`जनता कर्फ्यू’च्या नावाखाली दडपशाही नको!

उद्यापासून कणकवली तालुक्यात दहा दिवसांचा `जनता कर्फ्यू’ पाळण्याबाबत एकमुखाने निर्णय घेण्यात आला. कोरोना रुग्णांची आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूंची वाढती संख्या चिंताजनक असल्याने `जनता कर्फ्यू’ आवश्यक ठरतो. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करायला हवे; पण `जनता कर्फ्यू’च्या नावाखाली प्रशासनाने दडपशाही करू नये; असे आमचे स्पष्ट मत आहे!

आज कणकवली शहरात जनतेने दुकानांमध्ये गर्दी केली. पुढील दहा दिवसांना पुरेसा असणारा किराणा त्यांनी आणला असेल. त्याच्या बातम्याही आल्या; पण `जनता कर्फ्यू’चे नियोजन नसले की गर्दी होणार आणि कोरोनाचा प्रसार वाढणारच! म्हणूनच नियोजन महत्त्वाचे ठरते.

`जनता कर्फ्यू’ यशस्वी होण्यासाठी प्रशासनाने अगदी मनावर घेतले आहे. पण उद्या कणकवली रेल्वे स्टेशनवर येणारे प्रवासी तसेच खाजगी बसेसमधून येणारे प्रवासी आपल्या गावात जाणार कसे? हा मोठा प्रश्न आहे. कारण उद्या रिक्षासारखी वाहने जर ह्या प्रवाशांना सोडण्यासाठी रस्त्यावर धावली तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा मानस कणकवली पोलिसांनी आमच्या प्रतिनिधीकडे स्पष्टपणे बोलून दाखविला. “प्रवाशांनी आपल्या घरी चालत जावे. जर ह्या प्रवाशांना कोणी रिक्षाचालकाने किंवा इतर वाहनाने घरी सोडण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्याची रिक्षा-वाहन जप्त करू!” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. हे अतिशय दुर्दैवी असून उद्या कणकवलीमध्ये येणारे प्रवासी आपापल्या घरी जाणार कसे?

कणकवली रेल्वे स्टेशनला उतरणारे प्रवासी अगदी देवगड, वैभववाडी, मालवण तालुक्यात जाणारे असतात. मुंबईवरून आजही चाकरमानी आपल्या गावाच्या घरी येत आहेत. त्यांनी आपल्या घरी जायचे कसे? त्यांना वीस-तीस किलोमीटर चालत जाणे शक्य आहे का? त्या प्रवाशांमध्ये वृद्ध, महिला, गरोदर महिला, बालके असतील तर त्यांनाही `चालत जा’ म्हणून सांगणार का? त्यांना त्यांच्या घरी नेऊन सोडण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. अन्यथा त्यांना रिक्षाने किंवा इतर वाहनाने त्यांच्या घरच्या घरी जाण्याची परवानगी दिली पाहिजे. अशी परवानगी दिली नाही आणि येणाऱ्या प्रवाशांचे काही बरे-वाईट झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासन घेईल काय?

ग्रामीण भागामध्ये एखादा रुग्ण आजारी असल्यास त्याला डॉक्टरकडे किंवा रुग्णालयात न्यायचे कसे? म्हणून `जनता कर्फ्यू’मध्ये प्रवाशांना-रुग्णांना रिक्षातून नेण्याची परवानगी दिली पाहिजे. अन्यथा प्रशासनाने त्यांची सोय केली पाहिजे. `जनता कर्फ्यू’ आवश्यकच आहे; पण प्रवाशांचा आणि रुग्णांचे हाल होणार असतील तर `जनता कर्फ्यू’ हा दडपशाहीचा एक भाग असेल. तूर्तास एवढे पुरे! याबाबत सविस्तर लिखाण नक्कीच करू!

 

-संतोष नाईक
सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी- पाक्षिक स्टार वृत्त
सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष- ह्युमनराईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन

You cannot copy content of this page