संपादकीय- राजकारणात नैतिक मूल्यांचा ऱ्हास???

भारतातील लोकशाहीबद्दल जगभरात कौतुक होत असतं; कारण जागतिक लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या आपल्या देशात गेली ७५ वर्षे लोकशाही नांदत आहे. (सन १९७५ मध्ये २१ महिन्यांचा आणीबाणीचा कालावधी वगळता) लोकशाहीमध्ये मतदार, राजकीय पक्ष आणि राजकारण या तीन घटकांचा साधासुधा अभ्यास केल्यास देशातील गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणाविषयी होत असलेल्या घडामोडींबद्दल मतदार म्हणून आपणास आश्चर्य वाटत नाही. म्हणून राजकारणाबद्दल साध्यासोप्या गोष्टीबाबत आपण प्रथम चर्चा करू! सर्वसाधारणपणे राजकारणामध्ये काय होत असतं?

(देशातील नीतिमूल्य-नैतिकता जपून जनतेसाठी १०० टक्के प्रामाणिक आणि कार्यक्षमतेने कार्य करणाऱ्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या राजकीय पुढाऱ्यांची जाहीर माफी मागून आम्ही खाली मुद्दे मांडत आहोत. अपवादाने असलेल्या अशा त्यागी, समर्पित राजकारणातील व्यक्तिमत्वाचा अजिबात अपमान होता काम नये; असं आमचं मत आहे म्हणून हा कंसातील माफीनामा…!)

– राजकीयदृष्ट्या स्वतःच्या विकासाची अर्थात क्रमाक्रमाने किंवा थेट वरील पद मिळतील; अशा पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सुरुवात करून राजकीय प्रवासाचा आरंभ होतो. नंतर

– पक्षातील पदांबरोबर निवडणुकांमध्ये निवडून येण्याची तयारी मोठ्या ताकतीने म्हणजेच साम-दाम-दंड-भेद वापरून करावी लागते.

– पक्षांमधील पद मिळविण्याकरिता वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागते; त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी ठेवावी लागते.

– अगदी ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंत तिकीट मिळविण्यासाठी सुद्धा वरिष्ठ नेत्यांपुढे आपणच सरस ठरलं पाहिजे; ह्याची सदैव काटेकोरपणे काळजी घ्यावी लागते.

– ग्रामपंचायत सदस्याने सरपंच, सरपंचाने पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री होण्याचं ध्येय ठेवलेलं असतं. (आणि राजकारणामध्ये ह्या ध्येयाला चुकीचं म्हणता येणार नाही. त्यामुळे त्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या नैतिकतेच्या चौकोटीत नसल्या तरी त्याची विशेष दखल मतदार घेतो; असं नाही.)

वरील पाचही मुद्द्यांमध्ये त्या राजकीय व्यक्तीला आपल्या सहकाऱ्यांशी, वरिष्ठांशी सलगी करावी लागते, मर्जी संपादन करावी लागते, वेळप्रसंगी दुष्मनी पत्करावी लागते, गद्दारी करावी लागते, खोटेनाटे आरोप करावे लागतात, कटकारस्थान करावं लागतं; पण आपल्यालाच `पद’ कसं मिळेल? हे पाहावे लागते.

नीतिमूल्यं जोपासली गेली पाहिजेत, प्रामाणिकपणा जपला गेला पाहिजे, पक्षाबद्दल व पक्षाच्या नेत्याबद्दल कृतज्ञता असली पाहिजे, विशेष म्हणजे मतदारांशी बांधिलकी असली पाहिजे; असे अजिबात नाही. या सर्वांना छेद देऊन फक्त आणि फक्त आपला विचार करायचा असतो. (जनतेसाठी केलेल्या दिखाऊ कार्याचा मोठा बडेजाव केला जातो. पण ते कार्य करताना भ्रष्ट मार्गाने येणारी काळी कमाईच वापरली जाते.)

वैयक्तिक राजकीय स्वार्थाच्या आड जो कोणी येईल, त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संपवण्याचा डाव मांडला जातो.

पक्षामध्ये आपल्याला त्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार मिळणाऱ्या पदाच्या आड येणाऱ्याला संपविता आला पाहिजे; अगदी तो पक्षाचा प्रमुख असला तरी हरकत नाही.

राजकीय पक्षाने सुद्धा सत्ता मिळवण्यासाठी दुसऱ्या पक्षातील लोकप्रतिनिधींना-नेत्यांना गाजर दाखवून स्वतःकडे ओढलं पाहिजे आणि सत्ता हस्तगत केली पाहिजे. राजकीय पक्षांना सत्ता मिळण्यासाठी चोर, भ्रष्टाचारी, लफंगे असणारे नेते सुद्धा पावन करून घ्यावे लागतात.

पक्ष बदलताना मात्र मतदारांच्या-जनतेच्या, गावाच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या, जातीच्या, धर्माच्या, शेतकऱ्यांच्या, बेकारांच्या, मजुरांच्या, कष्टकरी जनतेच्या, गरिबांच्या सर्वांगिण भल्यासाठी, आम्ही `असं’ `असं’ करतोय; असं सांगितलं जातं. त्यातून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न सहजपणे केला जातो. आपला स्वार्थ लपवून ठेवायचा आणि स्व:स्वार्थासाठी दुसऱ्याला नालायक ठरवायचे.

