लोकशाही तत्वाला चिरडून मारणारी विकृती ठेचायलाच हवी…!

परवा सकाळी राजापूर येथील पत्रकार शशिकांत शंकर वारीशे (वय ४५ वर्षे, रा. कशेळी) बातमी प्रसिद्ध करतात. ज्या राजापूर रिफायनरी समर्थकाविरोधात ही बातमी असते, त्याच्याच गाडीखाली त्याच दुपारी तो पत्रकार चिरडला जातो. दुचाकीवर असणाऱ्या पत्रकाराला चार चाकी वाहनाने धडक देऊन दोनशे अडीशे फूट फरफटत नेले जाते व ती व्यक्ती पसार होते. दुचाकीवर असणारा पत्रकार रक्ताच्या थारोळ्यात पडतो. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविले जाते व काल पहाटे त्या तरूण पत्रकाराचा मृत्यू होतो. शशिकांत वारीशे यांचे मेहुणे अरविंद दामोदर नागले यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गाडीचालक पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर (रा. राजापूर) याला पोलिसांनी अटक केली असून त्याला राजापूर न्यायालयाने १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे वर्णन युपी- बिहार राज्यातील किंवा तालिबानी राजवट असलेल्या देशातील नव्हे तर कोकणातील आहे. ही बातमी वाचून संताप येतो. पुरोगामी महाराष्ट्रात हे काय चाललंय? ज्याच्या विरोधात बातमी येते त्याच्याच गाडीखाली बातमी प्रसिद्ध करणारा पत्रकार चिरडला जातो; हा योगायोग असू शकत नाही. हे सांगायला आणि ठरवायला कोण्या अतिविद्वानाची गरज नाही. अशा संशयित आरोपीविरोधात कडक कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी पत्रकारांच्या विविध संघटनांनी एकत्र यायलाच पाहिजे. ग्रामीण भागातील पत्रकारावर ही वेळ आली म्हणून शहरी भागातील पत्रकाराने गप्प बसू नये; असे आमचे स्पष्ट मत आहे.

`रिफायनरी प्रकल्प व्हावा’ असं एका गटाला वाटते तर विरोध करणाराही गट मोठा आहे. दोन्ही बाजूने बौद्धिक- वैचारिक पद्धतीने मुद्दे मांडले जाणे अपेक्षित असताना अशाप्रकारे आपण व्यक्त होणे ही विकृती आहे. ह्या संतापजनक घटनेमध्ये एक तरुण पत्रकार चिरडला जातो; हे महाराष्ट्राला शोभणारे आहे का? असा आमचा सवाल आहे.

ह्या संदर्भात आजच सकाळी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर आणि ह्युमन राइट्स ऑफ असोशिएशन फॉर प्रोटेक्शन ह्या संस्थेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ह्या सन्माननिय व्यक्तींनी वरील घटनेसंदर्भात तीव्र शब्दात निषेध नोंदविला आणि शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी केली. आपापल्यापरीने ह्या संघटना पाठपुरावा करतील. मात्र त्यांच्यामागे ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांनी समर्थपणे एकजुटीने उभे राहिले पाहिजे; तरच विकृतीला धाक बसेल.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकाराला चिरडणाऱ्या विकृतीला कायद्याचा धाक दाखविण्यासाठी कठोर भूमिका घ्यायला हवी. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व पक्षाच्या प्रमुखांनी तसेच सामाजिक संस्थांनी, पत्रकार संघटनांनी त्वरित एकत्र येऊन लोकशाहीचा खून करणाऱ्या विकृती विरोधी मोठा लढा उभा केला पाहिजे अन्यथा भविष्य अंधारमय असेल. जनतेची बाजू मांडणारा पत्रकार शिल्लक राहणार नाही. एखाद्याचा जीव घेऊन राजकारण-समाजकारण करणारी विकृती भविष्यात कोणालाच झुकते माप देणार नाही; हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे.

महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यात वाळू माफिया, भू माफिया, अनधिकृत दारू व्यवसाय माफिया, मटका माफिया यांचा दहशतवाद वाढत आहे. हे आपण पाहतोय. विशेष म्हणजे ह्या कुवृत्तीला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे राजकीय पक्षांचे पाठबळ मिळत असते. अगदी गावागावात ह्याचे लोण पसरत चालले आहे. हे लोकशाहीला मारक आहे. विरोधी विचारांना आयुष्यातून उठविण्याची कुसंस्कृती तयार होत आहे. हे थांबविण्यासाठी समाजातील सदसद्विवेकबुद्धी शाबूत असणाऱ्यांनी संघटित व्हायलाच पाहिजे. तरच स्वस्थार्थासाठी दहशतगिरी निर्माण करणाऱ्यांच्या गाड्यांच्या खाली `सत्य-वास्तव’ चिरडणार नाही! सावधान!

-नरेंद्र हडकर