कोरोना विषाणूविरुद्धचे महायुद्ध जिंकण्यासाठी जबाबदारीने वागू!

जगावर खूप मोठं संकट आलेलं आहे. जगातील आजपर्यंत १६० देशात कोरोना विषाणूने प्रवेश केला असून मानवावरील हे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर भयावह अक्राळविक्राळ रूप धारण करीत आहे. जगभरात ३ लाख लोकांना कोरोना विषाणूची लागण लागली असून त्यानां कोव्हिड-१९ हा आजार झाला आहे आणि १३ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक देश ह्या महामारीपुढे हताश झाले आहेत. आपल्या भारतातही ५०० जण कोरोनाग्रस्त असून ९ जण दगावले आहेत. महाराष्ट्र त्यात आघाडीवर असून शासनाने आपल्यापरीने ठोस उपाययोजना आखल्या आहेत.

आम्हा प्रत्येकावर हे महासंकट आलेलं आहे. हा संसर्गजन्य आजार तिसऱ्या स्टेजला असून चौथ्या स्टेजला कधी सुरुवात होईल ते लक्षातही येणार नाही. चीन, इटलीमध्ये मृत्यूचे तांडव आपण पाहत आहोत. अजूनही आपल्या हाताबाहेर वेळ गेलेली नाही म्हणून अगदी प्रत्येकाने शासनाच्या सर्व सूचनांचे पालन केलेच पाहिजे. जर एका व्यक्तीनेही ह्या सूचनांचा भंग केल्यास त्याचे विपरीत परिणाम सर्वांवर होतील. अजूनही मूठभर लोक मुर्खासारखे वागत असून सूचनांचे पालन करीत नाहीत. त्यांच्यामुळे अनेकजण कोरोना विषाणूग्रस्त होणार आहे. त्यामध्ये कदाचित आपणही असू, आपले कुटुंबियही असू शकतील. इटलीसारखी आपल्यावर परिस्थिती येऊ नये म्हणून आम्ही प्रत्येकजण कोरोना विषाणूंच्या विरोधी महायुद्धात दृढपणे संकल्प करून जिंकूया. मनात भीती ठेऊन, घाबरून कुठलीही लढाई जिंकता येत नाही. ही लढाई आम्ही जिंकणारच आहोत. कारण भारताला वैदिक धर्माचे अधिष्ठान आहे. आता आम्ही प्रत्येकजण भान बाळगून जबाबदारीने वागणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *