वाघावर ‘जय’श्री मिळविणाऱ्या ‘माऊली’ची एक्झिट दुःखदच!

काळ सायंकाळी अतिशय वाईट बातमीने पुन्हा एकदा तीव्र दुःख झालं. असलदे मधलीवाडीतील जयश्री लोके ह्या माऊलीने आमच्यातून एक्झिट घेतली. नेहमी हसऱ्या चेहऱ्याने आपुलकीने विचारपूस करणारी ही माऊली आज आमच्यात नाही; ही कल्पनाच मान्य होत नाही. पण काळाच्या चक्रात कार्य करणाऱ्या नियतीच्या पुढे मानवाचे काही चालत नाही. दुःख व्यक्त करण्यापलीकडे मानवाच्या हातात काहीच नसते. त्या दुःखात मात्र देह सोडून गेलेल्या व्यक्तीचे सदगुण आपण नक्कीच शेअर करू शकतो; म्हणूनच वाघावर ‘जय’श्री मिळविणाऱ्या ‘माऊली’ला आमच्या परिवाराकडून अक्षरबद्ध श्रद्धांजली!

सन्मानिय रामचंद्र लोके यांच्या धर्मपत्नी जयश्री! आमच्या गावात तेव्हा खूप गरिबी होती. सर्पणासाठी लागणारी लाकडे जंगलातून आणावी लागत. आमची पिढी ह्यातून गेली. नेहमीच जंगलात जावं लागायचं; गुरे चारण्यासाठी, लाकडे आणण्यासाठी, शेती करण्यासाठी. सकाळ संध्याकाळ नदीवर जाणं व्हायचं. त्यामुळे बराचसा वेळ रानावनात जायचा. ही माऊली सुद्धा सत्तरच्या दशकात सायंकाळच्या वेळी लाकडाचा भारा डोक्यावरून घेऊन घरी यायला निघाली. तेवढ्यात दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर झडप मारली. त्याच क्षणी ती सावध झाली आणि जोरदार प्रतिकार केला, मोठ्याने ओरड मारली. अचानक आक्रमक पवित्र घेतल्याने वाघ घाबरला आणि पळाला; पण त्याने केलेल्या जखमेमुळे दोनही पाय मात्र गमवावे लागले. मात्र ह्या माऊलीने त्याचे कधीही दुःख उराशी कवटाळत न बसता आपला संसार फुलविला, बहरविला. म्हणूनच आज ह्या माऊलीची मुलं-नातवंडे उच्चशिक्षित झाली आहेत. हे संस्कार तिने दिले.

किमान वर्षातून एकदा तरी ह्या माऊलीला भेटण्यसासाठी मी जायचो, संवाद साधायचो. ती नेहमीच सर्व कुटुंबीयांची आपुलकीने, ममतेने विचारपूस करायची. घरी येणाऱ्या प्रत्येकाचं ती आनंदाने स्वागत करायची. एवढंच नाहीतर वाडीत कोणी आजारी असेल, वृद्ध असेल त्याला भेटण्यासाठी ती मुलाला सांगून वाहनाने घेऊन जायला सांगायची. हा तिचा प्रेमळ स्वभाव कधीच विसरता येणार नाही. अचानक झडप मारणारा वाघ म्हणजेच संकट! अशा संकटाशी न डगमगता समर्थपणे धैर्याने दोन हात करणाऱ्या ह्या माऊलीचा आदर्श आपण सर्वांनी जपला पाहिजे असा तो उपयुक्त आहे. ह्या माऊलीच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे; ते दुःख सहन करण्याची शक्ती श्री माऊली देवी त्यांना देवो. जयश्री लोके ह्या माऊलीच्या आत्म्याला त्या परमात्म्याने आपल्यात नक्कीच सामावून घेतले असणार! तिला आमच्या पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवारातर्फे, क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन ह्या संकेत स्थळातर्फे आणि आम्हा कुटुंबीयांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!

-नरेंद्र राजाराम हडकर

You cannot copy content of this page