माझा सिंधुदुर्ग- प्रशासनाची कार्यक्षमता आणि राज्यकर्त्यांची पालकत्वाची भावना महत्वाची!
चाकरमान्यांमुळे कोरोनोचा प्रसार…? हा आरोप करण्यापूर्वी नक्की वाचा!
कोविड १९ विषाणूमुळे संपूर्ण जग आज संकटात सापडलेले असताना आपण प्रत्येकजण त्यातून अलिप्त कसे राहू शकतो? चीनमधील वुहान शहरातून पसरलेला कोविड १९ विषाणू आमच्या जिल्ह्यातील गावापर्यंत येऊन पोहोचला. ह्या विषाणूचा प्रसार आमच्या जिल्ह्यापर्यंत कसा झाला?
३० जानेवारी २०२० भारतात केरळमध्ये कोरोना विषाणू बाधित पहिला रुग्ण सापडला. बाधित तरुण चीनमधील वुहान विद्यापीठात शिक्षण घेत होता. भारतात परतल्यानंतर त्याची तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळला. ३० जानेवारीपर्यंत कोरोनाने जगभरातील १७० जणांचा मृत्यू झाला होता. या जीवघेण्या विषाणूने होणाऱ्या आजाराची लक्षणं असलेले ४ संशयित मुंबईत आढळून आले; त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पुण्यातही २ संशयित आढळून आले.
१० मार्च २०२० रोजी महाराष्ट्रात पहिला रुग्ण सापडला तो पुण्यात. पुण्यातील ४९ आणि ५१ वर्षांचे दोघे पती पत्नी हे २० ते २९ फेब्रुवारी दरम्यान दुबईला गेले होते. १ मार्चला पुण्यात परतले. त्या दोघांना करोना या विषाणूची लागण झाल्याचे निदान झाले. हे दोघे महाराष्ट्रातील पहिले पॉझिटिव्ह पेशन्ट असल्याचे आरोग्य खात्याचे राज्य रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे जाहीर केले.
पुण्यातील ह्याच दांपत्याबरोबर दुबईला गेलेल्या मुंबईतील दोघांना ११ मार्च रोजी कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. अशाप्रकारे कोरोनाने भारताच्या आर्थिक राजधानीत प्रवेश केला.
सिंधुदुर्गात पहिला रुग्ण २६ मार्च रोजी सापडला. त्याने १९ मार्च रोजी मंगळुरू एक्स्प्रेसने प्रवास केला होता. मंगळुरू एक्स्प्रेसने प्रवास करत असताना कर्नाटकमधील करोना बाधित रुग्णांशी संपर्क आल्याने या प्रवाशाला करोनाची लागण झाली.
देशात, राज्यात, मुंबईत आणि सिंधुदुर्गात अशाप्रकारे कोरोनाने प्रवेश केला आणि कोरोनाबाधित जगाच्या नकाशावर आपण आलो.
आपला गाव सोडून माणसं दुसऱ्या गावात, शहरात, राज्यात, देशात का जातात? नोकरी, व्यवसाय, शिक्षण, निवास ही प्रामुख्याने मुख्य कारणे आहेत. रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरही होते. शंभर वर्षापूर्वी साथीचे रोग आले की, लोक स्थलांतर करून दूरच्या गावी जायचे. त्याचे संदर्भ आजही आढळतात. त्याचप्रमाणे कोकणातील लोक शेकडो वर्षापासून मुंबईत येतात-जातात. आधुनिक भारतात मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी झाली आणि मुंबईमध्ये संपूर्ण भारत सामावला. एवढेच नव्हेतर जगातील-देशातील प्रमुख कंपन्यांची कार्यालये, हेड क्वाटर्स मुंबईतच आहेत. ह्या मुंबई मायानगरीशी कोकणवासीयांच्या अगदी जवळचा संबंध! अगदी स्वातंत्र्य पूर्व काळापासून कोकणाने सदैव मुंबईत तयार होणारी चळवळ आपलीच मानली. गिरण्यांमधील नोकऱ्यांवर कोकणवासीयांचाच भरणा जास्त. तेव्हाचा खडतर पण बोटीचा स्वस्त प्रवास करून मुंबई गाठणारा आणि पुन्हा दोन तीन वर्षाने गावी येणार हा कोकणवासी चाकरमानी कधी झाला; समजलाच नाही. मुंबईत नोकरी करणारा म्हणजेच चाकरी करणारा कोकणातील विशेषतः सिंधुदुर्गातील व्यक्तीला पूर्वी गावात मान असायचा. म्हणूनच त्याला `चाकर+मानी’ असा शब्दप्रयोग वापरला गेला असावा. असो.
