गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे-एसटी आवश्यक!

कोरोना आजाराबाबत आता चांगल्याप्रकारे जनजागृती झाली आहे. मागील पाच महिने कोरोनाविषयी खरी-खोटी माहिती आमच्यापर्यंत समाजमाध्यमांद्वारे येऊन पोहचली. त्यामुळे कोरोना रोगाबाबत आपल्या मनाची तयारी झाली आहे; असे म्हणावयास हरकत नाही. २२ ऑगस्ट २०२० रोजी श्रीगणेशोत्सव प्रारंभ आहे. कोकणात जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते. शेकडो वर्षांची परंपरा आणि श्रद्धेचा विषय असल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना सुखाने सहजपणे जात आले पाहिजे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर ट्रेनची आणि एसटीची सोय केंद्र आणि राज्य सरकारला करता आली पाहिजे.

गणेश गणेश उत्सवासाठी विशेष रेल्वे आवश्यक! 

गणेशोत्सव आणि कोकणचे नाते अनोखे आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील घरी गेले असले तरी आजही लाखो चाकरमानी गावी जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जोपर्यंत रेल्वेचा स्वस्त आणि सुरक्षित प्रवास सुरू होणार नाही तोपर्यंत लाखो चाकरमान्यांना गणपतीसाठी गावी जाता येणार नाही. कारण प्रत्येकी किमान तीन हजार रुपये खर्च करून जाणे म्हणजे किमान चार जणांच्या कुटुंबाला १२ हजार रुपये खर्च आणि येताना १२ हजार रुपये खर्च म्हणजे प्रवासावर २४ ते २५ हजार रुपये खर्च करून जाणे असंख्य चाकरमान्यांना शक्य नाही; म्हणूनच गणपतीसाठी मुंबई, विरार, पनवेल येथून किमान दोनशे ट्रेन सोडल्यास सामान्य कष्टकरी चाकरमानी सहजपणे जाऊ शकेल

१४ दिवसांचे विलगीकरण सक्तीचे असल्याने २५ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान कोकणात जाण्यासाठी ट्रेन सोडणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे ह्या ट्रेनच्या भाड्यात विशेष सवलत देणे आवश्यक आहे. अनेक चाकरमान्यांनी आमच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत; त्या आम्ही मांडत आहोत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परराज्यात जाण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक विशेष रेल्वेगाड्या व एसटी बस सोडण्यात आल्या. राज्य आणि केंद्र सरकारने त्यासाठी नियोजन करून पुढाकार घेतला होता. त्याचप्रमाणे कोकणवासीयांना गणपतीसाठी गावी जाण्यासाठी विशेष ट्रेन व बस सोडण्यात याव्यात. महाराष्ट्र शासनाने सवलतीच्या दरात एसटी बसची सोय करून कोकणवासीयांची मागणी पूर्ण करावी. कारण कोरोना महामारीच्या काळात ज्यांची आर्थिक पत आहे तेच खाजगी वाहन घेऊन गावी जाऊ शकले किंवा कर्ज काढून ते गावी गेले. ( ईपाससाठीही आर्थिक देवाण-घेवाण करणं; हा तर खूप मोठा अडसर अजूनही आहेच.) त्यामुळे नियमित किंवा सवलतीच्या दरात चाकरमान्यांना गावी पाठवावे आणि पुन्हा घेऊन यावे! कोकणवासीयांच्या ह्या भावना मुख्यमंत्री महोदयांनी लक्षात घ्याव्यात!

वसई सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने यासंदर्भात माननिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन दिले असून कोकणातील चाकरमान्यांना समाजमाध्यमांमार्फत एकत्रित करून पुढील वाटचाल करणार आहेत. कोकणवासियांच्या मागण्या शासनाने त्वरित मंजूर कराव्यात.

–नरेंद्र हडकर

You cannot copy content of this page