स्वर्गीय स्वरमाधुर्याचा या इहलोकातील मूर्तिमंत अवतार लतादीदी!

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा – गानसम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात सुरु असताना आज सकाळी ८.१२ मिनिटांनी निधन झाले.

गानसम्राज्ञी लता दीदींनी आपला देह सोडला आणि आपला सुस्वर परमात्म्याच्या चरणी समर्पित केला. त्यांच्या जाण्याने हिंदुस्थानी मन हळहळले, दुःखीत झाले. विश्वाला प्रसन्न करणाऱ्या स्वराचा गेल्या ८० वर्षाचा प्रवास आज थांबला. हा प्रवास जरी थांबला असला तरी त्यांनी गायलेल्या गाण्यांच्या रूपाने त्या युगानयुगे ह्या विश्वातील कणाकणात असणार आहेत. ज्या स्वरांमध्ये सामर्थ्य होते अख्ख्या विश्वाला आनंदित करून स्वरमय करण्याचे! हे सामर्थ्य प्रकट करणारा देह जरी सोडला असला तरी सूर्य, चंद्र आणि लता दीदींचा स्वर आमच्या बरोबर राहणार आहेत. अनेक पिढ्या येतील आणि जातील; पण ह्या विश्वाला लतादीदींचा स्वर नेहमीच प्रेरणा देत राहील.

२८ सप्टेंबर १९२९ साली जन्मलेल्या लतादीदींनी ह्या मातृभूमीवर प्रेम केले. देशावरील प्रेमभावना त्यांच्या गायनाने नेहमीच प्रकट झाल्या. वयाच्या पाचव्या वर्षांपासून आपल्याच वडिलांच्या संगीत नाटकात बाल-कलाकार म्हणून कामाची सुरूवात केली. इ.स. १९४२ मध्ये लतादीदी अवघ्या १३ वर्षांच्या तेव्हा त्यांचे वडील निवर्तले. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

२० पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये त्यांची हजारो गाणी रेकॉर्ड केली गेली गेली. त्यांना २००१ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळविणाऱ्या एम.एस. सुब्बुलक्ष्मी नंतर त्या दुसऱ्या गायिका होत्या. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार `ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ने सन्मानित केले. तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार त्यांना मिळाले. १९७४ मध्ये लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या.

लतादीदींच्या स्वरातून जे गायन आमच्या कानापर्यंत पोहचले ते कधीही विस्मरणात जाणार नाही. लतादीदींचे गुणगान किती करावे तेवढे थोडेच! अगदी शब्दच अपुरे पडतील. आचार्य अत्रे यांनी शब्दांवर सत्ता गाजविली. ते शब्दांचे सम्राटच! त्यांनी लता दीदींबद्दल २८ सप्टेंबर १९६४ रोजी दैनिक `मराठा’मध्ये संपादकीय लेखात म्हणतात, भारतीय चित्रपटसृष्टीतील अनभिषिक्त गानसम्राज्ञी लता मंगेशकर हिला आम्ही मानाचा मुजरा करीत आहोत आणि ह्या देशांमधील नादलुब्ध रसिकांच्या हृदयसिंहासनावर चिरकाल राज्य करण्यासाठी तिला आणि तिच्या सुरम्य कंठाला दीर्घायू लाभो, अशी परमेश्वरचरणी मनोमन प्रार्थना करीत आहोत. खरे पाहता स्वर्गीय स्वरमाधुर्याचा या इहलोकातील मूर्तिमंत अवतार असलेल्या लताला केवळ लोखंडाच्या निफांतून उतरलेल्या शाईच्या शब्दांनी, वृत्तपत्राच्या जाड्याभरड्या कागदावर हे अभिवादन करणे म्हणजे एखाद्या अप्सरेच्या स्वागतासाठी तिच्या मृदू चरणकमलांखाली जाड्याभरड्या गोणपाटाच्या अंथरण्याइतके अथवा कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्यांचे चित्र काळ्या पाटीवर कोळशाच्या कांडीने रेखाटण्याचा प्रयत्न करण्याइतके विभोशित आहे, ह्या जाणीवेने आमचे मन आम्हाला खात आहे. कारण लताच्या कंठातील अलौकिक कोमलतेला साजेसे अभिवादन जर तिला करायचे, तर त्यासाठी प्रभातकाळची कोवळी सूर्यकिरणे दवबिंदूमध्ये भिजवून बनवलेल्या शाईने, कमलतंतूच्या लेखणीने आणि वायू लहरीच्या हलक्या हाताने फुलपाखराच्या पंखावर लिहिलेले मानपत्रच गुलाबकळीच्या करंडकातून तिला अर्पण करायला हवे!

असा हा असामान्य संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा निखळला. भारतरत्न आणि भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना पाक्षिक `स्टार वृत्त’ आणि `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’ ह्या संकेत स्थळामार्फत भावपूर्ण श्रद्धांजली!

You cannot copy content of this page