श्रीसाईभक्तीच्या प्रकाशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जेष्ठ श्रीसाईभक्त श्री.प्रकाश सोनाळकर यांना ८० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना शब्दरूपी शुभेच्छा देण्यासाठी हा लेखन प्रपंच! श्री. प्रकाश सोनाळकर साहेबांना आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा!
॥ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परंब्रम्ह
सच्चिदानंद सदगुरु श्री साईनाथ महाराज की जय॥
अशी आर्ततेने ललकारी देताना श्रीसाई भक्तीचा उत्साह एवढा वाढतो की त्यातून मिळणारा आनंद जन्मोजन्मीच्या दुःखांना पुरून उरतो. श्रीसाई भक्तीचा महिमा श्रद्धा आणि सबुरीसह जीवन जगण्यासाठी लागणारा पुरुषार्थही प्रदान करतो. श्रीसाई भक्तांमध्ये श्रीसाईसच्चरित ह्या ग्रंथाला खूप महत्त्व आहे. त्या ग्रंथामध्ये श्रीसाईंचे चरित्र असेल असे ढोबळमनाने वाटते; पण त्यामध्ये श्रीसाईभक्तांच्या जीवनातील घडलेल्या सत्य घटना आहेत. श्रीसाईभक्तांनी श्रीसाईंना आपल्या जीवनात आणण्यासाठी श्रीसाईंवर कशी श्रद्धा ठेवली? श्रीसाईंची भक्ती कशी केली? श्रीसाई भक्तांची जीवनात वर्तवणूक कशी होती? श्रीसाईंबद्दल त्यांच्या मनात कसं प्रेम होतं? ज्यामुळे श्रीसाईंनी त्यांच्या जीवनात कृपेचा प्रसाद निरंतर प्रवाहित ठेवला. हे सगळं श्री साईसच्चरित ग्रंथात व्यवस्थितपणे येतं. अशाप्रकारे श्रद्धावान श्रीसाईभक्त जेव्हा भेटतात तेव्हा खूप आनंद होतो, त्यांच्याशी संवाद साधताना श्रीसाईंच्या प्रेमाचे- भक्तीचे सामर्थ्य सहजपणे लक्षात येतं.
मी आजवर शिर्डी तिर्थस्थानाच्या अनेकवेळा पायी वाऱ्या केल्या. त्या पायी वाऱ्यांमधून श्रीसाईंची कृपा जीवनात अनुभवली; एवढेच नाही तर सद्गुरु तत्वाकडे आकर्षित झालो, नव्हे सद्गुरुतत्त्वाने आपल्या चरणी ओढून घेतले. या अखंड प्रवासात अनेक सच्चे श्रीसाई भक्तांचा सहवास लाभतो. अशाच एका जेष्ठ श्रीसाई भक्ताचा सहवास मी वर्तमानात अनुभवतो आहे! हे साईभक्त म्हणजे श्रीयुत प्रकाश सोनाळकर!
आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना शब्दरूपी शुभेच्छा देण्यासाठी हा लेखन प्रपंच! श्री. प्रकाश सोनाळकर साहेबांना आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा!
श्री. सोनाळकर साहेबांचे बालपण मुंबईमधील वरळी येथे गेले. आईच्या श्रीसाई भक्तीने बालमनावरच श्रीसाई भक्तीचे संस्कार कोरले गेले. वयाच्या नवव्या वर्षी १९५३ साली त्यांना त्यांच्या आईबरोबर शिर्डीला जाण्याचा योग आला. त्यानंतर शिक्षण, नोकरी, संसार करताना दुसरीकडे श्रीसाईभक्तीचा महिमा वाढत गेला. श्रीसाईसच्चरिताचे पारायण करणे, हे जणू काही त्यांच्या जीवनाचा एक भाग झाला आणि गेली ७१ वर्षे त्यांची श्रीसाईभक्ती अखंडित सुरू राहिली.
