‘सुमंगलम्’ पंचमहाभूत लोकोत्सव देशाला दिशा देणारा उत्सव!

सेंद्रिय शेतीचा अभ्यास करायला जगभरातील संशोधक सिदगिरीत येतील!- मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

कोल्हापूर (प्रतिनिधी):- १३५० वर्षाहून अधिक परंपरा लाभलेल्या सिद्धगिरी मठ, कणेरी येथे जगाला दिशा देणारा ‘सुमंगलमपंच महाभूत लोकोत्सव’२० फेब्रुवारी २०२३ ते २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत होणार असून त्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे. या तयारीच्या पाहणीसाठी मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सिद्धगिरी मठावर आले होते, त्यावेळी पत्रकरांशी संवाद साधताना त्यांनी हे उद्गार काढले. यावेळी त्यांनी आद्य काडसिद्धेश्वरमहाराजांच्या प्राचीन मंदिरात दर्शन घेवून आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मठाने आजपर्यंत आध्यात्मासोबातच कृषी, पारंपरिक शिक्षण, आरोग्य, महिलासबलीकरण, संस्कृतीरक्षण, गो-स्वर्धन, संशोधन आणि आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. याच शृंखलेत आता पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेनुसार‘पर्यवरणरक्षणासाठी’ जगालादीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक होईल असा सुमंगलम पंचमहाभूतलोकोत्सव आयोजित केला आहे. आज पर्यावरणीय हानीच्या अनेक घटना आपण पाहत आहोत. त्सुनामी, अति वृष्टि, भूकंप, महापूर यासारख्या अनेक समस्यांना आज जगाला तोंड द्यावे लागत आहे. आपण आज अशा उंबरठ्यावर उभे आहोत की, आज जर आपण निसर्गाचा सर्वार्थाने विचार नाही केला तर येणाऱ्या काळात जगाला गंभीर पर्यावरणीय समस्याना सामोरे जावे लागू शकते. यासाठी आपण जागृती करणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेनुसार कोल्हापुरातील सिद्धगिरी मठ येथे सुमंगलम् हा पर्यावरणीय लोकोत्सव होत आहे. ही आपल्या राज्यासाठी गौरवाची बाब आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सुमारे ६५० एकर इतक्या विशाल परिसरात उत्सवाची तयारी सुरू असून ही तयारी आता अंतिम टप्यात आली आहे. या उत्सवाला ३० ते ४० लाख लोक सहभागी होणार आहेत अशी शक्यता ग्रहित धरून शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून नियोजनासाठी सिद्धगिरी मठाला सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे व यापुढेही मदत राहील.

यावेळी बोलताना शिक्षणमंत्री दिपक केसरकर म्हणाले, “या लोकोत्सवात प्रामुख्याने पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश या तत्वाचे मूळ स्वरूप, त्यात मानवाने केलेले अतिक्रमण व भविष्यात आपण पुनः ही तत्व मूळ स्वरूपात आणण्यासाठी करावयाची उपाययोजना यासाठी जागृतीचा जागर सात दिवस केला जाणार आहे. यासाठी प्रत्येक तत्वाच्या प्रदर्शनी (गॅलरी) उभारण्यात आलेल्या आहेत. भारतीय परंपरा आणि जीवन शैली यांचे जतन करत येणाऱ्यां पिढीला आपण सात्विक जीवन प्रदान करणे यासाठी विविध माध्यमांच्याद्वारे प्रदर्शनी (गॅलरी) सिद्धगिरी मठावर साकार होत आहेत. यात अनेक गोष्टी बारकाव्याने सादर केल्यामुळे या उत्सवाला भेट देणाऱ्या प्रत्येक घटकापर्यंत हा पर्यावरण रक्षणाचा संदेश अधिक प्रभावीपणे निश्चितच पोहचणार आहे तसेच भारताच्या परांपरीक ज्ञानाची व त्यासंबंधी विविध संशोधन कार्याची ओळख सहभागी लोकांना होणार आहे. समाजाभिमुख कार्य करणारा मठ म्हणून सिद्धगिरी मठाकडे आज पाहिले जाते. हा जागृतीचा संदेश समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी सिद्धगिरी मठच्या सोबत महाराष्ट्र शासन सक्रीय सहभागी राहील.