चाकरमान्यांमुळे कोरोनोचा प्रसार… हा आरोप कशासाठी? तर मुंबईशी संपर्कात आल्यामुळे जिल्ह्यात कोरोना आला; अशी एक बाजू. पण मुंबईशी संपर्क तोडणार कसा? जिथे संपूर्ण देश ज्या आर्थिक राजधानीच्या शहरामुळे सामर्थ्याने उभा आहे त्या शहराशी किती दिवस संपर्क तोडणार? संपूर्ण जग विविध कारणांनी जवळ आलाय आणि चीनने कोरोना साथ जगापासून लपवून ठेवण्यात धन्यता मानली. त्यामुळे कोरोनाची साथ झपाट्याने जगभरात पसरली. तशी ती जिल्ह्यातही पसरली.
जिल्ह्यातील पहिला रुग्ण ट्रेनमधील बाधित रुग्णाच्या संपर्कात आला. ह्याचा अर्थ कोरोनाची साथ ट्रेनमधून पसरली असा लावायचा का? नाही. जग विविध कारणांनी जवळ आलाय आणि त्यातूनच त्याची प्रगती होते. असं असताना किती दिवस आपण जगापासून अलिप्त ठेऊ शकतो. काही दिवसाच्या लॉकडाऊन मुळे देश आर्थिक संकटात सापडला तिथे सिंधुदुर्गाची काय कथा? जिल्ह्यातील रायवळ आंबा, करवंद, जांभूळ, भाजी, फळे, शेतातील धान्य विकणारे गरीब कष्टकरी जनता आज कंगाल झाली. एसटी बंद असल्याने त्यांना तालुक्याच्या ठिकाणी रानमेवा व विक्रीच्या वस्तू विकता आल्या नाहीत. त्यांच्यासाठी प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी काय केले? त्याचप्रमाणे हापूस आंबा, मासे, कच्चे खनिज जिल्ह्याबाहेर गेल्याशिवाय आणि जीवनावश्यक वस्तूसह इतर सर्व वस्तू जिल्ह्यात आल्याशिवाय जिल्हा जगणार कसा? कुठलाही जिल्हा, कुठलेही राज्य आणि कुठलाही देश अशारितीने स्वतंत्र पद्धतीने वाटचाल करू शकत नाही. म्हणजेच वाहतूक आणि प्रवासी वाहतूक होणारच.
ही साथ जलद गतीने पसरू नये आणि शासनाला आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी, इतर गोष्टींचे नियोजन करण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी उपयोगात आणायचा होता. पण नेहमीप्रमाणे आमचे प्रशासन तोकडे पडलेच. ह्याकडे अजूनही दुर्लक्ष करून जमणार नाही. किती दिवस किती जणांना रोखून ठेवणार? ही महामारी दोन चार महिन्यात जाणार नाही. त्यामुळे त्याच्याबरोबर जगायला शिकलं पाहिजे, असं जागतिक आरोग्य संघटना सांगते. म्हणजेच साथीला रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवीत राहणे आणि जिल्ह्यात बाहेरच्या व्यक्तींना येऊ न देणे; म्हणजे जिल्ह्यातील गरिबांचा अंत करणे.
चाकरमान्यांच्या नव्हेतर कोणाच्याही येण्याला जाण्याला प्रतिबंध घालणे म्हणजे आर्थिक विकासाच्या रथाला रोखणे आणि त्याचा पहिला फटका गरिबांनाच बसतो. देशभरातील मजूर आज कसा जीवघेणा प्रवास करतोय; हे आपण पाहतोय.
