संपादकीय- तरच जीवनाचे अंतिम सत्य गवसेल!

जीवनात आर्थिक गरिबी असली की अनेक समस्या-प्रश्न निर्माण होत असतात. त्याच्याशी मुकाबला करावा लागतो. तो खडतर आणि शारीरिक मानसिक वेदनादायी प्रवास केल्यानंतर खूप वर्षांनी जीवनाचे मर्म समजून येते. अनेक मानवी स्वभावांचा अभ्यास परिपक्व होतो. चांगलं-वाईट याची ओळख पटकन होते. अशी व्यक्ती जेव्हा प्रामाणिक व नैतिकता जपणारी असते तेव्हा त्याच्या जीवनाचा प्रवास अधिकाधिक खडतर राहतो. पण दीर्घ प्रवासानंतर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वामध्ये झालेला बदल त्याच्या कुटुंबासाठी, त्याच्या मित्रमंडळींसाठी, नातेवाईंसाठी, तसेच तो ज्या समाजात राहतो त्या समाजासाठी दिशादर्शक राहतो- आदर्शवादी राहतो. अनेक वर्षाच्या अनुभवानंतर आलेले प्रौढत्व संपर्कातील व्यक्तींचे जीवन अधिकाधिक सुंदर असे होईल? ह्याचे खरेखुरे मार्गदर्शन करणारे असते. अशी अनुभव संपन्न व्यक्ती समोरच्या व्यक्तीला बरे वाटावे- चांगले वाटावे म्हणून बोलत नसतात; तर समोरच्या व्यक्तीने खड्ड्यात पडू नये म्हणजे भविष्यात समोरच्या व्यक्तीच्या जीवनात अडथळे – समस्या येऊ नयेत; यासाठी ते रोखठोक भूमिका मांडत असतात.

मात्र अनुभवसंपन्न व्यक्तीची हीच रोखठोक भूमिका अनेकांना आवडत नसते; कारण समाजात स्वस्वार्थाचा अवगुण एवढा वाढला आहे की त्याच्या पलीकडचा विचार अनेकांना रुचत नाही- पटत नाही. हे एक कारण आणि दुसरं कारण असे की, जीवन जगण्याचा अनुभव नसल्याचे अडाणीपण अंगी असणे. ह्या दोन्ही गटात मोडणाऱ्या व्यक्तींना अनुभवी लोकांचे प्रेमापोटी असलेले सल्ले सुद्धा टोचत राहतात. एवढेच नाही तर ती अनुभवी व्यक्तीच अहंकारी वाटते. त्या व्यक्तीचे बोलणं आवडत नाही. यातूनच त्या चांगल्या व्यक्तिमत्त्वाचा तिरस्कार- द्वेष वाढीस लागतो. मग अनुभवसंपन्न प्रामाणिक व्यक्तीविरुद्ध कुंभाड रचले जाते, त्याची बदनामी केली जाते, त्याला नालायक ठरविले जाते.

कुटुंबामध्ये, समाजामध्ये, संघटनेमध्ये जर अशा अनुभवी प्रामाणिक नैतिकता जपणारी व्यक्ती नसतील तर त्या कुटुंबाचे, समाजाचे, संघटनेचे भवितव्य अधांतरी होते. त्यांना अपयश येते; हे लक्षात ठेवायला पाहिजे. अनुभवी प्रामाणिक व्यक्तीला टाळल्याने- बाजूला सारल्याने प्रगतीकडे जाणारा मार्ग रोखला जातो; हे आपणास समजायला खूप वेळ निघून जातो आणि जेव्हा समजतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अनुभवी प्रामाणिक व्यक्ती स्वार्थी व अडाणी लोकांच्या वर्तणुकीला कंटाळते व सल्ला देण्याचे थांबविते तेव्हा आपले नुकसानच होते.

बुडते हे जन न देखवे डोळा। येतो कळवळा म्हणोनिया।

आम्ही बुडत असताना त्याला पाहवत नाही म्हणून त्यांना आमचा कळवळा येतो. त्यासाठीच ते जीव तोडून आमच्याशी संवाद साधत असतात. आपल्या कुटुंबातील, नातेवाईकांमधील, मित्रमंडळींमधील एखादी व्यक्ती वाईट मार्गावर जाण्याच्या मार्गावर असेल किंवा त्याने वाईट मार्गावर जाऊ नये, त्याच्या जीवनात समस्या निर्माण होऊ नये म्हणून अनुभवी प्रामाणिक व्यक्ती रोखठोकपणे बोलत असते. त्याला समजावत असते. हीच खरी प्रेमाची भावना!

जन्मदाती आई आपल्या मुलाला शाळेत पाठविताना कष्ट घेते. जर मुलाने शाळेत जाण्यासाठी, अभ्यास करण्यास टंगळमंगळ केली तर त्याला मारते-झोडते. कारण तिचा त्या मुलावर सच्चे प्रेम असते. आपल्या मुलाने खूप शिकावे, सुसंस्कृत व्हावे; हीच त्या आईची इच्छा असते. मात्र सावत्रआई आपल्या सावत्र मुलाची नेमकं उलट वागेल. म्हणून जन्मदात्या आईप्रमाणे अनुभवी प्रामाणिक माणसं आपल्या अनुभवाच्या खडतर प्रवासाच्या अभ्यासातून जे रोखठोकपणे सल्ले देतात ते प्रेमाने स्वीकारायचे असतात आणि जे स्वीकारतात त्यांच्या जीवनाचं भलं होतं. अनुभवी व प्रामाणिक व्यक्तिमत्व चिडखोर वाटेल, अहंकारी वाटेल, बडबड करणारे वाटेल, त्रासदायक वाटेल; पण त्यांच्या भावना आपणास समजून घेता आल्या पाहिजेत. एवढा विचार मानव म्हणून आपणास करावाच लागतो.

स्वस्वार्थच्या दुनियेत जगताना प्रामाणिक अनुभवी आणि नैतिकता जपणाऱ्या व्यक्तींनीही विचार करावा; असं मला वाटतं! `आमचं भलं करण्यासाठी तुम्ही आम्हाला कितीही प्रेमाने सांगा किंवा ठणकावून सांगा; उचित मार्गावर नेण्यासाठी कितीही प्रयत्न करा; पण आम्ही अजिबात ऐकणारच नाही. उलट तुमचा अपमान करून तुम्हाला बाजूला करू!’ अशी भूमिका असणाऱ्या व्यक्तींच्या भल्यासाठी बोलणं अनुभवी प्रामाणिक माणसांनी खरोखर सोडून द्यावं. त्यांच्या आयुष्यात कठीण प्रसंग आल्याशिवाय त्यांना जाणीव होणार नाही; त्यांना जीवनाचे अंतिम सत्य कधीच सापडणार नाही; हे लक्षात घ्यावे! प्रामाणिक- अनुभवी व्यक्तींनी आपल्या उर्वरित आयुष्याचाही विचार करावा! भावनिक होऊन अशा लोकांचा विचार करत राहण्यापेक्षा स्वतः आणखी अनुभव घेण्यासाठी विविध क्षेत्रांत कार्य करीत राहावे! त्यातूनच जीवनाचे अंतिम सत्य गवसेल! जीवनाचे अंतिम सत्य म्हणजे मृत्यू नाही तर मृत्यूनंतरही आपले आचार-विचार सर्वसामान्य लोकांसाठी प्रेरणादायी ठरतील.