त्रिविक्रमा तुझे तिसरे पाऊल उचल आणि माझ्या अहंकाराचा, तुझ्या विस्मरणाचा आणि त्यातून येणाऱ्या संकटांचा नाश कर!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने– लेखांक सतरावा

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

खरा भक्त राही, दोन चरणांत माझ्या ।
तिसरे पाऊल माझे तुडवील संकटास तुमच्या ॥

त्रिविक्रमांच्या चरणांचा आश्रय घेणाऱ्या भक्ताच्या संकटांचा नाश श्रीत्रिविक्रम करतात. त्यांचे अदृश्य आणि व्यापक असे तिसरे पाऊल या संकटांना तुडविते.

आधीच्या वचनांमध्ये भक्ताच्या पापांच्या आणि संकटांच्या निरसनाविषयी उल्लेख आला आहे. मग पुन्हा संकटांच्या नाशाविषयी का सांगितले असेल? हा व्यावहारिक संकटांचा नाश तर आहेच; पण याहूनही थोड्या वेगळ्या अर्थाचा आनंद मिळणार असला तर त्याला का मुकावे? त्रिविक्रमांच्या दोन पावलांचा आश्रय घेणे म्हणजे भक्ताचे संपूर्ण प्रेम, संपूर्ण शरणागती. असा भक्त श्रीत्रिविक्रमांच्या दोन चरणांत असल्यामुळे जो त्रिविक्रमांचा मार्ग; त्या देवयान पंथावरूनच या श्रद्धावानाचा प्रवास निरंतर होत राहतो. त्या मार्गात येणारे अडथळे त्रिविक्रमांचे तिसरे पाऊल दूर करते. म्हणजे काय? हे तिसरे पाऊल आम्हाला दिसत नाही. हे अदृश्य रुपाने, कल्पनातीत मार्गांनी संकट दूर करून आमचा साधना प्रवास सुरळीत ठेवते.

या वचनात ज्या संकटांविषयी त्रिविक्रम सांगतात ती त्या त्या भक्ताच्या साधना मार्गातली संकटे असावीत, असे मला वाटते.

भक्ती, योग, कर्म आणि ज्ञान हे परमात्म्याप्रत जाण्याचे पवित्र मार्ग आहेत. या सर्व मार्गांमध्ये सद्गुरूंची आवश्यकता निर्विवादपणे सांगितली आहे. सद्गुरु त्रिविक्रमांच्या दोन चरणांत राहणारा खरा भक्त म्हणजे त्यांच्या इच्छेच्या प्रांतात राहणारा भक्त. रावणासारख्या असुरानेही तपश्चर्या केली. त्याचे फळ मिळाले. पण तो देवावर प्रेम करणारा भक्त नव्हता. त्यामुळे त्याला नियमाप्रमाणे तपश्चर्येचे फळ मिळाले. पण ते चिरकाल टिकले नाही.

सद्गुरूंच्या इच्छेच्या प्रांतात राहणे म्हणजे काय ?

“हा देव आहे की नाही? हा देव मला सहाय्य करणार की नाही ? हा संशय आला की आपण नियमांच्या प्रांतात येतो. मग जेवढं प्रारब्ध घेऊन आलात तसंच नियमानुसार घडणार. मनापासून त्याच्यावर प्रेम करत असाल तर तुम्ही इच्छेच्या प्रांतात येता. तो तुमच्यासाठी पार्शलिटी करतो. हे स्वत:चा शोध घेतल्याशिवाय जमणार नाही.” (परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन ३० जानेवारी २०१४)

‘श्रद्धवानांच्या जीवनात येणार्‍या संकटांच्या वेळी मूळ सद्गुरुतत्व अर्थात त्रिविक्रम श्रद्धावानाला आपल्याशी बांधून ठेवतो आणि खर्‍या श्रद्धावानाला कोणत्याही संकटातून दूर करतो. त्रिविक्रम कोणत्या मार्गाने श्रद्धावानाचे सहाय्य करतो, याची कल्पनाही श्रद्धावानाला येऊ शकत नाही’, असे  मूळ सद्गुरुतत्व असलेल्या त्रिविक्रमाबद्दल बापूंनी तुलसीपत्र १४६४ मध्ये लिहीले आहे.

