास झाल्यास नवल नाही! रोजगार मेळाव्यात बारामतीकरांनी आणि उपस्थित युवक-युवतींनी शरद पवार साहेबांना दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. ज्याप्रमाणे दमदार उपस्थिती त्याचप्रमाणे त्यांचे विचारसुद्धा अनमोल! ते म्हणाले की, `बेरोजगारीची समस्या देशात गंभीर असल्याने तरुणांसमोर नोकरी मिळविण्याचे आव्हान आहे. पण रोजगार मेळाव्यातून युवक युवतींना रोजगाराची संधी मिळेल.’

यावरूनच आपण कल्पना करू शकतो की, कोणताही `मास लीडर’ स्वतःच्या प्रोटोकॉल जपण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांना महत्व देतो. त्यांच्या दृष्टीने मानापमान दुय्यम असतात. सहनशीलतेची तेवढी जिगर त्यासाठी लागते. सुशिक्षित तरुण तरुणींना आज नोकरीची आवशयकता आहे. नोकरी मिळाल्यास त्यांच्या कुटुंबाचे भले होणार आहे. त्यांची आर्थिक उन्नती होणार आहे. अशावेळी स्वतःच्या मोठेपणापेक्षा किंवा राजकीय फायदा तोट्याचा विचार न करता शासनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले पाहिजे आणि स्वतःच्या मतदारसंघात असा कार्यक्रम असल्यास आवर्जून गेलेच पाहिजे; हा विचार शरद पवार साहेबांनी दिला.

निवडणुकीच्या तोंडावर शासकीय कार्यक्रमाची रेलचेल राजकीय प्रसिद्धीसाठी असते. हे उघड गुपित सर्वांना माहिती असते. ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विकास कामांचा व्हिडीओ दाखविला गेला. त्यातील निवेदनही छान होते. त्यामध्ये बांधकाम म्हणजेच विकास कसा असतो? विविध शासकिय सुसज्ज इमारती कशा बांधल्या गेल्या ( चांगली गोष्ट आहे ) यावर भर होता. चांगल्या ठेकेदाराला ठेका दिला व पीएमसी चांगला नेमला की बांधकाम कसे दर्जेदार होते; ते त्या निमित्ताने पाहता आले.

बारामती म्हटल्यावर विकासाचे नॅशनल रोल मॉडेल! अगदी गुजरात मॉडेल पेक्षा जुनं, भारी आणि वास्तववादी! तरीही बारामती नंबर एकवर नेण्याची घोषणा वल्गनेच्या पंगतीत बसणारी आहे. कारण ह्याच बारामतीचे मॉडेल एवढे प्रसिद्ध आहे की, देशभरातील आमदार खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, उद्योजक तिथे भेट देण्याकरिता येतात. अनेक राज्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी बारामतीत येतात. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनीही बारामतीचा दौरा केला होता.त्यांनी सर्व प्रकल्प पाहिल्यानंतर तेथील वस्तूसंग्रहालयाला भेट दिली होती. त्या संग्रहालयात श्री. शरदचंद्र पवार यांना दौऱ्यावर असताना देशात-परदेशात ज्या भेट वस्तू मिळाल्या त्या ठेवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे जागतिक नेत्यांबरोबर झालेल्या करारांच्या वेळचा तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या कार्यक्रमांचा लेखाजोखा प्रदर्शित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमाची सुंदर छायाचित्रेही इथे आहेत. हे सगळे पाहिल्याशिवाय बारामतीचा दौरा पूर्णत्वास जाणार नाही, असे मला वाटते. येथील शेरा नोंदवहीत कोणालाही `शब्दांच्या पलीकडील..’ असेच लिहावसे वाटेल. माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्वहस्ताक्षरात लिहिलेला शेरा, प्रकट केलेली प्रतिक्रिया वाचली आणि ते स्वत: किती प्रभावित झाले होते; ते सहज समजून आले.

काही वर्षापूर्वी प्रभादेवी सिध्दीविनायक न्यासाची मी बोर्डमेंबर (खजिनदार) असताना आम्ही सर्वजण   बारामतीला कॅन्सर प्रिवेंशन हेल्थ कॅम्पला गेलो होतो. शेतकरी महिला व रोजंदारी करणाऱ्या महिला कॅन्सर प्रतिबंध शिबिराला आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला होता. दरम्यान आम्ही बारामतीचा दौरा केला होता.

बारामतीमध्ये जनतेच्या हिताचा सर्वांगिण सुंदर विकास झालेला आहे. शिक्षण संस्था, शेती उद्योग, रुग्णालय, क्रीडा संकुलं, नाट्यगृह, आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी, क्लायमेट ऍक्शन इनिशिएटीव्ह , इरीगेशन, स्वछता, पार्कस, भाजीपाला-फळे मंडई ,  सहकारी औद्योगिक संस्था,  ब्रॅंडेड कंपन्याचे प्रोडक्शन  युनिट्स असे कित्येक आधुनिक व पारंपरिक उपक्रम पाहायला काही दिवस जातील. भव्य दिव्य अतुलनीय कार्य शरद पवार साहेबांनी केले आहे, पण त्याची कुठे त्यांनी प्रसिद्धी केली नाही. मात्र आता विविध सरकारी कार्यक्रमांसाठी जनतेच्या करोडो रुपयांचा चुराडा करून इव्हेंट साजरे केले जात असतात. हे करोडो रुपयांची बचत झाली तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात किमान एकतरी चांगले वृद्धाश्रम बांधले जाऊ शकते; जिथे निराधार ज्येष्ठ नागरिक सुखासमाधानाने आपले आयुष्य जगू शकतात.

येथील विमानतळही दर्जेदार आणि सुंदर कल्पनेतून उभारले असून श्री. शरदचंद्र पवार साहेबांच्या  संकलपनेतून ते साकार झाले आहे; त्याचा अभिमान वाटतो.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सांगतात की, `बारामती तालुका देशात नंबर एकाचा करणार! एवढेच नाहीतर जागतिक पातळीवर दखल घेतली जाईल असे काम बारामतीत करणार!’ दुसऱ्या बाजूला त्यांच्याच काकांनी अर्थात शरदचंद्र पवार साहेबांनी बारामतीत केलेले कार्य आकाशाला गवसणी घालणारे आहे. प्रत्येक कुटुंबाची आर्थिक उन्नती होण्यासाठी, प्रत्येकाला आरोग्याची आणि शिक्षणाची सोय ह्याच बारामतीत केली आहे. खऱ्या अर्थाने `लोक सांगाती’ असल्याशिवाय हे होत नाही. त्याहीपेक्षा केवळ आणि केवळ दूरदर्शी जन नेताच (Visionary Mass Leader) असं काम करतो; हे सत्य कसे काय नाकारता येईल?

-अॅड.  निर्मला सामंत-प्रभावळकर