संपादकीय- शुभेच्छांची जबाबदारी!

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ

आज माझा वाढदिवस असल्याने अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोनवरून, समाजमाध्यमातून खूप खूप शुभेच्छा दिल्या! माझ्यावर दाखविलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद! आपले प्रेम असेच चिरंतर राहू दे; ही सदिच्छा!

आजच्या शुभदिवशी आपल्याशी सुसंवाद साधावा म्हणून हा लेखन प्रपंच!

दरवर्षी वाढदिवस येतो आणि नातेवाईक, मित्रपरिवार, हितचिंतक शुभेच्छा देतात. खरंच खूप आनंद होतो. समाजमाध्यमांमुळे आता आमच्या वाढदिवस लक्षात राहायला लागले. नाहीतर वाढदिवस झाल्यावर दोन तीन दिवसांनी लक्षात यायचे; `अरे आपला वाढदिवस दोन-तीन दिवसापूर्वी होऊन गेला.’ असो ह्या धकाधकीच्या दिवसात, स्पर्धेच्या युगात समाजमाध्यमांच्या माध्यमातून तरी आपण सर्वांच्या सुखात – दुःखात सहभागी होऊ शकतो. त्यामुळे आपण कळत- नकळतपणे एकमेकांशी जोडले जातो. आजच्या समाजमाध्यमांविषयी नकारात्मक गोष्टींचा उदापोह करीत असताना ही सकारात्मक बाब आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. समाजमाध्यमांवर वा कुठल्याही व्यासपीठावर असो, ज्या गोष्टी जबाबदारीने केल्या जातात त्यातून निर्माण होणाऱ्या सकारात्मक गोष्टी ह्या आपल्याला, आपल्या कुटुंबाला, गावाला, समाजाला, देशाला विधायक स्वरूप देणाऱ्या असतात. त्या किती मोठ्या किंवा छोट्या हा मुद्दा गौण ठरतो.

आम्हा सर्वांना अधिकार हवा असतो; पण जबाबदारी नको असते. `समाजमाध्यमांवर व्यक्त होणे’ हा माझा अधिकार आहे. पण समाजमाध्यमांवर कसं- केव्हा- कशासाठी व्यक्त व्हायचं? ही जबाबदारी आम्ही स्वीकारत नाही. आपण कुठल्याही ठिकाणी असू; अगदी कुटुंबात असू किंवा भावकी, वाडी, गाव, चाळ, सोसायटी, संघटना, कंपनी, समाज, देश अशा पातळीवर आम्हाला जबाबदारीने वागता आलं पाहिजे.

ही जबाबदारी स्वीकारली की, स्वतःच्या स्वार्थाला किंमत उरत नाही. जबाबदारी आणि निःस्वार्थ वृत्त्ती ह्यामधून आपण ज्या ठिकाणी असू तेथील विकासाला बाधा ठरणाऱ्या गोष्टींकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाही. त्यामुळे त्या त्या वेळेला जबाबदारीने प्रगतीच्या आड येणाऱ्या चुकीच्या वृत्तीबद्दल रोखठोक भूमिका घ्यावी लागते आणि गावात, समाजात वावरत असताना मी रोखठोक भूमिका घेतो. ती भूमिका कोणाचा द्वेष करण्यासाठी नसते. वैयक्तिक दुश्मनी तर मुळीच नसते. परंतु ह्या भूमिकेमुळे कुवृत्तीच्या लोकांचा स्वार्थ उघड होतो. मग हेच लोक दुश्मनी पत्करतात आणि मग सूडाच्या भावनेने अफवा, बदनामी करायला सुरुवात करतात. त्याचा आम्ही पदोपदी अनुभव घेतो. म्हणून आम्ही पत्रकारिता करताना नेहमी आव्हान करतो की, आमच्याविरुद्ध भ्रष्टमार्ग स्वीकारून गावाचे-समाजाचे नुकसान केल्याचा पुरावा असल्यास जाहीर करा! उगाच बदनामी करू नका! अन्यथा पंचनामा करायला वेळ लागणार नाही. पदांच्या लालसेपोटी आणि सत्तेच्या हव्यासापोटी तडजोड करणारी मंडळी कधीही जबाबदारीने वागत नाही. कारण त्यांना स्वस्वार्थ साधून घ्यायचा असतो. स्वस्वार्थ साधून घेण्यासाठी हीच मंडळी आपल्याकडील अधिकार बेजबाबदार पद्धतीने वापरात असतात आणि आपल्या संघटनेला, त्या यंत्रणेला खड्ड्यात घालत असतात.