आता एकेका मार्गावरील प्रवासाचा विचार करू. ज्ञानमार्गावरील श्रद्धावानाचा प्रवास! याला हेमाडपंतांनी विहंग मार्ग म्हणले आहे. ( विहंग म्हणजे पक्षी ). या मार्गावर काय संकट येऊ शकते?

रामफळासी पतनभय । ज्ञानियाही नाहीं निर्भय । झाला पाहिजे सिद्धिविजय । लव हयगय कामा न ये ॥ (श्रीसाईसच्चरित १९/३१ )

सद्गुरु चरणांचा आश्रय घेणाऱ्या ज्ञानमार्गी श्रद्धावानांसाठी सद्गुरूंचे दोन चरण दोन पंख बनतात आणि तिसरा चरण ओंजळ बनून या भक्ताचे पतनापासून रक्षण करतो, त्याला झेलून धरतो. सिध्दींच्या मोहापासून दूर ठेवतो.

कर्ममार्गी श्रद्धावान वर्णाश्रमधर्मोचित कर्मे करून त्याचा साधनापथ क्रमत असतो. मानवी देहात आल्यानंतर कर्म करताना स्थैर्य ( तमोगुण ) आणि गती ( रजोगुण ) हे दोन्ही आवश्यक असतात. या रज आणि तम गुणांमुळे कर्ममार्गाच्या आचरणात अडचणी येऊ शकतात. श्री त्रिविक्रमांच्या वर्णनात आम्ही पाहतो
वामपादेन अचलं , दक्षिणेन गतिकारकम्… (- श्रीअनिरुद्ध कवच)

सद्गुरु त्रिविक्रमांचा कर्ममार्गी भक्त, या दोन विरुद्ध गुणांना धारण करणाऱ्या गुरुचरणांचा आश्रय घेतो. त्याच्या प्रवासात सद्गुरुंचे तिसरे पाऊल सत्वगुण मिळवून देते. सत्व गुण हा प्रकाशक आहे. असा श्रद्धावान प्रकाशाच्या मार्गावर वाटचाल करीत राहतो.

योगमार्गात साधक यमनियमादि योगांगांचे आचरण करून शरीरशुद्धी, नाडीशुद्धी करतो. इडा आणि पिंगला यांच्या साह्याने तो प्राणायामादि साधने करतो. श्री साईसच्चरित चौथ्या अध्यायात दासगणूंच्या कथेत आम्ही पाहतो की, साईनाथांच्या दोन चरणांच्या अंगुष्ठांतून त्यांना गंगायमुनांचे दर्शन होते. या प्रसंगाचे वर्णन करताना दासगणूंनी लिहिलेल्या पदात ते म्हणतात,

वेणीमाधव आपण होउनि प्रयाग पद केलें । गंगा यमुना द्वय अंगुष्ठीं प्रवाह दाखविले ॥

आम्हाला माहिती आहे की प्रयाग हा त्रिवेणी संगम आहे. फक्त गंगा यमुना संगम नाही. मग दासगणू याला प्रयाग का म्हणतात ? गुप्तपणे जी सरस्वती नदी या गंगायमुनांना मिळते तेव्हाच ते प्रयाग स्थळ होऊ शकते. साईनाथांच्या तिसऱ्या अदृश्य पाऊलाची, त्यातून वाहणा-या सरस्वतीची जाणीव दासगणूंना झाली असावी का? योगमार्गात या गंगा यमुना कोणत्या?

इडा गंगेति विज्ञेया पिंगला यमुना नदी।
मध्ये सरस्वती विद्यात्प्रयागादि समस्तया।।

इडा नाडी म्हणजे गंगा आणि पिंगला नाडी म्हणजे यमुना. यांच्यातून प्राणाचे चलन प्राणायामाने साध्य होते. पण मध्ये सुषुम्ना रूपाने जी सरस्वती नदी आहे ती सर्वस्वी सद्गुरुअधीन आहे. सुषुम्ना नाडीत शक्ती स्थिर होत नाही तो पर्यंत योगसाधनेला पूर्णता नाही. मग हे कसे होते?

कबहु इडा स्वर चलत है कभी पिंगला माही। 
सुष्मण इनके बीच बहत है गुर बिन जाने नाही।। 

सद्गुरु चरणांचा आश्रय घेणाऱ्या, सद्गुरुचरणी स्थिर झालेल्या योगमार्गी भक्तासाठी सद्गुरूंची दोन पावले गंगा यमुना म्हणजेच इडा आणि पिंगला होतात आणि सद्गुरु त्रिविक्रमांचे तिसरे पाऊल सुषुम्नेला कार्यरत करते. शक्तीला सुषुम्नेत स्थिर करते.

