असलदे ग्रामपंचायतीचा सुवर्णकाळ!
ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील शेवटचा आणि महत्त्वाचा घटक; जो गावाला विकासाच्याबाबतीमध्ये समर्थ करीत असतो. अशा असलदे ग्रामपंचायतीला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत; त्या निमित्ताने असलदे गावातील सर्व ग्रामस्थांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि आजपर्यंत झालेल्या सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचे मनःपूर्वक आभार!
मनुष्याला पन्नास वर्षे जेव्हा पूर्ण होतात तेव्हा तो पूर्णपणे अनुभव संपन्न होतो, असे मानले जाते. सामंजस्यपणा, प्रौढपणा, दूरदृष्टी संपन्नता, अनुभव परिपूर्णता येण्यासाठी असा मोठा कालावधी जावाच लागतो. त्याचप्रमाणे एखाद्या संस्थेला सुद्धा पन्नास वर्षे होतात तेव्हा सुद्धा त्या संस्थेशी संबंधित असणाऱ्या सगळ्यांनी विचारांची संपन्नता दाखविली पाहिजे! तरच पन्नास वर्षाच्या काळाचा गर्व बाळगता येऊ शकतो. असलदे ग्रामपंचायतीला पन्नास वर्षे पूर्ण होत असताना अनंत विचारांची आणि आठवणींची मालिका मनामध्ये सुरु होते. कारण असलदे ग्रामपंचायतीत सरपंच पदावर बसणाऱ्या सर्व सरपंच महोदयांचे कार्य अगदी जवळून पाहता आले.
१९८२ मध्ये मी इयत्ता चौथीत असताना असलदे गावात कायमस्वरूपी राहण्यासाठी गेलो. म्हणजे गेली ४२ वर्षे ग्रामपंचायतीचा कारभार मी स्वतः पाहिला आहे, अनुभवला आहे. मी बालपणापासून थोडा चिकित्सक असल्याने त्या बहुतेक गोष्टी मेंदूमध्ये कायमस्वरूपी साठून राहिल्या आहेत. ४२ वर्षाच्या अनुभवातून मी माझ्या पद्धतीने असलदे ग्रामपंचायतीवर नक्कीच चांगले भाष्य करू शकतो; असे मला वाटते! वयाच्या अठराव्या वर्षी माझा पहिला लेख- पहिली बातमी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाली आणि ती बातमी असलदे गावाच्या विकासाच्या संबंधित होती; ह्याचा मला सार्थ अभिमान वाटतो; म्हणूनच मी नेहमीच स्वाभिमानाने सांगतो की, मला माझ्या गावाने खऱ्या अर्थाने पत्रकारितेत आणले.
कोळोशी-असलदे ग्रुप ग्रामपंचायतीत असलदे गावाचे ग्रामपंचायत सदस्य नेहमीच संख्येने अधिक असूनही असलदे गावाचा सरपंच व्हायचा नाही. ही बाब त्यावेळच्या असलदे ग्रामस्थांना खटकत होती. कारण गावातील तरुण नोकरी निमित्ताने मुंबई गाठायचे आणि जे सातवी पेक्षा अधिक शिकले त्यांना सरकारी खात्यात सहज नोकरी मिळायची; परंतु आमचे आदरणीय स्वर्गीय नाना मास्तर (भिवाजी सदाशिव लोकेगावकर) यांनी त्यावेळी गावातील एका धडाडीच्या तरुणाला अर्थात आदरणीय अंकुश डामरे यांना कोळोशी-असलदे ग्रुप ग्रामपंचायतीत १९६३ साली सरपंच पदावर बसविले. ग्रामपंचायतीच्या कामाचा, प्रशासनाच्या कामकाजाचा कोणताही अनुभव नसताना मोठ्या हिम्मतीने आणि धैर्याने डामरे यांनी ग्रामपंचायतीचा कारभार केला. पाच वर्षे विकासाचे यशस्वीपणे कार्य केल्याने असलदे व कोळोशी ह्या दोन्ही गावांनी पुन्हा सरपंच पदाची संधी त्यांना दिली. १९७३ मध्ये असलदे आणि कोळोशी ग्रामपंचायतीचे विभाजन झाले अर्थात दोन गावच्या दोन ग्रामपंचायती स्थापित करण्यात आल्या. १९७३ मध्ये शासनाच्या प्रशासकाने कारभार करून १९७४ साली स्वतंत्र असलदे ग्रामपंचायतीमध्ये असलदे गावाचा सरपंच स्थानापन्न झाला.
