नलगे तयासी बोकड कोंबडा| नलगे तयासी टका दोकडा| एका भावाचा भुकेला रोकडा | करी झाडा संकटांचा ||

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

श्री साईसच्चरितात ओवी येते;

नलगे तयासी बोकड कोंबडा|
नलगे तयासी टका दोकडा|
एका भावाचा भुकेला रोकडा |
करी झाडा संकटांचा ||१२४ ||

सद्गुरु म्हणजे परमात्मा! परमात्म्याचे सगुण साकार त्या त्या काळासाठी असलेले रूप.

महिषासुरमर्दिनी, महाकाली, दुर्गा, रक्तदंतीका ह्या आई जगदंबेचीच रूपे आहेत. वाईट शक्तींचा, असुरांचा नाश करून भक्तांना भयमुक्त करणे हेच आईचे वात्सल्य आहे.
त्या असुरांना मारताना आईचे प्रेमळ रूप उग्रतेत बदलते.
त्या उग्र रूपाचे वर्णन आपण मातृवात्सल्यविन्दानम् मध्ये वाचतो.
त्या मातेने असुरांना मारले.

पण कालांतराने तांत्रिक, मांत्रिक या तिच्या रूपाचा गैरफायदा घेऊ लागले. भोळ्या भाबड्या संकटात असणार्‍या भाविकांना ही चुकीची माहिती देऊ लागले की देवीला पशुपक्षांचा बळी दिल्यास देवी आपले काम करते.

तिच्या दातांना रक्त लागलेलं आहे, हातात त्रिशूळ आहे. पण ते कशासाठी? हा विचार करायला हवा.
पण म्हणतात ना गरजवंताला अक्कल नसते.
तसेच संकटात असलेल्या व्यक्तीला त्यातून बाहेर पडण्यासाठी लोकं जे काही सांगतील ते करण्याची तयारी असते. मग ती कुठल्याही मार्गाने……..

जगात चांगली शक्ती आणि वाईट शक्ती, प्रकाश आणि अंधार, परमात्मा आणि वृत्रासुर अस्तित्वात आहेत.
पण श्रद्धावानाने ठरवायला हवे की मला कुठल्या मार्गाने जायचे आहे?

वृत्रासुर काळ्या शक्तीच्या वापराने काही तात्पुरते यश देईलही… पण ते कधीच टिकणारे नसते. दलदलीत फसवणारे असते आणि एकदा का ह्या दलदलीत माणूस सापडला की बाहेरचे प्रकाशाचे मार्ग-पवित्र मार्ग त्याला दिसत नाही किंवा सापडत नाहीत. त्यामुळे तो अधिकाधिक अपवित्रतेच्या दलदलीत रुतत जातो.

बळी कुणाचा देतात तर ह्या गरीब प्राण्यांचा…. ज्यांच्यावर देवीच्या नावाखाली मस्त ताव मारला जातो.
परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू सांगतात… बळी देण्यासाठी कधी वाघ, सिंहाचा वापर होतो का? नाही. कारण वाघ सिंह आपलाच बळी घेतील.

खरंच ज्ञानेश्वरांनी सर्व संतांनी किती प्रयत्न केले ही अंधश्रद्धा दूर करण्याचे?

खरी भक्ती व देव समजून सांगण्यासाठी अख्खे आयुष्य समर्पित केले. पण स्वार्थात बुडालेल्या, कलीच्या प्रभावाखाली असलेल्या अज्ञानी लोकांना हे समजतच नाही.

आपण बघतो-वाचतो; कित्येकजण गुप्तधन मिळावे म्हणून नरबळी, लहान मुलांचा बळी देतात. किती क्रुरता आहे ही…. अमानुषतेचा कळस आहे.
पण कष्ट न करता पैसा मिळवण्याचा हव्यास माणसाला हैवान, सैतान बनवितो.

म्हणुनच ह्या परमात्म्याच्या गुणसंकिर्तनाची गरज असते. एकनाथांनी, नामदेवांनी, चोखोबांनी काय केले?
परमात्म्याचे गुणसंकिर्तन केले… भक्ती काय आहे, कशी करायची? हे सोप्या भाषेत समजावून सांगितले.

आपल्याला सद्गुरु भेटले. अनेक संकटं तर येण्या आधीच त्याने परतवून लावली. ज्ञानरूपी अमृत पाजले. म्हणून आम्हाला या गोष्टी सहज कळतात. पण ज्यांना सद्गुरुंचा आधार नाही ते असेच कुठेतरी भरकटतात. रस्ता चुकतात.

अधर्मी लोकांची संख्या वाढू नये म्हणून आपण आजन्म हे गुणसंकिर्तनाचे कार्य करायला हवे.

ह्या परमात्म्याकडे सर्व काही आहे. त्यानेच तर ही सृष्टी निर्माण केली. सर्व जीवही त्यानेच निर्मिले. मग ह्या परमात्म्याला काय अपेक्षा असणार आमच्याकडून?

आई वडिलांना वाटते, आपल्या मुलाने खूप शिकावे, सन्मार्गी व्हावे, अध्यात्माच्या वाटेचा वाटसरू असावे.
याशिवाय काय बरं अपेक्षा असणार……
हे जर सामान्य आईवडिलांच्या बाबतीत आहे, तर तो परमात्मा तर सृष्टीचा जन्मदाता, विधाता आहे. त्याला आमच्याकडून कशाचीच अपेक्षा नाही.
त्याच्याकडे त्याच्याच विषयी असणारी भक्ती नाही; ती आपण त्याला देऊ शकतो.

मग त्याला जर खूष करायचेच असेल तर आपण फक्त भक्तीचे भरभरून माप देऊ. त्याला समजून घेऊ आणि इतरांनाही समजावून सांगू.

फक्त प्रेम हवे आहे त्याला…
माझे संकटं हे कस्पटासमान आहेत…. पण मला ते डोंगरासारखे वाटतात. माझा सद्गुरु ही संकटं माझ्यापर्यंत येऊ देत नाही. हेच त्यांचे अकारण कारुण्य आहे.
या ओव्यातही गावावर संकट आले. पण जसे श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून इंद्रदेवाच्या कोपापासून वाचविले तसेच साईनाथांनी भयंकर वादळ, वारा, पावसापासून संरक्षण केले.

परमात्मा आमचं सदैव संरक्षण करायला तयार आहेच; मात्र आम्ही त्याच्या चरणी नतमस्तक व्हायला हवे, त्याच्यावरील श्रद्धा आणि विश्वास दृढ असायला हवा. त्यासाठी त्याला कुठल्या पशुपक्ष्यांचा बळीची आवश्यकता नसते!

नलगे तयासी बोकड कोंबडा|
नलगे तयासी टका दोकडा|

आमचा भाव त्याच्यासाठी महत्वाचा आहे. त्या शुद्ध भावाचा तो भुकेला आहे.

एका भावाचा भुकेला रोकडा|
करी झाडा संकटांचा||१२४ ||

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

सुनितावीरा बडवे, औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *