बहुजन समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या अनुबंधाला सलाम!
सहकार महर्षी सहदेव फाटक साहेबांना १०० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
स्वातंत्र्य सैनिक, सहकार महर्षी, कामगार नेते, सामाजिक सभानता जपणारे नेते, सर्वसामान्यांच्या सर्वांगिण विकासासाठी जीवन समर्पित करणारे क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे सुपुत्र स्वर्गीय सहदेव शंकर फाटक साहेबांचा १ जानेवारी २०२४ रोजी १०० वा जन्मदिन अर्थात जयंती होती. त्यानिमित्ताने २० जानेवारी २०२४ रोजी सोशल सर्व्हिस लीग, एन. एम. जोशी विद्यासंकुल, परळ, मुंबई येथे दरवर्षीप्रमाणे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी रक्तदान करून किंवा रक्तदान शिबिरात सेवा करून स्वर्गीय सहदेव शंकर फाटक साहेबांनी केलेल्या समर्पणाची कृतज्ञता आपण व्यक्त करू शकतो. ही सुवर्णसंधी कोणी सोडू नये; असे मनापासून वाटते. त्यानिमित्ताने आम्ही हा छोटासा लेख लिहिण्याचा प्रयास करीत आहोत.
क्षात्रकुलोत्पन्न मराठा अर्थात गावडे गावडा समाज म्हटलं की आदराने ज्यांची नावे घ्यावीच लागतात, त्यामध्ये जसे शिक्षण महर्षी व क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे आद्यसंस्थापक रामचंद्र शिरोडकर, शिक्षणतज्ञ हरी धर्माजी गावकर, समाजमाता विजयाताई गावकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक व शिक्षणतज्ञ डॉ. शिवाजी गावडे, शिवाजी शिक्षणोत्तजक मंडळाचे आद्यसंस्थापक भाऊसाहेब लोकेगावकर, सहकार महर्षी डी. बी. ढोलम, भारत सेवक समाज संस्थेचे आद्यसंस्थापक व थोर नेते आमदार गजानन लोके, आमदार विठ्ठल चव्हाण, प्रिं. आर. आर. लोके आणि अन्य मान्यवर आहेत. त्यामध्ये समाजवादी विचारसरणीचे लोकनेते म्हणून सहदेव शंकर फाटक साहेबांचे स्थान महत्वपूर्ण आहे. फाटक साहेबांनी बहुजन समाजासाठी केलेले कार्य मोलाचे आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच कामगार लढ्यात दिलेले योगदान खूपच मोठे आहे. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजातील सर्व समाजबांधव भगिनींना स्वाभिमान वाटेल असे त्यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्राने घेतली. महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासात फाटक साहेबांना अग्रणीचे स्थान आहे.
१ जानेवारी १९२४ रोजी मिठबांव येथे जन्म झाला तर मुंबईच्या गिरणगावात अर्थात परळ भोईवाड्याच्या कामगार वस्तीतील घरात त्याचं बालपण- तरुणपण गेलं. त्यांचे वडील शंकर नारायण फाटक हे वारकरी! पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त. आताच्या सिंधुदुर्गातून नोकरीसाठी आलेले युवक ह्या भागात समूहाने राहायचे. त्यांना सहकार्याचा हात आध्यात्मिक वृत्तीचे शंकर फाटक द्यायचे. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांची सत्यशोधक चळवळीचे ते क्रियाशील पुरस्कर्ते होते. थोर समाजसुधारक संत गाडगेबाबांची प्रवचनं, किर्तनं, भजनं ह्यातून होणारे प्रबोधन त्यांनी अनुभवले होते. एवढंच नाहीतर त्यांचे गाडगे महाराजांशी अतिशय सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या आग्रहाखातर गाडगे महाराज मिठबावला गेले. तेथील श्रीदत्त मंदिरात साफसफाई करून रात्री जोरदार कीर्तनही केले. त्यातून त्यांच्या विचारसरणीला सामाजिक सुधारणेचा भक्कम आधार मिळाला. दुसऱ्यांसाठी आपल्या कुवतीनुसार कार्य करीत राहायचे हा त्यांचा स्वभाव! आणि हा सगळा वारसा नंतर वारसाहक्काने सहदेव फाटक साहेबांनी जपला; असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शेवटी बीजाला अनन्यसाधारण महत्व असते आणि त्या समाजसेवेच्या बीजाचे रूपांतर वटवृक्षात करण्याचे कार्य सहदेव फाटक साहेबांनी केले.
सहदेव फाटक साहेबांनी स्वातंत्र्य लढ्यात कसा सहभाग घेतला? ह्याची आपणास त्रोटक माहिती मिळते. कारण स्वतः फाटक साहेबांनी `मी स्वातंत्र्य सैनिक आहे’ असे सांगितले नाही. मी जे काही केले ते माझ्या देशासाठी केले. त्यात काय सांगण्यासारखे? असा त्यांचा प्रतिप्रश्न असायचा! स्वातंत्र्य लढा फक्त रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहणाऱ्या अनेकांनी स्वातंत्र्य सैनिकांचे प्रमाणपत्र मिळविले; पण फाटक साहेबांनी मात्र स्वतः स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊनही अशा गोष्टी टाळल्या! फाटक साहेबांचा हा सदगुण आजच्या खाबुगिरीच्या काळात अशक्य वाटत असला तरी त्यांनी तो जपला होता. अपना बाजार आणि अपना बँक मध्येही संस्थापक दर्जाचे कार्य करूनही ते पडद्यामागे राहायचे; परंतु दादासाहेब सरफरे यांच्या पश्चात फाटक साहेबांना सभासदांनी जबरदस्तीचा आग्रह केला आणि त्यांना प्रमुख पदं स्वीकारावी लागली.