आजपर्यंत जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणा सक्षमपणे का उभी राहिली नाही? आरोग्याच्या बाबतीत सिंधुदुर्गवासीयांना नेहमीच गोवा, कोल्हापूर आणि मुंबईवर का अवलंबून राहावे लागले? जिल्ह्यात खाजगी रुग्णालये मोठ्या दिमाखात उभी राहिली; मग शासकीय आरोग्य यंत्रणा नेहमीच कोमामध्ये का ठेवली गेली? जिल्ह्यात साध्यासाध्या आजाराला सुद्धा लोकांना जमिनी विकाव्या लागतात, झाडं विकावी लागतात, गुरंढोरं विकावी लागतात, कर्ज काढावं लागतं आणि लाखो रुपये खाजगी रुग्णालयांना द्यावे लागतात. अक्षरशः वैद्यकीय सेवेच्या नावाखाली लोकांना लुटले जाते. जनतेचा आक्रोश आमच्या कानी का पडत नाही? शासकीय आरोग्य यंत्रणा मुद्दामहून सुधारली नाही; हा जनतेचा आरोप कसा खोडून काढणार? ह्यास सिंधुदुर्गातील राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जबाबदार आहेत. आतातरी राजकारणी नेत्यांनो जागे व्हा.
शासकीय आरोग्य यंत्रणा आणि नियोजन न करणारी कमकुवत आहे म्हणूनच कोरोनाची भीती अधिक आहे. भविष्यातही ती राहणार आहे, ह्याची जाणीव ठेवून प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी नियोजन केले पाहिजे. कमकुवत नियोजन कोरोनाचा प्रसार जलद गतीने वाढविणार आहे. लॉकडाऊनमध्ये काय तयारी केली? ह्याचे चित्र पुढील काही दिवसात दिसणार आहे.
`चाकरमान्यांमुळे कोरोनोचा प्रसार’ असा प्रचार आता तरी थांबविला पाहिजे. सिंधुदुर्गात राहणारी माणसं ह्याच चाकरमान्यांची आई, वडील, भाऊ, बहीण, नातेवाईक आहेत. त्यांना कोरोनाची बाधा व्हावी असं त्यांच्या स्वप्नातही वाटणार नाही. त्याचबरोबर जे जिल्ह्याबाहेरून आलेले आहेत त्यांच्याकडून नियमांची पायमल्ली होत असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे. दाट वस्तीच्या ठिकाणी विलगीकरण केल्याने निश्चितच समस्या निर्माण होऊ शकते. विलगीकरण करताना काही गावाचे सरपंच मनमानी करीत आहेत; ह्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
१) किमान दरदिवशी एक हजार संशयित रुग्णांची चाचणी होणारे केंद्र जिल्हयात त्वरित होणे,
२) सर्व खाजगी रुग्णालये शासनाने ताब्यात घेऊन भविष्यातील गंभीर प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी अचूक नियोजन करणे,
३) खाजगी सेवा देणारे डॉक्टरांची मदत घेणे,
४) प्रत्येक गावात प्रशासकीय यंत्रणा (ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, कृषी अधिकारी, आरोग्य सेविका) कार्यरत असते त्यांना कार्यक्षमतेने कार्याला लावावे;
५) प्रत्येक गावातील व त्या गावासाठी असलेल्या मुंबईतील स्वयंसेवी संस्थांचे (गावाच्या व मुंबईच्या मंडळांचे) सहकार्य घेणे,
६) गाव पातळीवर, तालुका पातळीवर योजना तयार करून त्याची काटेकोरपणे अंमलबाजवणी करणे,
७) जिल्हाधिकाऱ्यांनी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावपातळीपर्यंतचे नियोजन कसे होते? ह्यावर लक्ष ठेऊन कामचुकार-बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे,
८) आणीबाणीच्या परिस्थितीत राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दूर ठेवणे,
९) जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचे सहकार्य घेणे;
अशा उपाययोजना करून कोरोनाविरुद्धची लढाई समर्थपणे लढता येईल. वेळ गेलेली नाही. भावनिक आवाहने करून, वाद -प्रतिवाद करून निवडणुकीची तयारी करता येईल, पण महामारीविरोधात प्रशासनाची कार्यक्षमता आणि राज्यकर्त्यांची पालकत्वाची भावना वरचढ होईल!
-नरेंद्र हडकर