कु. अनिकेतसिंह सदगुरु चरणी विसावला!

|| हरि ॐ || || श्रीराम || || अंबज्ञ ||

४ ऑक्टोबर २०२१, दुपारी सव्वाएक वाजता एक मॅसेज आला. तो वाचला आणि मी निःशब्द झालो. अतिशय दुःखद घटना घडली होती. आमचे श्रद्धावान मित्र आणि पाक्षिक `स्टार वृत्त’चे हितचिंतक अहमदनगर जिल्ह्यातील साकुरचे किशोरसिंह पेंडभाजे यांचा तो मॅसेज होता. त्यांचा सुपुत्र अवघ्या पंचवीस वर्षाचा एकुलता एक अनिकेतसिंह अपघातात आम्हाला कायमचा सोडून गेला आणि सदगुरु चरणी विसावला!

श्री. किशोरसिंह यांना फोन करण्याचे धाडस होत नव्हते…. शेवटी दुसऱ्या दिवशी श्री. किशोरसिंहांना फोन केला. दुःखाचा डोंगर त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलाय. तरीही त्यांना धीर देत बोलतं केलं.

अनिकेतसिंह इयत्ता ५ वी पासून ढोलकी वाजवायचा. सगळ्या कार्यक्रमांमध्ये त्याचा श्रद्धेने सहभाग असायचा. केंद्राचा संपर्क प्रमुख म्हणून त्याने केलेले कार्य कोणीही श्रद्धावान विसरूच शकत नाही. एलएलबीच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या अनिकेतसिंहाने खूप स्वप्ने उराशी बाळगली होती. त्याला भविष्यात एलएलएम करायचे होते, न्यायाधीश व्हायचे होते. त्यासाठी तो मनापासून खूप अभ्यास करीत होता. तर दुसऱ्या बाजूला केंद्राच्या सेवाकार्यात अग्रस्थानी राहायचा. प्रत्येकाशी प्रेमाने वागायचा; त्यामुळे त्याच्यावर प्रेम करणारे श्रद्धावानाही अनेक होते. त्यांच्याशी त्याने जिवाभावाचे नातं जोडलं होतं, जोपासलं होतं, फुलवलं होतं. अनिकेतसिंहाकडे जबरदस्त आत्मविश्वास होता; कारण त्याचा सदगुरुंवर दृढ विश्वास होता. देखणा राजबिंडा अनिकेतसिंह निरंतर समरणात राहील. त्याचे शब्द, त्याचे वागणे, त्याचा स्वभाव विसरता येणे शक्य नाही.

सुसंस्कारित असलेला अनिकेतसिंह आपल्या ८३ वर्षे आजीची सेवा तो आनंदाने करायचा. सगळं काही आनंदाने सुरु होतं. पण अचानक झालेल्या अपघाताने पेंडभाजे कुटुंबियांवर दुःखाचा पर्वत कोसळला. श्रीगुरुपौर्णिमेदिवशी २३ जुलै २०२१ रोजी अनिकेतसिंह परमात्म्याच्या चरणी विसावला.

पेंडभाजे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत! त्यांना दुःखातून सावरण्यासाठी सद्गुरूंनी मनःसामर्थ्य प्रदान करावं; ही मनोभावे सदगुरु चरणी प्रार्थना!

अनिकेत शब्दाचा अर्थ विश्वची माझे घर असे जो मानतो तो अनिकेत! अनिकेतसिंहासाठी त्याचे विश्व सदगुरू होते. त्यांने आपल्या सदगुरूंना विश्व मानले आणि तारुण्यातच सदगुरु चरणी विसावा घेतला! अनिकेतसिंहासाठी आम्हा श्रद्धावानांकडून लाख लाख वेळा अंबज्ञ!

|| नाथसंविध् ||

-नरेंद्र हडकर
संपादक- पाक्षिक स्टार वृत्त