मातृभूमीचे ऋण कधीही विसरता येत नाहीत. हेच मातृभूमीचे ऋण सदैव स्मरणात ठेऊन सहदेव फाटक साहेबांनी आपल्या जीवनात प्रत्येक कृती केली. अनुबंध नावाच्या आत्मकथेमध्ये (शब्दांकन- भास्कर सावंत) सहदेव फाटक साहेबांनी आपला जीवनपट मांडलाय. ती आत्मकथा वाचल्यानंतर सहजपणे लक्षात येते की सहदेव फाटक साहेबांचे कार्य बहुजन समाजाला सर्वांगिण विकासाकडे नेणारे होते. ही आत्मकथा सर्वांनी वाचायला हवी. त्यातून ध्येयनिष्ठ निःस्वार्थी सच्चा समाजनेता कसा असावा? हे समजून येतं. अशा समाजसेवेला समर्पित अनेक व्यक्तिमत्वांनी अनेक संस्था उभारल्या. पण त्यांची वैचारिकता व नैतिक मुल्य न जपता वर्तमानातील लोकांनी त्याच संस्था स्वतःच्या स्वार्थासाठी वापरत असल्याचे चित्र पाहून माझ्यासारखा पत्रकार नाराज होतो. ही नाराजी मला काही मिळावी म्हणून नसते; तर पन्नास-शंभर वर्षांची तपश्चर्या करणाऱ्या व्यक्तिंमत्त्वांचा त्यांच्याच अनुयायांकडून जो पराभव होतो आणि त्यातून त्या त्या संस्थांची जी अतोनात हानी होते ती समाज व्यवस्थेला बरबादीकडे घेऊन जाणारी असते. त्याचे दुःख होते आणि त्यातून मी नाराज होतो. पण दुसऱ्या बाजूला चांगल्या व्यक्तींकडून सामाजिक सेवेची बांधिलकी स्वीकारून समाजासाठी नि:स्वार्थी वृत्तीने कार्य केले जाते; त्याने मी भारावून जातो. २० जानेवारी २०२४ रोजी होणारे रक्तदान शिबीर हा दरवर्षी होणारा असाच निःस्वार्थी व्यक्तींचा सामाजिक भान जपणारा कार्यक्रम आहे, हे मला नमूद करावेसे वाटते.
सहकार महर्षी सहदेव फाटक साहेबांबद्दल एकाच लेखात सर्व लिहिणे शक्य नाही; ह्याची मला कल्पना आहेच. भविष्यात सहदेव फाटक साहेबांचे कार्य विस्ताराने मांडणारा लेख निश्चितच लिहू! कारण सहदेव फाटक साहेबांचे व्यक्तिमत्व मला खूप आवडते. कारण त्यांनी बहुजन समाजासाठी कार्य करीत असताना सच्चा स्वाभिमान जपला. ज्या ज्या संस्थेत काम केले ती संस्था `ही माझी माताच!’ असाच त्यांचा पवित्र भाव होता. तो सच्चा स्वाभिमान-तो पवित्र भाव त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जपला म्हणूनच ते युगायुगांसाठी आदर्श ठरले. त्यांचा आदर्श ठेऊन सामाजिक सेवाभावी संस्थांमध्ये मुख्य असणाऱ्या सन्मानिय व्यक्तींनी कार्य केले पाहिजे; असे मला प्रामाणिकपणे वाटते! आणि सहदेव फाटक साहेबांसाठी हीच खरीखुरी श्रद्धांजली ठरेल व फाटक साहेबांसाठी कृतज्ञता व्यक्त केल्यासारखे होईल. सहदेव फाटक साहेबांसारख्या पितृतुल्य व्यक्तिमत्वाशी कृतघ्नपणे वागण्याचा विचारही आमच्या मनात येता कामा नये.
सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊनही सामाजिक कार्यात असामान्य कर्तृत्व करून सहदेव फाटक साहेबांनी निर्माण केलेला आदर्श दीपस्तंभाप्रमाणे निरंतर तेवत राहणार आहे. त्या प्रकाशाच्या – तेजाच्या आदर्शातून त्यांची पुढील पिढी सामाजिक, सहकार आणि उद्योग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत. त्यांच्या यशाचीही दखल आपण कधीतरी लेखाच्या माध्यमातून निश्चितच घेऊ! सहकार महर्षी सहदेव फाटक साहेबांना त्यांच्या १०० व्या जयंती दिवशी विनम्र अभिवादन! महा रक्तदान शिबिरास अर्थात समाजसेवेच्या उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा!
संपादक- नरेंद्र हडकर
https://kmsamaj.org/ (क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन)
https://starvrutta.com/ (पाक्षिक `स्टार वृत्त’)