माझा `राम’… आत्माराम, साईराम अनिरुद्धराम…!

मी अगदी सामान्य माणूस आहे! मला अध्यात्म समजत नाही, मी अज्ञानी आहे! मला मात्र एक गोष्ट पक्की ठाऊक आहे; `राम’ माझ्यातच आहे आणि `रावण’ही माझ्यात आहे! राम म्हणजे पवित्रता, शुभ, सुयश, सत्य, प्रेम, आनंद, ज्ञान, प्रकाश, सुसंस्कार; माझ्या जीवनाच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या उचित गोष्टी! तर ह्या सर्व उचित, शुभ व पवित्र गोष्टीना विरोध करतो तो रावण! माझ्यातील असा `राम’ मी `जप’तो आणि रावण नाकारतो! बस… माझ्यासाठी एवढेच गरजेचे आहे. मग सुरु होतात पुढच्या गोष्टी!

`राम’ कुठल्या धर्माचा, जातीचा, कुळाचा, प्रांताचा होता? `राम’ काय खात होता? `राम’ कुठल्या गटाचा, तटाचा, समूहाचा, पक्षाचा होता? हे शोधून काढण्याची मला आवश्यकताच वाटत नाही; कारण तो `राम’ माझ्यात आहे!

विश्वात अनेकविध रामायणं आहेत! प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार `राम’ साकारला; पण मी `वाल्मिकी रामायण’ हे मूलभूत असल्याचे मानतो! इतरांनी तसेच मानावे; असा माझा आग्रह निश्चितच असणार नाही! `राम’ माझ्यात आहे, हेच माझ्यासाठी महत्त्वाचे! आई-वडिलांची ओळख जशी सहजपणे बाळाला होते, तशीच ओळख त्या रामाची मला आहे! हेच माझ्यासाठी मूलभूत ज्ञान! त्या ज्ञानाच्या पायावर मी माझी इमारत उभारतोय!

ती इमारत उभी करताना माझ्यातील अज्ञानरूपी रावण माझ्या कार्यात अडथळा आणणार आहे; हे सुद्धा मला माहित आहे. जेव्हा जेव्हा हा रावण वरचढ होईल तेव्हा तेव्हा मला सदैव विजयी, मर्यादा पुरुषोत्तम, एकवचनी असणाऱ्या रामाकडे माझं नेतृत्व द्यायला पाहिजे! मी त्याच्याच नेतृत्वाखाली रावणाशी लढलं पाहिजे!

बाहेरील `राम’ आणि रावण ओळखता येणे सामान्य मानवाला थोडंसं कठीण आहे; पण ज्याच्या अंतर्मनात `राम’ असतो तो बाहेरच्या रामाला शरण जाईल आणि रावणाची युद्ध करण्यास सज्ज होईल! बाहेरील रावणाशी युद्ध केव्हा सोपे होईल? जेव्हा माझ्यातील `राम’ क्रियाशील आणि रावण `निष्क्रिय’ असेल तेव्हा!

अंधारातून जाण्याचा प्रसंग आला की भीती वाटते! अतिशय भयग्रस्त घटना घडली की काय करावे हे सुचत नाही! असं काही घडलं की आमच्या मुखी `राम, राम, राम, राम, राम, राम’ येतोच! कोणाच्या अंत्ययात्रेला गेल्यावर शब्द कानी पडतात किंवा सहजपणे आपणही म्हणतो `जय राम श्रीराम जय जय राम’!एखाद्या गोष्टीत आपणास स्वारस्य नसेल किंवा ती गोष्ट तकलादू असेल, तर आम्ही सहजपणे म्हणतो त्यात `राम’ नाही. एखादी व्यक्ती अनुचित वागत असेल तर आपण म्हणतो त्यात `राम’ नाही! म्हणजेच `राम’ हेच चैतन्य! `राम’ हे सत्य! `राम’ हेच पवित्र! भयाला दूर करून निर्भयता देणारा राम, आनंद देणारा राम, प्रेम करणारा राम; हा एकमेव आहे-एकच आहे. म्हणूच म्हटलं जातं `राम नाम सत्य है।’

सत्य म्हणजे असत्याचा विरोधात निःस्वार्थपणे केलेली कृती! मी ज्या समाजात राहतो त्या समाजातील चुकीच्या रूढी परंपरांना, अनुचित गोष्टींना, गैरव्यवहारांना, गैरकृत्यांना कोणालाही न घाबरता मला विरोध करताच आला पाहिजे! अशावेळी माझ्यातील तो `राम’ मला समर्थ करीत असतो!

हा माझ्यातील `राम’ माझ्या आत्माशी एकरूप होतो तेव्हा तो माझ्यासाठी असतो आत्माराम… साईराम… अनिरुद्धराम…!

-नरेंद्र हडकर