‘क्षा. म. समाज माझा, मी समाजाचा!’ भाव जपणारा अनंतात विलीन….

स्वर्गीय प्रकाश वराडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

काल रात्री अतिशय दुःखद बातमी समजली. आमचे हितचिंतक, स्नेही व मार्गदर्शक प्रकाश (बाळा) वराडकर यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या जाण्याने क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे खूप मोठे नुकसान झाले. कारण क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या भल्यासाठी समाज माझा, मी समाजाचा!’ ही प्रामाणिक भावना त्यांनी शेवटपर्यंत जपली होती. खऱ्या अर्थाने समाज माझा, मी समाजाचा!’ खंदा समर्थक आणि मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेल्याने क्षा. म. समाजाच्या उत्तुंग व्यक्तिमत्वास आपण मुकलो आहोत.

क्षा. म. समाज, मुंबई संस्थेचे ते माजी कार्याध्यक्ष आणि क्षा.म.स. दक्षिण सिंधुदुर्ग विभागाचे कार्याध्यक्ष होते. `समाज माझा, मी समाजाचा!’ ही लेखमाला लिहिताना त्यांनी केलेले मार्गदर्शन खूपच मोलाचे होते. क्षा. म. समाज, संस्थेचे भले व्हावे, संस्थेचा कारभार पारदर्शी व्हावा, संस्थेचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून त्यांची सदैव प्रामाणिक तळमळ असायची. त्यासाठी ते नेहमी सर्वांशी मनमोकळेपणाने संवाद साधायचे. त्यांच्या प्रचंड अनुभवाचा लाभ क्षा. म. समाज संस्थेला मोनोपॉलीच्या वृत्तीमुळे घेता आला नाही; हे दुर्दैव कायमच वेदना देत राहील. क्षा. म. समाज संस्थेपासून नेहमीच प्रामाणिक, ध्येयवादी व्यक्तिमत्वे हेतुपुरस्कारपणे दूर ठेवली गेली. त्याचे दुःख वाटते. मात्र दुसऱ्या बाजूला वराडकर यांनी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून केलेले कार्य अतुलनीय आहे. शिवाजी शिक्षण संस्थेसाठी त्यांनी दिलेले योगदान कधीच विसरता येणार नाही.

स्वर्गीय प्रकाश वराडकर सिंधुदुर्ग बँकेचे माजी संचालक होते. परळ भागातील ते ज्येष्ठ शिवसैनिक होते. सहकार, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात त्यांनी झोकून कार्य केले. प्रामाणिक आणि कार्यक्षमतेने कार्य केल्याने त्यांना त्या त्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा सहवास लाभला. त्यातून त्यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव अधिकाधिक दृढ होत गेला. प्रत्येक मान्यवर मंडळींशी त्यांनी प्रेमाचे आपुलकीचे संबंध प्रस्थापित केले होते. त्यातून त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या विकासासाठी दिलेले योगदान खूप मोलाचे होते. वादविवाद न करता सुसंवादातून कार्य करण्याची त्यांची वाटचाल सदैव स्मरणात राहील.

लक्ष्मी कॉटेजमधील बालपणाचे, तरुणपणाचे ते नेहमीच वर्णन करायचे. जुन्या गोष्टी सांगायचे. आमचे वडीलही त्यावेळी लक्ष्मी कॉटेजमध्ये राहायला असल्याने त्यांची दोस्ती होती. त्या जुन्या गोष्टी त्यांच्याकडून ऐकताना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक बदलाचे स्थितंतर मी नेहमीच त्यांच्या बोलण्यातून समजून घ्यायचो. असं प्रेमळ, अभ्यासू, सुसंवाद साधणारं व्यक्तीमत्व आमच्यातून अचानक निघून गेलं आणि प्रचंड अनुभवाच्या शिदोरीला मुकलो. सामाजिक जाणिवेतून त्यांचं व्यक्तिमत्त्व बहरलं होतं‌. असं व्यक्तिमत्त्व समाजाच्या विकासासाठी नेहमीच अत्यावश्यक असतं; पण ह्या व्यावहारिक स्वार्थाच्या जगात त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष वराडकरांनी केला. सामाजिक क्षेत्रात काम करताना वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात अनेक त्याग करावे लागतात. हा त्यागही त्यांनी समर्पित वृत्तीने केला. अशा व्यक्तीमत्त्वाबाबत आम्हाला नेहमीच आदर वाटतो. हाच आदर स्वर्गीय प्रकाश वराडकर यांच्याबद्दल आमच्या मनात होता, आहे आणि राहील!

त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ते दुःख सहन करण्याची क्षमता त्यांना मिळावी आणि त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी ही परमात्म्याच्या चरणी प्रार्थना! स्वर्गीय प्रकाश वराडकर यांना पाक्षिक ‘स्टार वृत्त’ परिवार, क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन संकेतस्थळ आणि ‘समाज माझा, मी समाजाचा!’ ह्या ब्लॉगच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली!

– नरेंद्र हडकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page