स्वतंत्र असलदे गावाचे सरपंच म्हणून आदरणीय स्वर्गीय अंकुश जगन्नाथ परब यांना मान मिळाला. तेव्हापासून आजपर्यंत सरपंच पदावर कार्य करणाऱ्या व्यक्तींची नावे आणि कालावधी पाहूया!
कै. अंकुश परब- २५ मार्च १९७५ ते २६ मे १९८१
श्री. रविंद्र हडकर- २७ मे १९८१ ते २३ डिसेंबर १९८६
श्री. संतोष वायंगणकर- २४ डिसेंबर १९८६ ते ३१ मार्च १९८९
कै. अंकुश परब- १ एप्रिल १९८९ ते १९ नोव्हेंबर १९९२
श्री. सुरेश लोके- २० नोव्हेंबर १९९२ ते २ डिसेंबर १९९७
श्रीमती वंदना हडकर- २८ डिसेंबर १९९७ ते २८ डिसेंबर २००२
श्री. दिलीप फोंडके- २९ डिसेंबर २००२ ते १४ डिसेंबर २००५
कै. शामराव तांबे- १५ डिसेंबर २००५ ते ३१ जानेवारी २००७
श्री. लक्ष्मण लोके- १ फेब्रुवारी २००७ ते २८ डिसेंबर २००८
सौ. सुनिता लोके- (उपसरपंच) २९ डिसेंबर २००८ ते ३१ मार्च २०१०
श्री. विलास जांभळे- (उपसरपंच) २१ जानेवारी २०११ ते २८ डिसेंबर २०१२
सौ. संध्या परब- २९ डिसेंबर २०१२ ते २८ डिसेंबर २०१७
श्री. गुरुप्रसाद वायंगणकर- २९ डिसेंबर २०१७ ते २८ डिसेंबर २०२२
श्री. चंद्रकांत डामरे २९ डिसेंबर २०२२ पासून आजतागायत…
ही यादी पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येईल की, सरपंच पदावर बसणारी व्यक्ती लिंग, जात, धर्म आणि विभाग ह्याप्रभावाने स्थानापन्न झालेली नाही. माझ्या मते अभ्यासू, निःस्वार्थी आणि कार्यक्षम व्यक्ती सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदावर आल्या पाहिजेत. पण स्थानिक राजकीय वातावरणात ते शक्य नाही. असो; तरीही आजपर्यंत झालेल्या सर्व सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचे आजच्या दिवशी मनःपूर्वक आभार मानलेच पाहिजेत. आजचे धडाडीचे सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब आणि सर्व सदस्यांचे अभिनंदन केले पाहिजे; कारण ह्यांच्या काळात असलदे ग्रामपंचायत सुवर्ण महोत्सवी दिवस-वर्ष साजरं करीत आहे.
श्री. रवि हडकर यांचा सरपंच पदाचा कार्यकाळ अनेकांच्या आजही लक्षात आहे. श्री. रवि हडकर तेव्हा रेशनिंग दुकान चालवायचे. गावातील कोणीही गरीब व्यक्ती कितीही वाजता आली तरी पैसे नसताना सुद्धा श्री. रवि हडकर यांनी धान्य दिले. नियम, अटी बाजूला सारून सर्वांना मदत करण्याचे त्यांचे कार्य ग्रामस्थांच्या कधीच विस्मरणात जाणार नाही.
कै. अंकुश परब यांचा सरपंच पदाचा शेवटचा कार्यकाळ पाहिला. मधलीवाडीतील मोडक्या साकवाबाबत, गावातील विहिरींबाबत मी अनेकदा त्यांच्याशी आणि त्यावेळचे ग्रामसेवक देसाई भाऊंशी खडाजंगी केली. पण त्याचा राग कै. अंकुश परब यांनी कधी ठेवला नाही. नेहमीच दिलखुलासपणे ते चर्चा करीत. गावाच्या विकासाच्याबाबतीत ते नेहमीच आक्रमक असायचे. गुरांवर मोफत औषोधोपचार करणारे परब ग्रामस्थांच्या मनात `दादा’ व `माजी’ म्हणून नेहमीच आदरणीय वाटत राहतील. श्री. संतोष वायंगणकर यांनी आणीबाणीच्या परिस्थितीत सरपंच म्हणून केलेले कार्य अतुलनीय आहे. आज ते जेष्ठ पत्रकार आहेत. ते आजही गावाच्या विकासाबाबत पदावर असणाऱ्या सरपंचांना मार्गदर्शन करीत असतात.