सर्वात शेवटी श्री त्रिविक्रमांना प्रिय असणारा भक्तिमार्ग! भक्तिमार्गाचे सुख असे की हा प्रवास भक्तही करीत असतो आणि सद्गुरूही करीत असतात.

मूळ रूपापर्यंत जाणं म्हणजे ज्ञानमार्ग जो दुष्कर आहे. हा भक्तिमार्ग जो आहे, हा प्रवास दोन्ही दिशांनी आहे. अर्ध अंतर तुम्ही चाला, अर्ध अंतर तो चालतो. ( परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन ३० जानेवारी २०१४)

अशा भक्ती मार्गावरील साधकासाठी त्रिविक्रमाची तीन पावलं कोणती?
त्रिविक्रमाची ही तीन पावले म्हणजे अकारण कारुण्य, क्षमा व भक्तीचा स्वीकार. क्षमा आणि भक्तीचा स्वीकार या दोन पावलांमागेही अकारण कारुण्य हेच तिसरे अदृश्य पाऊल दडलेले आहे. भक्तासाठी त्रिविक्रम सद्गुरु जे काही करतो ते फक्त आणि फक्त अकारण कारुण्यामुळेच!!!

भक्तीच्या मार्गात कोणते संकट असू शकते? सर्वात महत्वाचे म्हणजे हरिनामाचा विसर हेच. नाम घ्यायचे त्यातही एकाग्रता नसते, सातत्य नसते, अनेकदा प्रेमही नसते. पण अशी वेडीवाकडी भक्तीही सद्गुरु प्रेमाने स्वीकारतो; क्षमाही करतो आणि हे अकारण कारुण्याचे त्याचे अदृश्य तिसरे पाऊल आमचे रक्षण करते.

ज्ञान, कर्म, योग, भक्ती या सर्व मार्गांवर अहंकार हेच सर्वात मोठे संकट असते; त्यातूनच सद्गुरुनामाचा विसर पडतो आणि संकटांची मालिकाच सुरू होते. हेमाडपंतही हेच सांगतात.

मीपणा समर्पितां  पायांवर । सौख्य लाधेल अपरंपार । सकळ सुखाचा संसार । अहंकार गेलिया ॥
(श्रीसाईसच्चरित २/६४ )

वामनावतारात असुरराज बलीच्या महाबली ( बलवान ) झालेल्या अहंकारावर ( मस्तकावर ) त्रिविक्रमाने तिसरे पाऊल ठेवले आणि तो व्यापून टाकला. भक्तराज बलीला मात्र दोन चरणांत आश्रय देऊन पाताळीचे राज्य दिले आणि त्याच्या द्वारात द्वारपाल बनून श्रीहरी स्वतः उभा राहिला. आम्ही कोणत्याही पवित्र मार्गावर असू; त्रिविक्रमांना हीच प्रार्थना करायला हवी की ; तुझे तिसरे पाऊल उचल आणि माझ्या अहंकाराचा, तुझ्या विस्मरणाचा आणि त्यातून येणाऱ्या इतर संकटांचा नाश कर.

रात्रीस सूर्य उजळेल
माध्यान्ही चंद्र उगवेल
होईल जादू ही, जेव्हा
तू उचलशील पाऊल

माझ्याही डोक्यावरती
हा मुकुट अहंकाराचा
निमिषातच उडवी त्यास
माझ्यात हा न राहील
होईल जादू ही, जेव्हा
तू उचलशील पाऊल

जे हिणकस मम सोन्यातील
अन् तण जे मम शेतातील
वैश्वानर तू ,जाळ तयासी
मग शुद्ध तेच राहील
होईल जादू ही , जेव्हा
तू उचलशील पाऊल

“मी” “माझे” काही नुरेल
पण “तू” “माझा” असशील
द्वैतातील अद्वैताची
उमटेल तुझी चाहूल
होईल जादू ही, जेव्हा
तू उचलशील पाऊल

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

– डाॅ आनंदसिंह बर्वे

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक सोळावा वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

You cannot copy content of this page