अनुभव संपन्नता आणि निर्मळ प्रेमाच्या प्रवाहाला शुभेच्छा!
अनुभव संपन्नता येण्यासाठी निःस्वार्थी वृत्तीने सतत दुसऱ्याचे भलं करण्याच्या कार्यात वर्षानुवर्षे मग्न राहावं लागतं. बालपणापासून निवृत्तीचे जीवन जगताना प्रत्येक क्षणी स्वतःच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना, मित्रांना, सहकाऱ्यांना कसं सहकार्य करता येईल? ह्याचा नुसता विचार करीत न बसता तातडीने आवश्यक मदत मिळवून देण्याची सवय अंगी असावी लागते आणि हे वर्षानुवर्षे जेव्हा घडतं तेव्हा जीवनात अनुभव संपन्नता येते. ह्या अनुभव संपन्नतेचा लाभ हजारो कुटुंबियांना मिळालेला असतो. मात्र हे सगळं करीत असताना त्याचे सर्व श्रेय श्री साईनाथांना देणं म्हणजे समर्पण भावना जोपासणं! हे सर्व वर्णन आमचे जीवाभावाचे मार्गदर्शक मित्र मोहन अनंत सावंत यांचे आहे. आज त्यांचा सत्तरावा वाढदिवस! त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व मित्रमंडळींना एकत्र करण्याचा आमचा मानस होता; पण `एखादा नातेवाईक रुग्णालयात असताना असा वाढदिवस साजरा करणं बरं नव्हे’ ह्या त्यांच्या एका वाक्याने आम्ही जागच्या जागी थांबलो. पण शब्दातून व्यक्त होण्यास आम्हाला कोणतीही गोष्ट आडवी येणार नाही; म्हणून मोहन सावंत उर्फ बापूंना सत्तराव्या वाढदिवशी शुभेच्छा देणारा हा लेख!
दादरमधील जुनी शिंदेवाडी ते शिवनेरी व्हाया परळगाव, जोगेश्वरीचे पाटलीपुत्र नगर अर्थात कॉस्मोपॉलिटन असोशिएशन असा बापूंचा हा प्रवास खडतर, कष्टप्रद असला तरी तो सुखाचा आणि यशाचा संगम घडवून आणणारा! आरोग्य खात्यातील सरकारी नोकरी ते म्हाडा अशा नोकरीच्या प्रवासात दादरला पावभाजीची गाडी, बांद्र्याला सुरीची हॉटेल हे व्यवसाय आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग, निवडणूक आयोग आणि मंत्रालय येथील नोकरी तसेच शिर्डीची पायी वारी ह्या दिर्घ प्रवासात बापूंना प्रेमाने जोडली गेलेली असंख्य माणसं हीच त्यांची खरीखुरी संपत्ती! ती खरीखुरी संपत्ती जपण्यासाठी ते वयाच्या सत्तरीत पदार्पण करीत असतानाही मनापासून कार्य करतात. वयोमानानुसार शरीरातील हाडं झिजली तरी बापूंचा उत्साह आजही लय भारी!
`देवान दिलेला सरना नाय आणि माणसान दिलेला पुरना नाय!’ (देव जे देतो ते कधीही संपत नाही आणि माणसाने केलेली मदत आयुष्यभर पुरत नाही.) ही मालवणी म्हण बापूंना त्यांच्या आईने दिली आणि ती त्यांनी जोपासली. `मी माणूस आहे मी कोणाला काय देणार? सर्वांना देणारा तोच! कधीकधी मी निमित्त ठरतो; हेच माझं भाग्य! असं साधंसुधं समीकरण जगणारा आमचा हा `बापू’ ( मोहन सावंत यांना `बापू’ हे टोपण नावंही त्यांच्या आईवडिलांनी दिलंय.) परमात्म्याच्या चरणांशी अर्थात परमपूज्य सद्गुरु अनिरुद्ध बापूंच्या देवयान पंथाचा पाईक!
बापू जुनी शिंदेवाडीची इमारत कोसळल्यानंतर फुटपाथवर राहायचे आणि जवळच्या शीख धर्मियांच्या गरुद्वारात जेवायला जायचे. चाळीतील सर्वांच्या सुखदुःखात सामील व्हायचे. लोक बारावं-तेरावं असो की श्राद्धाचं जेवण असो उष्टावळ करून भरलेल्या ताटावरून उठतात. एवढं सुदर स्वादिष्ट जेवण लोक ताटात ठेऊन का उठतात? असं जेवण वाया का घालतात? हा प्रश्न बापूंसह त्यांच्या सवंगड्यांना नेहमीच पडायचा. पण त्या प्रश्नात गुंतून न पडता बापू आणि त्यांचे सवंगडी ते जेवण जेवायचे आणि तृप्तीचा ढेकर द्यायचे. ह्यामागे त्यांची भावना खूप महत्वाची! कुठेही दिखाऊपणा नाही. आहे ते आहे. आजही अशा अनेक गोष्टी त्यांच्या मुखातून ऐकताना बापूंच्या जीवनातील चढउतार आणि आपुलकीचा निर्मळ झरा ह्याचे दर्शन सहजतेने होते.
महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा जेष्ठ विधिज्ञ निर्मलाताई सामंत प्रभावळकर, आयएएस अधिकारी डॉ. सत्यनारायण बजाज साहेब, डॉ. श्रीनिवास पाटील आणि जेष्ठ अनुभवी मार्गदर्शक अण्णा अर्थात दत्ता खानविलकर यांच्या आदर्शातून – मार्गदर्शनातून बापूंनी आपले अनुभव विश्व विस्तारविले. हे ते नेहमी अभिमानाने सांगतात. पत्नी मुग्धा (सेवानिवृत्त शिक्षिका, भारतीय योगा शिक्षिका, निसर्गोपचार तज्ञ), मुलगा अजिंक्य ( इंजिनियर) आणि मुलगी डॉ. सानिका (एमएस – शस्त्रक्रिया क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी) असा अनुभवाचा शिक्षणाचा व सेवेचा चौकोन बापूंच्या आणि मुग्धा काकूंच्या जीवनातील आनंदी यशाचे खरे सूत्र बरंच काही शिकविते.
सद्गुरूंच्या आशीर्वादाने भविष्यात बापूंना आपल्या कुटुंबासह एकत्र येऊन सामाजिक सेवेचा पर्वत उभा करायचा आहे; हा त्यांचा संकल्प निश्चितच सफल संपूर्ण होईल. त्यासाठी परमात्म्याने त्यांना सामर्थ्य द्यावे; हीच आजच्या सत्तराव्या वाढदिवासादिवशी परमात्म्याचरणी प्रार्थना! बापूंना आमच्या कुटुंबियांकडून, `स्टार वृत्त’ परिवाराकडून खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा!
-नरेंद्र राजाराम हडकर
हेही वाचा!
सन्मानिय मोहन सावंत- मैत्री जपणारे आदर्श व्यक्तिमत्व…
अन्नपूर्णेचा कष्टमय तरीही यशस्वी आदर्श प्रवास! (भाग- १)
अन्नपूर्णेचा कष्टमय तरीही यशस्वी आदर्श प्रवास! (भाग- २)