त्यांच्या आईचे मामेभाऊ आनंदराव कर्णिक हे ठाणे- नौपाडा येथे राहायचे. सोनाळकर साहेबांच्या मामांनी आपल्या घराण्यात श्रीसाईभक्तीचे बीज पेरले आणि त्या श्रीसाईभक्तीच्या बीजाचे रूपांतर सोनाळकर साहेबांच्या रूपाने वटवृक्षात झाले. हा श्रीसाई भक्तीचा वटवृक्ष म्हणजेच प्रकाश सोनाळकर साहेब! त्यांच्या सहवासात राहणं सुद्धा भाग्याचे असतं, असं मला नेहमी वाटतं!
ओम साईधाम देवालयातून अभक्तांना बाजूला करण्यासाठी जी काही मोठी लढाई करावी लागली, त्या लढाईत सोनाळकर पती-पत्नींनी आम्हाला दिलेली साथ कधीच विसरता येणार नाही. सोनाळकर साहेबांनी श्रीसाईंना नवस केला होता की, ओम साईधाम देवालय श्रीसाई भक्तांच्या देखरेखीखाली येऊ दे! मग आम्ही ह्याच मंदिरात श्रीसाईसच्चरित ग्रंथाचे अखंड पारायण करू! श्रीसाई भक्ताने केलेला हा नवस श्रीसाईंनी पूर्ण केला आणि सलग दोन वर्षे श्री. प्रकाश सोनाळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ओम साईधाम देवालयात श्रीसाईसच्चरित ग्रंथाचे अखंड पारायण सफल संपूर्ण झाले. हेच ते त्या खऱ्याखुऱ्या श्रीसाई भक्ताचे सामर्थ्य! त्या सामर्थ्याला सलाम!
श्री. प्रकाश सोनाळकर राज्य कामगार विमा महामंडळ खात्यात अधिकारी पदावरवरून सेवानिवृत्त होईपर्यंत कार्यरत राहिले. त्यांच्या सौभाग्यवती आशाताई सुद्धा एका खाजगी कंपनीत वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत होत्या. आज त्यांचे तीनही मुलगे उच्चशिक्षित असून परदेशात नोकरी-व्यवसाय करतात. तीनही मुलांचे संसार सुखाने सुरू आहेत. सोनाळकर कुटुंबामध्ये वर्षांनुवर्षे आनंदी आनंद आहे. हा आनंद सोनाळकर साहेबांच्या श्रीसाई भक्तीतून प्रवाहीत झालेला आहे.
नोकरी करीत असताना सोनाळकर साहेबांनी सांस्कृतिक कार्यक्रमास नुसती हजेरी लावली नाही तर आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदवून अनेकवेळा गायकी सादर केली. भक्तीगीते असो वा देशभक्तीपर गाणी असो किंवा सिनेमामधील गाणी असो; आपल्या उत्कृष्ट आवाजात ते सादरीकरण करायचे. आज ८० व्या वर्षीसुद्धा तेवढ्याच उत्तम प्रकारे ते गायन करतात. त्यांचा उत्साह वाखाण्याजोगा असाच आहे.
कॉस्मोपॉलिटन सोसायटी असोसिएशन, उत्सव मंडळ आणि ओम साईधाम देवालय अंतर्गत होणाऱ्या सर्व सामाजिक, आध्यात्मिक कार्याध्ये नेहमीच सोनाळकर साहेब पुढाकार घेतात. अतिशय प्रेमळ स्वभाव असणारे सोनाळकर साहेब आणि त्यांच्या धर्मपत्नी आशाताई ह्या उभयतांनी आमच्यासमोर जो आदर्श ठेवला आहे, तो अभिमानास्पद असा आहे. प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करून नेहमी सहकार्य करण्याची वृत्ती त्यांनी निरंतर जोपासली आहे. म्हणून सोनाळकर साहेबांच्या सहवासात राहणे, त्यांच्याशी संवाद साधने मला नेहमीच प्रेरणादायी वाटते!
आजच्या वाढदिवसानिमित्त सोनाळकर साहेबांना कॉस्मोपॉलिटन सोसायटी असोसिएशन, उत्सव मंडळ आणि ओम साईधाम देवालय समिती तसेच पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा! श्रीसाईनाथ महाराज त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुदृढ आरोग्यासह सुखाचे आनंदाचे दीर्घायुष्य देवो; ही प्रार्थना!
-मोहन सावंत
सहसंपादक- पाक्षिक स्टार वृत्त