संपादकीय- महाराष्ट्र्राचे `सामर्थ्य’ अबाधित ठेवा!

२३ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. हे निकाल लागल्यानंतर दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू झाली; पण महायुतीच्या जो विजय झाला तो महाविजय आहे; हे मान्य करावेच लागेल! त्यामुळे आता कुठल्याही शंकांना, हरकतीला स्थान नाही. महायुती `राजकारणशाही’त यशस्वी झाली. त्यामुळे महायुतीचे अभिनंदन करावेच लागेल. महायुतीचा हा दैदिप्यमान विजय मान्य करूनच महाविकास आघाडीला पुढील वाटचाल करावी लागेल!

आजचे राजकारण हे राज्यशास्त्राची पुस्तके वाचून समजेल ह्या भ्रमात कोणी राहू नये; म्हणून आजच्या राजकारणाला आम्ही `राजकारणशाही’ हे नाव दिलेले आहे. ज्याच्या हातात सत्ता त्याने सर्व यंत्रणांचा आपल्याला पाहिजे तसा वापर करावा आणि आपल्याला पाहिजे तसे निकाल लावावे. मात्र एक काळजी अवश्य घ्यायची ती ही की, निकालाबाबत मतदारांच्या मनात शंका निर्माण होता कामा नये आणि जो कोणी शंका निर्माण करेल त्यालाही ती शंका सिद्ध करता येऊ नये. लोकशाहीला मारक राक्षसी यंत्रणेचा पायाभूत विकास २०१४ नंतरच झाला का? निश्चितच नाही! गेल्या ७५ वर्षात जे राज्यकर्ते सत्तेवर आले त्यांनी राक्षसी यंत्रणेला जन्माला घालण्याचे पाप केले, हे मान्य करूनच पुढे जावे लागेल!

त्यामुळे कोणीही चांगुलपणाचा आव आणू नये. फरक इतकाच की उद्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या जसे आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत जाते तसेच सत्तेची यंत्रणा राबविण्याचे आधुनिक तंत्र विकसित होत आहे. म्हणून लोकशाहीला मारक ठरणाऱ्या गोष्टी आता तरी सिद्ध करता येणार नाहीत. भविष्यात काय होईल? ते माहीत नाही. म्हणूनच लोकशाहीची राजकारणशाही झालेली आहे. त्यामध्ये कितीही आकडेवारी तपासा, अभ्यासूवृत्तीने अनुमान काढा; तरीही किरकोळ अपवाद वगळता ठोस काहीच हाती मिळणार नाही! म्हणून महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयावर झालेला शिक्कामोर्तब पुसता येणार नाही.

महायुतीच्या सरकारने आता जनतेच्या हिताच्या आश्वासनांची पूर्तता करावी! हा महाराष्ट्र संपन्न झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात `स्वराज्य’ निर्माण झालं पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात सामाजिक प्रबोधनाचे, समानतेचे आणि जनतेचे राज्य निर्माण झाले पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांपासून गाडगे महाराजांपर्यंत संतांनी दिलेल्या विश्व कल्याणाच्या सूत्रावर महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे. महाराष्ट्राला ज्वलंत इतिहास आहे, तो इतिहास पाहून महायुतीने महाराष्ट्र सामर्थ्यशील करावा! दिल्लीच्या तख्ताने महाराष्ट्राची नुसती दखलच नाही तर सर्वांगिण विकासासाठी महाराष्ट्रातील कष्टकरी जनतेसाठी सर्वतोपरी योगदान दिले पाहिजे!

महाराष्ट्रामध्ये अनेक गंभीर समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी तात्काळ उपाययोजना आवश्यक आहेत. शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. प्रचंड वाढलेली महागाईने सर्वसामान्य जनता होरपळत आहे. महिला अत्याचारात झालेली वाढ भूषणावह नाही. लाखो महिला बेपत्ता होत आहेत. उत्तम वैद्यकीय सेवा आणि दर्जेदार शिक्षण कष्टकरी जनतेसाठी अशक्य होत आहे. बेरोजगारी वाढत आहे. अमली पदार्थांचा विळखा पडला आहे. राज्यावर कर्जाचा प्रचंड मोठा डोंगर तयार होत आहे. अशा अनेक समस्या आहेत! त्यावर महायुतीच्या सरकारने काम करायला पाहिजे. हा महाराष्ट्र जर सामर्थ्यवान झाला तरच देश सामर्थ्यवान राहील; हे सर्वांनी लक्षात ठेवावेच लागेल!

-नरेंद्र हडकर

संपादकीय- राक्षसी राजकीयशाही लोकशाहीला मारकच!