म्हणूनच आपल्याला माणूस म्हणून त्या आदिमातेने- त्या परमात्म्याने जन्माला घातलं आहे आणि आपण काही अमरत्वाचा पट्टा घेऊन जन्माला आलो नाही. जसे रिकाम्या हाताने आलो तसंच कधीतरी रिकाम्या हाताने जाणार आहोत; ह्याचे प्रत्येक क्षणाला भान ठेवले तर सत्ता, सत्तेतून येणारी संपत्ती, सत्तेतून येणारा माज, अहंकार संपुष्ठात येईल!

माझी व माझ्या कुटुंबाची आर्थिक सामाजिक प्रगतीसाठी मला झटायलाच हवे. पण मी ज्या गावात- समाजात राहतो, ज्या संस्थेचा-कंपनीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सभासद असतो; तेथील वाटोळं करून मी माझा व माझ्या कुटुंबाचा स्वार्थ साधत असेल तर तो राक्षसी मार्ग झाला. ह्या मार्गावर तात्पुरता विजय झाल्यासारखा वाटेल; पण तो विजय नसतो तर भविष्यात रावण-कंस-महिषासुरराचा जसा नाश झाला तसा नाश होण्याचा संकेत असतो.

आपण जर जबाबदारीने वागलो तर मी ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या संस्थेचा- यंत्रणेचा निश्चितच सर्वांगिण विकास होईल. आपला हाच खरा विजय असेल जो चिरंतर अस्तित्वात राहील.

माझा गाव असलदे! मी पाक्षिक `स्टार वृत्त’च्या माध्यमातून पत्रकारिता करतोय. मी क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेचा सभासद आहे. मी महाराष्ट्रात राहतो, भारताचा मी नागरिक आहे, मी विविध सामाजिक संघटनांमध्ये कार्य करतोय. ह्या सर्व ठिकाणी मी जबाबदारीने वागतोय; म्हणूनच मी योग्य मार्गावरून प्रवास करतोय! ह्या प्रवासात माझ्या प्राथमिक शाळेतील शिक्षिका सौ. हेमांगी खोचरे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील श्री. अमर पारकर, महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. संभाजी शिंदे, माझे पत्रकारितेतील गुरु स्वर्गीय प्राचार्य मुकुंदराव कदम यांनी मला विचारांचे बळ दिले. तर परमपूज्य सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंनी मला सामर्थ्य दिले.

ह्या जबाबदारीने वागण्याच्या प्रवासात माझ्या कुटुंबियांना, माझ्या सहकाऱ्यांना, मित्रांना खूप मोठा त्याग करावा लागला किंवा करावा लागतोय… पण त्यांनी साथ सोडली नाही. नेहमीच पितृत्वाप्रमाणे सल्ला देणारे मोहन सावंत असोत वा आमच्या प्रामाणिक भूमिकेवर नेहमीच शिक्कामोर्तब करणारे सुरेश डामरे असोत किंवा सदैव पाठीशी राहणारे विनय नरे असोत व बापू भक्त परिवारातील अनेक श्रद्धावान असोत! स्वर्गवासी झालेले आप्पासाहेब दाभोलकर असोत वा `स्टार वृत्त’ची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी कार्य करणारी व कायमच पडद्याआड राहिलेली स्वर्गवासी ताई असो वा वेबसाईटची बाजू भक्कमपणे सांभाळणारे स्वर्गवासी निलेश कंटक असो वा माझ्यावर माया करणारी माझी स्वर्गीय सासू असो; अशी अनेक नावे माझ्या हृदयात कोरली गेली आहेत. आजच्या दिवशी त्या सगळ्यांची आठवण येणे साहजिकच आहे.

भविष्यात शब्दांच्या अर्थात लेखांच्या माध्यमातून नक्की भेटू! काही चूक असल्यास क्षमस्व! विधायक कामांसाठी आपली साथ अशीच राहील ही अपेक्षा!

आजच्या दिवशी तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. तुम्हाला परमात्म्याचा कृपार्शिवाद सदैव लाभो; ही आदिमाते चरणी प्रार्थना!

नाथसंविध्

– नरेंद्र राजाराम हडकर