स्वर्गीय प्राचार्य मुकुंदराव कदम- सत्याकडे नेणाऱ्या जाणत्या विचारांचा सह्याद्री!

।। हरि ॐ।।

महाराष्ट्रातील जेष्ठ निर्भिड पत्रकार, दैनिक ‘सिंधुदुर्ग समाचार’ चे संस्थापक संपादक, शिक्षणतज्ञ, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आणि कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी लढणाऱ्या स्वर्गीय प्राचार्य मुकुंदराव कदम आमच्यातून निघून गेल्यावर एक वर्ष झालं. कालच देवगड तालुक्यातील गढिताम्हणे ह्या त्यांच्या मुळ गावी ‘वर्षश्राद्ध’ विधी त्याच्या कुटुंबियांनी केला. स्वर्गीय प्राचार्य मुकुंदराव कदम म्हणजेच आमचे ‘सर’ यांना विनम्र अभिवादन!

‘भावपूर्ण श्रद्धांजली’ हा शब्द वापरण्याची आमची लेखणी धजावत नाही. कारण आमचे सर अजूनही आमच्यामध्ये आहेत. त्यांनी देह सोडला तरी आमचं मन अजूनही ते स्वीकारायला तयार होत नाही. सरांच्या आठवणींनी हृदय ठोके वाढवितं, फुप्फुसं श्वास भराभर घेऊ लागतं, संपूर्ण शरीर थरथरतं, आपोआप डोळ्यामध्ये पाणी जमा होतं. कारण आमच्या सरांनी मलाच नव्हे तर अनेकांना `बापाचा आधार आणि आईचे प्रेम’ दिलं.

प्राचार्य मुकुंदराव कदम यांनी ज्या क्षेत्रात कार्य केलं त्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमठविला. उच्च शिक्षण घेऊन प्राचार्यपर्यंतचा प्रवास, नंतर पत्रकारितेमध्ये आगमन करून सरांनी सत्याकडे नेणाऱ्या जाणत्या विचारांचा कणखर सह्याद्री उभा केला. ते विचार एका कर्तुत्ववान आदर्श गुरुचे होते; खेडेगावापासून जागतिक समस्यांची जाण असणाऱ्या आणि त्या समस्यांची उकल करणाऱ्या निर्भिड संपादकाचे होते. स्वाभिमान हा शब्द आज गुळगुळीत दगडासारखा झालाय; परंतु सरांकडे असणारा स्वाभिमान हा खरा होता. त्यांनी आपले विचार नेहमीच निर्भिडपणे मांडले. काहीजणांना संराचा सत्याकडे नेणारा निर्भिडपणा न पचणारा- न रुचणारा होता. तसेच सरांच्या कणखरपणामुळे सरांकडे कधी ढोंगी माणसं जास्त काळ टिकली नाहीत. म्हणूनच आजच्या राजकारणाच्या चिखलात सरांचे कमळ फुलले नाही, ही कोकणची शोकांतिका ठरली. कारण सरांसारख्या कणखर अभ्यासू नेता जर कोकणला लाभला असता; तर कोकणच्या विकासाचे स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरले असते आणि आम्ही त्याची फळे आज चाखली असती! महाराष्ट्राच्या विधानभवनात तसेच देशाच्या संसदेमध्ये प्राचार्य मुकुंदराव कदम यांच्यासारखे दैदिप्यमान नेतृत्व लाभले असते तर त्यांच्या विचारांनी लोकशाहीची मंदिरं अधिक मजबूत झाली असती. परंतु राजकारणात लागणारी कपटनीती, स्वार्थीपणा सरांकडे नव्हता. त्यांच्याकडे खरेपणा होता, सच्चाई होती, सामान्य माणसांविषयी तळमळ होती, विद्यार्थ्यांबद्दल आस्था होती, गरिबांवर प्रेम होतं, समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याची जिद्द होती, पत्रकारिता करण्यासाठी लागणारी निर्भिडता होती म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वास साष्टांग दडवंत!

दैनिक `सिंधुदुर्ग समाचार’ नव्या रूपात वाचकापर्यंत यावा यासाठी त्यांच्या उच्चविद्याविभूषित असणाऱ्या मुलांनी गेल्या वर्षभरात यशस्वी प्रयास केले आहेत. सरांचे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होईल. त्या सर्वांसाठी आमच्या मन:पुर्वक शुभेच्छा सदैव आहेत. दैनिक `सिंधुदुर्ग समाचार’ हे सरांचे ‘सर्वकाही’ होते. त्याची जपवणूक झाल्यास ‘सरांना’ आनंद होईल. कारण कोकणात दैनिक ‘सिंधुदुर्ग समाचार’ने पत्रकारितेतील जी क्रांती घडविली त्याचे प्रणेते म्हणून स्वर्गीय मुकुंदराव कदम यांचे नाव अजरामर झाले आहे. अशा माझ्या सरांची आठवण प्रत्येक दिवशी-प्रत्यक्ष क्षणी येणारच आहे! त्यांच्या आठवणीने पत्रकारितेची मुल्य आमच्या मनात अधिकाधिक दृढ होत आहेत. अशा माझ्या सरांच्या विचारांचा प्रसार व्हावा, ही माझी इच्छा आहे. त्यासाठी भविष्यात निश्चितपणे प्रयास करण्याचा मानस आहे! (क्रमश:)

–नरेंद्र राजाराम हडकर

२५ डिसेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध झालेला लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!
https://starvrutta.com/editorial-salute-to-senior-journalist-editor-principal-mukundrao-kadam/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *