परोपकारी आदर्श गुरू प्रमोद लोके सरांना मानाचा मुजरा!

श्री. प्रमोद लोके सरांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा!

आज कोळशी-हडपीड माध्यमिक हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्मा. श्री. प्रमोद नामदेव लोके सेवानिवृत्त होत आहेत; त्या निमित्ताने आमच्या खूप खूप शुभेच्छा!

श्री. प्रमोद लोके सर हे सायन्समधील पदवीधर. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. मात्र त्यांनी अगदी ध्येयसमोर ठेऊन शिक्षकीपेशा स्वीकारला आणि सेवानिवृत्त होईपर्यंत हजारो विद्यार्थी घडविले. सायन्स विषयाचा शिक्षक हा प्रॅक्टिकल जीवन जगत असतो; असं म्हणतात; पण लोके सरांनी जीवनात यशस्वी होण्याचा प्रॅक्टिकली मार्ग आपल्या विद्यार्थ्यांना दिला. आपल्या शाळेतीलच नव्हे तर कोणत्याही शाळेचा विद्यार्थी असो; त्या विद्यार्थ्याला योग्य सल्ला देण्याचे काम अगदी प्रामाणिकपणे ते करीत असतात; म्हणूनच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक झाले. विद्यार्थ्यांबरोबर सुसंवाद साधणारा शिक्षक हा आपल्या सेवाकाळातच नव्हे तर चिरंतर विद्यार्थ्यांच्या मनात-हृदयात जिवंत राहतो! हे यश जो शिक्षक मिळवितो तो आदर्श शिक्षक ठरतो! त्यात लोके सर यशस्वी झाले!

माझ्या जीवनातही अगदी प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयीन शिक्षण काळात अनेक प्रामाणिक-कार्यक्षम शिक्षक लाभले. त्यामुळे शिक्षकांबद्दल असलेला आदर कसा व किती असतो? हे निश्चितपणे जाणतो. मी जरी कोळोशी- हडपीड माध्यमिक शाळेत शिकलो नसलो तरी लोके सरांनी मला खूप वर्षांपूर्वी विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून जोडून घेतले. तेव्हा कोळोशी-हडपीड हायस्कूलचे मॉडेल राज्यस्तरीय पातळीवर पोहोचले होते. त्यादरम्यान मुख्याध्यापक असणारे देशमुख सर यांच्याशी अगदी मैत्रीचे संबंध निर्माण झाले. त्याचे श्रेय मी लोके सरांना देतो. कारण माझे कणकवलीतील माध्यमिक शाळेचे आदर्श शिक्षक श्री. अमर पारकर तसेच कणकवली कॉलेजचे तात्कालीन प्राचार्य शिंदे सर आणि देशमुख सर जेव्हा एकत्र येतात तेव्हा माझा विद्यार्थी म्हणून अभिमानाने उल्लेख करत असतात. मी तर अमर पारकर सरांना, शिंदे सरांना नेहमीच दैवत मानतो. ही शिक्षकांची मांदीयाळी माझ्या जीवनात आली आणि त्याच भावनेने मी लोके सरांकडे पाहतो.

श्री. प्रमोद लोके सरांनी विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट शिक्षण देताना संस्थेच्या प्रगतीसाठी समर्पित वृत्तीने कार्य केले आहे; हे आवर्जून सांगावेसे वाटते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संस्थेसाठी कार्य करताना लोके सरांनी तन-मन-धन अर्पण करून जे समर्पण केले; त्यास तोड नाही!

श्री. प्रमोद लोके सरांकडे परोपकाराची भावना आहे. त्यांचे वडील स्वर्गीय नामदेव लोके खूप मोठी परोपकारी व्यक्ती! त्यांनी आपल्या पंचक्रोशीतील शेकडो गरीब अशिक्षित तरुणांना मुंबईला नोकरीला ठेवले. लोके सरांचा मोठा भाऊ स्वर्गीय सुभाष यांनी सुद्धा शेकडो लोकांना नोकरीला ठेवले. परोपकाराचे हे कार्य लोके सरांचे बंधू राजकुमार आणि बाबुराव उर्फ दाजी यांनीही पुढे सुरू ठेवले. ते नेव्हीमध्ये देशसेवा करून निवृत्त झाले आहेत. याचा अर्थ संपूर्ण कुटुंबाने परोपकाराचा वसा स्वतःहून स्वीकारला. श्री. प्रमोद लोके सरांनी गुरूची भूमिका स्वीकारून प्रेमाचा, आपुलकीचा, मायेचा सागर तयार केला; तो आजच्या सत्कार समारंभास पाहावयास मिळाला!

असलदे गावामध्ये अनेक आदर्शवादी व्यक्ती होऊन गेल्या आणि आजही अनेक आदर्शवादी व्यक्ती आहेत. त्यामध्ये प्रमोद लोके सरांचे नाव अगदी सर्वोच्च स्थानी आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासह सुसंस्कार देत लोके सरांनी आदर्श निर्माण केला. तसेच शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी मोलाचा वाटा उचलला. आपल्या मुलांनाही उच्च शिक्षण दिले. आध्यात्मिक कार्यात स्वामी समर्थांच्या चरणी निष्ठा ठेवून त्यांनी सर्वांना आपलेसे केले.

श्री. प्रमोद लोके सरांचा आदर्शवाद हा एवढ्या पुरताच मर्यादित नाही; तर आपण ज्या गावात राहतो त्या गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल? त्यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रयास केले आहेत. २०१६ साली ग्रामपंचायतीने अन्यायकारक घरपट्टी नियमांची उल्लंघन करून बसविली. तेव्हा त्यांनी दिलेला लढा आमच्यासाठी प्रेरणादायी होता. शक्यतो शिक्षक आपल्या क्षेत्राशिवाय इतर गोष्टींकडे लक्ष देत नसतो; असे म्हणतात. पण लोके सरांनी सकारात्मक आक्रमकपणा दाखविला. तो आम्हा ग्रामस्थांना निश्चितच आदर्शवादी होता. जो सत्याची लढाई लढतो त्याला जाणूनबुजून त्रास दिला जातो; तसा त्रास लोके सरांना झाला; पण ते डगमगले नाहीत. डगमगणे हे त्यांच्या रक्तातच नाही.

अशाप्रकारे लोके सरांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यांनी समाजासाठी, गावासाठी, विद्यार्थ्यांसाठी, शाळेसाठी दिलेले योगदान कधीच विसरता येणार नाही. एक आदर्शवादी शिक्षक हजारो-लाखो आदर्श नागरिक देशाला देत असतो आणि ते कार्य लोके सरांनी केलेले आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या कार्यास आमचा मानाचा मुजरा!

वयोमनानुसार ते जरी सेवानिवृत्त होत असले तरी भविष्यात पंचक्रोशीत, तालुक्यात, जिल्ह्यात शैक्षणिक चळवळ त्यांनी उभी करावी. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी संकल्पना मांडून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्य करावे; असा आमचा आग्रह असेल आणि त्यांना ते नक्कीच आवडेल. कारण परोपकाराची वृत्ती जोपासणारा आदर्श शिक्षक जेव्हा समाजात वावरतो तेव्हा त्याच्याकडून खूप मोठे कार्य सहजपणे घडते! अशा परोपकारी आदर्श शिक्षकाला नतमस्तक होताना आम्हा प्रत्येकाला त्यांच्या मार्गावरून चालता आले पाहिजे!

यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते! श्री. प्रमोद लोके सरांच्या मागे त्यांची पत्नी नेहमीच ठामपणे उभी राहिली. त्यांनाही मानाचा मुजरा! श्री. प्रमोद लोके सरांचा आज सेवानिवृत्त सत्कार समारंभ संपन्न झाला आणि त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची विशालता सर्वांच्या लक्षात आली. श्री. प्रमोद लोके सरांना पुढील जीवनासाठी आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा! त्यांनी त्यांच्या आयुष्यात सुख, संपत्ती, सुयश, धन, आनंद, समाधान आणि सुदृढ आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो; ही श्रीरामेश्वर, श्रीपावणाई देवी, श्रीमाऊली देवी चरणी प्रार्थना! स्वामी समर्थांची कृपा त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनात सदैव प्रवाहित राहू दे; ही सदिच्छा!

-नरेंद्र राजाराम हडकर

You cannot copy content of this page