सौ. मुग्धा मोहन सावंत- कष्टमय तरीही यशस्वी आदर्श प्रवास!

सौ. मुग्धा मोहन सावंत अर्थात मुग्धा काकूंचा आज एकसष्टवा वाढदिवस! त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी हा लेखन प्रपंच! मुग्धा सावंत यांचा तीस-पस्तीस वर्षाचा प्रवास कष्टाचा, मेहनतीचा, त्यागाचा आणि त्यातून स्वतःच्या कुटुंबाकरिता सर्वकाही करीत असताना आपल्या भावंडांना-नातेवाईकांना जीवनात-संसारात उभं राहण्यासाठी जे बळ दिलं; ते आदर्शवत असंच आहे; शिवाय नेहमी प्रेरणादायी असं आहे. म्हणून त्यांच्या जीवन प्रवासाचा आलेख शब्दांकित करणं तेवढं सोपं नाही. याची कल्पना असूनही एक छोटासा प्रयास करीत आहे.

सौ. मुग्धा काकू या पूर्वाश्रमीच्या जना परब. सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यात असलेल्या आंबेरी गावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पाच बहिणी. सर्वात मोठी बहीण आक्का. वडिलांना शेती कामात मदत करण्यासाठी प्रसंगी शेतीची अवघड कामं करण्याचं, प्रसंगी नांगरणी करण्याचं सामर्थ्य आक्काच्या मनगटात होते आणि ते संस्कार घेत मागील चार बहिणी मेहनत करीत होत्या. मुग्धा काकूंनी सुद्धा आपल्या मोठ्या बहिणीला साथ दिली. गावातील शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा सहन केल्या; पण प्रामाणिकपणाचा वसा काही सोडला नाही. घरातील सर्व कामं करताना शेतीची कामंही करायची, नारळ-भाजी बाजारात विकून चार पैसे उभे करायचे आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायच्या. हे त्यांचे कर्तृत्व कौतुकास्पद! मुलीसुद्धा वडिलांच्या पाठीशी उभ्या राहून संसाराचा गाडा चालू शकतात; हेच ह्या बहिणींनी दाखवून दिले.

आक्का

आक्काचे लग्न झाल्यावर आक्काचा संसार भायखळ्यातील दहा बाय दहा खोलीत सुरु झाला. आक्काने आपल्या बहिणीला म्हणजेच मुग्धा काकूंना मुंबईला आणलं आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. मुग्धा काकूंनी डीएड करून शिक्षिकापेशा स्वीकारला. खेडेगावातून मुंबईपर्यंतचा प्रवास खडतर असला तरी तो ध्येयपूर्तीकडे जाणारा होता. छोट्याशा झोपडीवजा खोलीत आक्कांच्या आणि त्यांच्या पतीच्या संस्काराने मुग्धा काकू जीवनात यशस्वी होण्यासाठी घडत होत्या.

त्यानंतर मुग्धा काकूंच्या जीवनात पती म्हणून मोहन सावंत यांचा प्रवेश झाला आणि नंतरच्या तीस वर्षाच्या प्रवासात अनेक अडचणींना सामोरे जात मुग्धा काकूंच्या यशस्वी संसार उभा राहिलाय. आज मुलगा आयटी इंजिनियर आणि मुलगी डॉक्टर अर्थात आयुर्वेदाचार्य आहे. एवढंच नाही तर मुलगा अजिंक्य एमपीएससी तयारी करीत असून शासनाचा वरिष्ठ अधिकारी होण्याचा त्याचा ध्यास आहे. तोही मुग्धा काकूंच्या संस्काराने सफल संपूर्ण होणार आहे. तर कन्या डॉ. सानिकाने आयुर्वेदामध्ये एमडी होण्यासाठी प्रवेश घेतला आहे. आदर्श पत्नी आणि आदर्श माता होताना सुद्धा काकूंनी आपल्यामधील कलागुणांना, चिकित्सक वृत्तीला, अभ्यासू सवयीला वाव दिला. आदर्श शिक्षिका म्हणून कार्य करून त्या वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या; तर दुसऱ्या बाजूला त्यांनी नॅचरोपॅथीचे प्रशिक्षण घेऊन त्या विषयातही तज्ञता संपादन केली. भविष्यामध्ये निसर्गोपचारच्या माध्यमातून समाजामध्ये सेवा करण्याचा त्यांचा मानस या वयातही त्यांची सकारात्मक आणि सेवाभावी मानसिकता दर्शविते. नॅचरोपॅथीचा अभ्यास सुरू असताना योगाचासुद्धा अभ्यास त्यांनी केला आणि योग शिक्षक म्हणून त्या आपली भूमिका समर्थपणे बजावत आहेत. एवढेच नाहीतर शास्त्रशुद्ध अक्युप्रेशरचे प्रशिक्षण घेऊन आता ती सेवा सुद्धा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून देतात.

६० मिनिटांमध्ये १५१ सूर्यनमस्कार करण्याचा विक्रम केल्यानंतर मुग्धा सावंत आणि डॉ. सानिका

अंबिका योग आश्रम ठाणे संचलित वांद्रे शाखेच्या योग शिक्षिका म्हणून त्यांनी अनेकांना योगाचे मार्गदर्शन केले आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन २१ जून रोजी साजरा होतो. त्या विषयी त्यांच्या मार्गदर्शनाखाली विनामूल्य योग शिबिर आयोजित केले जातात. योगामधून शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती कशी साधली जाते? ह्याचं महत्व जिथे जिथे जातील तिथे तिथे मुग्धा काकू सांगत असतात. ते ऐकून अनेकजण योगा शिकतात आणि तंदुरुस्तीचा प्रत्यक्ष अनुभव घेतात. आदर्श शिक्षिका नुसत्या शाळेपुरत्या मर्यादित न राहता योगाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना प्रशिक्षित केले आणि आदर्श योग शिक्षिका म्हणून प्रसिद्ध झाल्या. हे सर्व करत असताना ६० मिनिटांमध्ये १५१ सूर्यनमस्कार यशस्वीपणे करून `लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये त्यांची नोंद झालेली आहे. आपल्याबरोबर आपली कन्या डॉ. सानिकाला सोबत घेऊन मायलेकीने केलेला हा विक्रम आम्हास नेहमीच प्रेरणा देणारा ठरतो.

कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना मुग्धा काकूंनी केलेला कुठलाही खाद्यपदार्थ चविष्ट, रुचकर आणि आरोग्यदायी असतो, हे विशेष! मुग्धा काकू खरोखरच तज्ञ अनुभवी सुगरण आहेत. त्यांनी ही आवड अगदी बालपणापासून जोपासली. मालवणी खाद्यपदार्थ असो किंवा कोणतेही फास्टफूड असो; त्यांच्या हातून बनलेला पदार्थ खाण्यामध्ये वेगळीच मजा असते. म्हणूनच शासकीय वसाहत बांद्रा येथे सुरुची स्नॅक्स कॉर्नर त्या यशस्वीपणे उभारू शकल्या. सुरुची स्नॅक्स कॉर्नरच्या माध्यमातून दहा निराधार स्त्रियांना रोजगार देऊन त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.

योगाचे प्रशिक्षण देताना मुग्धा सावंत

चूल आणि मूल ह्याच्या पलीकडे जाऊन ज्या क्षेत्रात मुग्धा काकू जातात ते क्षेत्रच नव्हे तर त्या क्षेत्रातील माणसं सुद्धा आपोआप जोडून घेतात. प्रेमळ स्वभाव हा त्यांचा स्थायीभाव! या प्रेमातूनच त्या अधिकारवाणीने मार्गदर्शन करू शकतात. हे मार्गदर्शन सुद्धा खूप अमुल्य असतं. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलांना सुसंस्कारित केलं; त्याचबरोबर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला ते संस्कार देण्याचा प्रयास नेहमीच करतात.

ह्या जीवन प्रवासात मुग्धा काकूंच्या मागे त्यांचे पती मोहन सावंत काका हे खंबीरपणे उभे असतात. “आपण आपला संसार उभा केला. आपण यशस्वी झालो. तेवढ्यापुरते न थांबता इतरांचेही संसार उभे केले पाहिजेत. इतरांनाही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केलं पाहिजे!” हा त्यांचा आग्रह मुग्धा काकू सुद्धा जोपासत असतात. कष्ट, मेहनत, प्रामाणिकपणा, कार्यक्षमता, प्रेमळ स्वभाव आणि त्यागवृत्ती ह्या सर्वांचा परिपाक म्हणजेच `मुग्धा काकू’ असं अभिमानाने सांगावसं वाटतं.

त्यांच्याकडे जबरदस्त आत्मविश्वास असतो. हा आत्मविश्वास कुठून येतो? सद्गुरुंवरील निखळ श्रद्धा आणि सबुरी ह्यातूनच त्यांचा आत्मविश्वास नेहमीच सबळ होत जातो. परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंवर त्यांची श्रद्धा आहे. कुठलेही काम त्या सद्गुरुंच्या स्मरणाशिवाय करीत नाहीत म्हणूनच त्यांना हे सगळं सामर्थ्य प्राप्त होत असतं; असं आमच्या तरी लक्षात आलं. भविष्यामध्ये नॅचरोपॅथीच्या, योगाच्या, आणि अक्युप्रेशरच्या  माध्यमातून संपर्कात येणाऱ्या माणसांना समर्थ करण्यासाठी त्या निश्चितपणे कार्य करीत राहतील आणि त्यांच्या कार्याला परमात्म्याने सदैव सफलता द्यावी; ही सदिच्छा!

जेष्ठ विधिज्ञ श्री. सुभाष सुर्वे साहेब, सहकार नेते श्री. विष्णू तांडेल साहेब यांनी मोहनसिंह सावंत यांच्या बांद्रा येथील नवीन कार्यालयास सदिच्छा भेट देताना मोहन सावंत आणि मुग्धा सावंत

त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा! वाढदिवसानिमित्त हा तोडकामोडका लेखन-प्रपंच केला. त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिण्यासारखे आहेत- सांगण्यासारखे आहेत. कधीतरी त्याचा निश्चित आढावा घेऊ. तुम्हाला काही मुग्धा काकूंबद्दल लिहावेसे वाटले; तर निश्चित लिहा! ह्या लिहिण्यातून त्यांचं कौतुक निश्चित होईल; त्यापेक्षा आदर्श जीवन कसं जगायचं? हे सर्वांना समजून येईल. आज ते खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला एक `आदर्श’ लागतो तो आदर्श मुग्धा काकूंकडे बघितल्यानंतर आपणास मिळतो.

सरस्वती विद्या मंदिर, घाटकोपर येथील शाळेला मिळालेलं सर्वोत्कृष्ट पारीतोषिक स्वीकारताना
१० ऑगस्ट २०२० रोजी मा. डॉ. श्री सत्यनारायण बजाज साहेब, उप जिल्हाधिकारी यांची निवासस्थानी सदिच्छा भेट

मुग्धा काकूंना वाढदिवसानिमित्त पुन्हा खूप खूप शुभेच्छा! त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुख, शांती, आनंद, समाधान, सुयश, किर्ती आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो; ही परमात्म्याचरणी प्रार्थना!

-सिद्धीविरा नरेंद्र हडकर

You cannot copy content of this page