घाणेरड्या शिव्या द्यायच्या, धमक्या द्यायच्या, आईबाप काढायचे, एकमेकांना टोमणे मारायचे, विरोधी व्यक्तीच्या बापाबद्दल संशय निर्माण करणारे खालच्या पातळीवरील आरोप करायचे.

सोशल मीडियामधील जुनी विधानं- व्हिडिओ पाहून स्वार्थासाठी मतपरिवर्तन करून घेतलेल्या नेत्यांबद्दल मतदारांना खरोखरच किव येते; पण त्याची लाज-शरम न बाळगणारे राजकारणी आपणच कसे मतदारांचे भले करणारे देवदूत आहोत? हे छातीठोकपणे सांगत असतात.

आपले सरकार असताना सरकार पक्षाचे लोकप्रतिनिधी मतदारसंघात क्रूर शासकाप्रमाणे वागत असतात.

याच राजकीय पुढाऱ्यांचे-पक्षांचे स्थानिक पातळीवरील अनेक कार्यकर्ते किंवा स्थानिक नेते अवैद्य दारू व्यवसाय, मटका-जुगार व्यवसाय, चोरीचा वाळू व्यवसाय; असे अनेक गैर व अनैतिक धंदे करीत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे बक्कळ पैसा असतो. त्या पैशातून ते यंत्रणेला विकत घेतात. सामान्य मतदार या विरोधात बोलल्यास त्याची तिरडी उचलण्याचा कार्यक्रम केला जातो.

राजकीय पदांमधून प्रचंड धनशक्ती निर्माण करायची, त्या धनशक्तीच्या माध्यमातून सगळं काही विकत घ्यायचं. मग ज्याच्यावर अन्याय होतो तो सामान्य मतदार बोलू शकणार नाही; अशी भीषण परिस्थिती तयार करून ठेवायची.

राजकीय पुढार्‍यांचे सगेसोयरेच विकास कामाचे ठेकेदार असतात. ठेकेदार, राजकीय पुढारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या अभद्र युतीतून जे काही साम्राज्य उभं राहतं; त्याला कोणीही चॅलेंज देऊ शकत नाही.

राजकीय पक्ष निवडून येण्याची क्षमता हीच पात्रता पाहिली जाते; त्यामुळे अमाप संपत्ती असणारे राजकारणीच आघाडीवर असतात.

राजकारण्यांची अधिकृत संपत्ती पाहून-ऐकून सामान्य जनता काय ते समजून जाते. पण आमचे अमुकअमुक व्यवसाय असल्याचे हेच पुढारी सांगतात. आम्हाला ते खरं मानले वाचून पर्याय नसतो. कोरोना महामारीच्या काळात उद्योगधंदे डबघाईस आले; मात्र या राजकीय पुढार्‍यांची उद्योगधंदे मात्र तेजीत चालले.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत जनतेच्या प्रश्नांना २० टक्के सुद्धा न्याय द्यायचा नाही; मूलभूत समस्या २० टक्के सुद्धा सोडवायच्या नाहीत; हे ठरूनच राजकीय पक्ष सत्ता मिळाल्यानंतरही काम करीत असतात.

स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय पुढारी मतदारांच्या मतांना, स्वतःच्या पक्षाच्या ध्येय धोरणांना, सहकाऱ्यांना अक्षरशः विकत असतो. कारण राजकारणामध्ये पदं महत्वाची असतात. त्या पदांच्या साहाय्यानेच पुढाऱ्यांना आपली अमाप संपत्ती सुरक्षित ठेवायची असते.

म्हणून राजकारण्यांनी कितीही नैतिकता- प्रामाणिकपणा सांगितला तरी सत्तेसाठी- पदांसाठी सर्वकाही केलं जातं; हा सिद्धांत समोर येतोय.

सामान्य मतदार रस्त्यावरील खड्ड्यात पडून, कारखान्यांच्या प्रदूषणांमुळे मेला तरी हरकत नाही; आरोग्याच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, शैक्षणिक समस्या, बेरोजगारांच्या समस्या, प्रशासकीय भ्रष्टाचार, वाढती महागाई असे एक नव्हे हजारो समस्या असल्या तरी त्या फक्त राजकारणासाठीच वापरायच्या आणि मतदारांना उल्लू बनवायचं काम राजकीय पक्षांनी-पुढाऱ्यांनी करायचं.

त्यामुळे एका राजकीय पक्षातून दुसऱ्या राजकीय पक्षात जाणाऱ्या व सत्तेसाठी वाट्टेल ते करणाऱ्या राजकारण्यांनी केलेली कोणतीही कृती राजकारणातील नैतिक मूल्यांचा ऱ्हास करणारी असते. नीतिमत्ता नसणारा, असंस्कृतपणा असणारा किळसवाणी असभ्यपणा राजकारणातून समोर येत आहे. त्याचे दुःख वाटते, संताप येतो.

– नरेंद्र हडकर
९३२१४९८६३९