`अक्षर घरात’ लतादीदी `सही’च्या माध्यमातून सदैव आपणास भेटत राहतील!

सिंधुदुर्ग:- भारतरत्न गाणसम्राज्ञी लतादीदींच्या देहाने पंचतत्वात विलीनत्व स्वीकारलं आणि मागे उरल्या त्यांच्या स्वरांच्या आठवणी! त्या स्वरांच्या दुनियेत अमर राहणार आहेत. विश्वाला आपलेसे करून घेणाऱ्या लता मंगेशकर निकेत पावसकर यांच्या अक्षर घरातही सदैव `सही’च्या माध्यमातून सदैव आपणास भेटत राहणार आहेत.

यासंदर्भात तळेरे (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील संदेश पत्र संग्राहक, पत्रकार निकेत पावसकर म्हणतात,
२००६ सालापासून सुरु झालेल्या आमच्या संदेश पत्र संग्रहामध्ये मध्यंतरीच्या काळात खंड पडला. साधारण ७०० ते ८०० च्या दरम्यान या संग्रहात त्यावेळी संदेश पत्रे होती. आज त्यामधील पत्रांची संख्या १७०० पेक्षा जास्त झालेली आहे. पण खरया अर्थाने आमच्या संदेश पत्र संग्रहाला दिदिंच्या त्या पत्राने उर्जितावस्था आली आणि संग्रहाने पुन्हा एकदा नव्याने भरारी घेतली.

काही चांगल्या गोष्टी घडण्यासाठी निमित्त लागते. २००६ सालीही ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांच्या त्या पहिल्या पत्रापासून आमच्या “विविध क्षेत्रातील संदेश पत्रांच्या संग्रहाला” सुरुवात झाली. त्यानंतर मजल दरमजल करत या संग्रहाची घोडदौड सुरुच होती. इतर कामातून वेळ काढत या संग्रहाची वाटचाल सुरु झाली. तळेरेसारख्या ग्रामीण भागात राहून देश आणि परदेशातील व्यक्तींशी पोस्टाच्या माध्यमातून मी संपर्क साधून संदेश पत्रे मिळवू लागलो.

मात्र, २०१० साली या संग्रहात खंड पडला. इतर कामामुळे या संग्रहाकडे दुर्लक्ष झाले. आणि साधारण तीन ते चार वर्षे कोणतेही पत्र या संग्रहात दाखल झाले नाही. त्यानंतर मात्र २०१४-१५ साली पुन्हा एकदा काही मान्यवर व्यक्तींना पत्रे लिहिलीत. त्यामध्येही लता दिदिंना पत्र पाठविले. विशेष असे की, त्या पत्राला लता दिदिंनी उत्तर दिले. साक्षात मला प्रभुकुंज वरुन गानकोकीळा लता दिदिंचे पत्र आले. ते पत्र म्हणजे या संग्रहासाठी बुस्टर डोस ठरला.

खरया अर्थाने ते पत्र म्हणजे सरस्वती मातेचा आशिर्वादच वाटला. आणि त्या पत्राने पुन्हा एकदा उत्साह वाढला. संग्रहाला पुन्हा नव्याने उर्जितावस्था मिळाली. गानसम्राज्ञी भारतरत्न लता दिदि मंगेशकर आणि उषा मंगेशकर अशा दोन्हीही महान गायिकेंचे पत्रे एकत्र आलीत. आज या संग्रहात देश आणि परदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील १७०० पेक्षा जास्त व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा संग्रह आहे.

“अक्षरोत्सव” : जागतिक पातळीवरील व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा संग्रह

`मेरी आवाजही पहेचान है’ असे म्हणत अखेरपर्यंत आपल्या आवाजाची जादू समस्त जगावर केलेल्या लता दिदिंचा सुर रविवारी थांबला. खरे तर देशाचीच नव्हे तर संपुर्ण जगाची मोठी हानी झाली आहे. एक युग समाप्त झालेय. अर्थात निसर्गाच्या नियमानुसार येणार तो जाणारच, तरीदेखील दिदींच्या “त्या” पत्राने आमच्या अक्षरोत्सव अर्थात संदेश पत्र संग्रहाचा पुर्नजन्म झाला, आठवण खूपच छान मात्र निमीत्त आजचे क्लेशकारक ठरत आहे. आमच्या “अक्षरोत्सव” परिवाराकडून दिदिंच्या स्मृतीस विनम्र आदरांजली…

स्वर्गीय स्वरमाधुर्याचा या इहलोकातील मूर्तिमंत अवतार लतादीदी!

संदेश पत्र संग्राहक, पत्रकार निकेत पावसकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या आणि देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी- तज्ञांनी गौरविलेले `अक्षरघर’ प्रत्यक्ष भेट देणाऱ्या प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा देत असते. आपणही 9860927199 / 9403120156 ह्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून ह्या अक्षर घराला भेट देऊ शकता.

 

You cannot copy content of this page