.
आदरणीय सुरेश लोके हे खरे कट्टर शिवसैनिक! पण त्यांनी वंचित घटकांसाठी केलेले कार्य आजही ग्रामस्थ आठवणीत ठेऊन आहेत. आजही गावाच्या विकासाबाबत त्यांची तळमळ असते. हेच कौतुकास्पद आहे. श्रीमती वंदना हडकर ह्या आरक्षणातून महिला सरपंच झाल्या आणि त्यावेळी उपसरपंच हरिश्चंद्र लोके यांनी पाच वर्षे उपसरपंच पदावर राहून घेतलेले निर्णय महत्वपूर्ण ठरले. श्री. दिलीप फोंडके यांची सरपंच पदाची कारकीर्द उत्तम होती. कै. शामराव तांबे यांनी सुद्धा गावात सरपंच म्हणून केलेले कार्य अभिनंदनीय होते. ग्रामपंचायतीची भव्य इमारत होण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय उचित ठरले. श्री. लक्ष्मण लोके, सौ. सुनिता लोके- (उपसरपंच), श्री. विलास जांभळे- (उपसरपंच), सौ. संध्या परब यांचीही कारकीर्द कौतुकास्पद ठरली. श्री. गुरुप्रसाद वायंगणकर हे खऱ्या अर्थाने तरुण व धडाडीचे सरपंच ठरले. ह्या माजी सरपंचांना आजच्या दिवशी आमचा मानाचा मुजरा!
माजी पंचायत समिती सदस्य श्री. चंद्रकांत डामरे आजचे असलदे गावाचे प्रथम नागरिक अर्थात सरपंच आहेत आणि समाजसेवेत नेहमीच आघाडीवर असणारे धडाडीचे सचिन परब उपसरपंच आहेत. त्यांनी आणि आजच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी असलदे गावाच्या विकासासाठी अजून क्रियाशील झाले पाहिजे. अनेक विकासाची कामे प्रतीक्षेत आहेत. गावाच्या ग्रामपंचायतीत राजकीय पक्षांचे राजकारण आले की सगळा बट्ट्याबोळ होतो; असे माझे म्हणणे कालही होते, आजही आहे आणि उद्याही असेल. राजकीय पक्षांचे राजकारण गावात नसणं; ह्यातच गावाचे भलं आहे. माझी नेहमीच ही रोखठोक भूमिका असते. त्यामुळे काहीजण नाराज होतात. पण काहीजणांच्या नाराजीपेक्षा गावाचा विकास महत्वाचा, असं मला वाटतं. तरीही आजचा दिवस असलदे ग्रामस्थांसाठी आनंदाचा आहे. म्हणूनच सर्व वादविवाद बाजूला सारून सर्वांचे अभिनंदन!
असलदे ग्रामपंचायतीवर हा लेख इथेच पूर्ण करता येणार नाही. कारण गावाच्या विकासाच्याबाबतीमध्ये कोकण विकास आघाडीचे उपाध्यक्ष बळीराम परब, सिंधुदुर्ग परिवर्तन नवनिर्माण प्रतिष्ठान अर्थात `सिंपन’ प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल तांबे, असलदे विकास मंडळाचे अध्यक्ष सुरेश डामरे, उद्योगपती समाजसेवक विनय नरे, सन्मा. प्रकाश तोडणकर, सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रकाश परब, सोसायटीचे अध्यक्ष पत्रकार भगवान लोके, आदर्श शेतकरी विनोद तांबे आणि सचिन लोके, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रमोद लोके, बचत गटाचे धडाडीने काम करणाऱ्या सारिका खरात, नेहमीच समाजसेवेस तत्पर असणारे अनिल नरे आणि महेश लोके यांनी नेहमीच योगदान दिले आहे. अशा अनेक व्यक्ती होत्या-आहेत ज्यांची लेखन मर्यादेमुळे नावं घेणं शक्य नाही. ह्या सर्वांचे आजच्या दिवशी मनःपूर्वक आभार!
असलदे गावाच्या विकासासाठी सर्वांनी राजकीय मतभेद गावाच्या वेशीबाहेर ठेवून एकत्रित आल्यास खऱ्या अर्थाने असलदे ग्रामपंचायतीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचा स्वाभिमान निरंतर बाळगता येईल! गावाच्या विकासासाठी विचार करायला काय हरकत आहे?
-नरेंद्र राजाराम हडकर