या उत्सवाबद्दल सांगताना पूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले की, या उत्सवात पारंपरिक सेंद्रिय पद्धतीच्या शेतीचे रोल मॉडेल प्रत्यक्षात पाहता येणार आहे. देशी बियाणे, जैवीक खत , जैविककिड नियंत्रक प्रक्रिया समजून घेता येणार आहेत. त्यामुळे रासायनिक विषमुक्त अन्न-धान्याकडे टाकलेले ते एक समग्र पाऊल ठरेल. तसेच देशात पहिल्यांदाच देशी प्रजातीच्या गाई ,म्हैशी, बकऱ्या, घोडे, गाढव , कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शन ही भरवण्यात येणार आहे. त्यामुळे देशी जातीच्याप्रजातींचे संगोपन व संवर्धनाची व्याप्ती वाढण्यास मदत होईल. या उत्सवात देशभरातील पारंपारिक वैद्य सहभागी होणार असून लुप्त होणारी भारतीय चिकित्सा पद्धत टिकवण्यासाठी वैद्यांचे संमेलन होणार आहे. भारतीय चिकित्सा पद्धतीचा लाभ ही उत्सवासाठी येणाऱ्या लोकांना घेता येईल .या उत्सवात जगभरातील ५० देशातून नामवंत संशोधक, अभ्यासक आवर्जून या उत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यासह ५०० विद्यापीठांचे कुलगुरू, देशभरातीलहजारो संत-महंत, विविध समाज सेवी संस्था सहभागी होणार आहेत. लाखो लोकांना जेवण, पाणी, आरोग्यविषयक सुविधा पुरवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत विस्तृत परिसरात त्याचे नियोजन करण्यात आले आहे.

असे बोलून स्वामीजींनी उत्सवात सहभागी होणाऱ्या लोकांना काडसिदेश्वर स्वामीजींनी सोबत एक किलो प्लास्टिक कचरा सोबत आणण्याचे आवाहन केले आहे. येथे गोळा होणाऱ्या कचऱ्यापासून रिसायकलिंग युनिट द्वारे त्या कचऱ्याचे पुनर्निमिती प्रक्रिया लोकांना पाहता येणार आहे . यामुळे समाजातील युवकांना एक नवीन दिशा निश्चितच मिळू शकते व या माध्यमातून प्लास्टिक कचऱ्याच्या भीषण समस्यांना एक पर्याय मिळू शकतो.

यावेळी मा.मुख्यमंत्र्यांनी ६५० एकर परिसरात होणाऱ्या सुमंगलम कार्यक्रम स्थळाला भेट दिली. त्यांनी यावेळी पृथ्वी,जल,अग्नी, वायू आणि आकाश या तत्वांच्या गॅलरी, मुख्य सभा मंडप सोबतच सोळा संस्कार, आरोग्य अशा गॅलरीना ही भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी सिद्धगिरी गोशाळा, सिद्धगिरी हॉस्पिटल व सिद्धगिरी गुरुकुलमळा भेट देवून मठाच्या विविध प्रकल्पांची पाहणी केली, व मठावर होणाऱ्या लोकोपयोगी प्रकल्पांचे कौतुक केले. सिद्धगिरी गुरुकुलमच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समोर प्राचीन १४ विद्या व ६४ कलांचे प्रात्यक्षिक सादर केले.ते पाहून मा. मुख्यमंत्र्यांनी अशा अभिनव शिक्षण पद्धतीची आजच्या पिढीला खरी गरज असल्याचे प्रतिपादित केले. यावेळी खा. संजय मंडलिक, आ. प्रकाश अबिटकर, राजेश क्षीरसागार, अमल महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, आयुक्त कादंबरी बलकवडे, सिद्धगिरीचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील, डॉ.संदीप पाटील, शंकर पाटील, माणिक पाटील चुयेकर, प्रताप कोंडेकर, डॉ.विवेक हळदवणेकर, गुंडूवडड, यशोवर्धन बारामतीकर, डॉ.रवींद्र सिंग, मदन कुलकर्णी, प्रल्हाद जाधव, विक्रम पाटील यांच्यासह मठाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्यावरणाचा जागर अन् व्यवसाय, उद्योगाला स्टार्ट अप्
सुमंगल लोकोत्सवात विक्रीसाठी तब्बल हजारावर स्टॉल

पर्यावरण जागृतीचा जागर, सेंद्रिय शेतीचा प्रचार, पंचमहाभुतांच्या महतीचे सादरीकरण, स्वास्थ, शिक्षण आणि कृषी यांच्या आधुनिकीकरणासाठी दिली जाणारी माहिती याबरोबरच छोट्या-मोठ्या उद्योजक, व्यावसायिकांना आपला व्यवसाय व उद्योग वाढीसाठी मोठे व्यासपीठ ‘सुमंगलम लोकोत्सवा’च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी तब्बल हजारावर स्टॉल उभारण्यात आले आहेत. शिवाय दहा हजारांवर व्यावसायिकांचे संमेलन होणार असून त्यांच्या अनुभवाची शिदोरीच नवउद्योजकांना मिळणार आहे.

पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली कणेरी मठ येथे २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’ होत आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तयारीची पाहणी केली. अतिशय चांगली तयारी सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही सूचनाही दिल्या. यामुळे नियोजनाला आणखी गती आली आहे. पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश या पंचमहाभूतांची गॅलरी उभारण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. सहाशे मूर्तींचा वापर करत सोळा संस्कार दाखविण्यात आले आहेत. तेही काम पूर्ण झाले आहे.

पारंपारिक ग्रामीण समाजाला वैज्ञानिक दृष्टीकोन आणि आधुनिक कार्यपद्धतीची माहिती या लोकोत्सवातून देण्यात येणार आहे. पर्यावरण जागृतीबरोबरच युवकांसह सर्वांनाच उद्योग क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक स्टार्टअप प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येणार आहेत. यासाठी दहा हजारावर व्यावसायिकांचे संमेलन होणार आहे. देशभरातील अनेक उद्योजक यामध्ये सहभागी होणार आहेत. उद्योग, व्यवसाय कसा वाढवावा याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत.

सामान्य शेतकरी, व्यावसायिकपासून ते प्रथितयश उद्योजकांनाही त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी मोठे व्यासपीठ या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेती औजारे व इतर उत्पादनांच्या विक्रीसाठी तब्बल हजारावर स्टॉल उभारण्यात आले आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांना उपयोगी पडतील असे छोटी छोटी औजारे येथे उपलब्ध असतील. बियाणांचे स्टॉलही उपलब्ध आहेत. सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू याशिवाय पर्यावरणपूरक वस्तूही येथेही मिळतील. शेतकरी आणि उदयोजकांना राज्य सरकारच्या योजनांची, अनुदानाची माहिती मिळावी म्हणून पन्नासपेक्षा अधिक स्टॉल आहेत. आद्योगिक प्रकल्पांची माहिती देण्यासाठी ‘एमआयडीसी हब’ उभारण्यात आले आहे. युवकांना उद्योग क्षेत्रातील नवनव्या संशोधनाची माहिती मिळावी म्हणून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्या यामध्ये सहभागी होणार आहेत. रोज चार ते पाच लाख लोक या महोत्सवात सहभागी होणार आहेत. यामुळे उत्पादनांना मोठा ग्राहकवर्ग मिळणार आहे. बचत गटाच्या महिलांनाही त्यांच्या वस्तू आणि उत्पादनांच्या विक्रीची सोय करून देण्यात आली आहे.

हा लोकोत्सव व्हावा यासाठी पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामींजींचे प्रयत्न सुरू आहेत, त्यासाठी प्रत्येकाचा यामध्ये सहभाग असावा असे उपक्रम राबविण्यात येत आहेत, या सर्वांना भक्तगण आणि परिसरातील ग्रामस्थांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे! -माणिक पाटील,चुयेकर, संयोजन कमिटी सदस्य

 

हा महोत्सव खऱ्या अर्थाने लोकोत्सव व्हावा यासाठी स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सध्या जो भक्तगणांकडून प्रतिसाद मिळत आहे, तो अतिशय सकारात्मक असल्याने हा उत्सव न भूतो, न भविष्यतो होणार याची खात्री आहे! -डॉ. संदीप पाटील, संयोजन समिती सदस्य

हा महोत्सव खऱ्या अर्थाने लोकोत्सव व्हावा यासाठी स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सध्या जो भक्तगणांकडून प्रतिसाद मिळत आहे, तो अतिशय सकारात्मक असल्याने हा उत्सव न भूतो, न भविष्यतो होणार याची खात्री आहे! डॉ. संदीप पाटील, संयोजन समिती सदस्य

‘लोकसहभागा’ने होणार लोकोत्सव ‘सुमंगलम्’

एक किलो प्लास्टिक कचरा, खराब साड्या, ताट-वाटी-तांब्या देण्याच्या आवाहनाला मिळत असलेला मोठा प्रतिसाद, गावागावातून शिधा जमा करण्यासाठी सुरू झालेली लगबग, उत्सवकाळात रोज तीन-चार लाख भाकरी देण्याचे झालेले नियोजन, बाहेरून आलेले साधुसंत, भक्तगण यांना परिसरातील घराघरात राहण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार, पार्किंग, रस्ते यासाठी शेतकऱ्यांनी खुली करून दिलेली शेती अशा विविध निर्णयासह अनेक उपक्रमातून पंचभूत महोत्सव हा खऱ्या अर्थाने लोकोत्सव होणार आहे. मठाधिपती पूज्यश्री काडसिद्धेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी हजारो हात आणि शंभरावर कमिट्या कार्यरत आहेत.

पर्यावरण वाचविण्याबरोबरच निरोगी पिढी घडविण्यासाठी येत्या २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान पंचभूत महोत्सव होत आहे, तो खऱ्या अर्थाने लोकोत्सव व्हावा यासाठी गेले दोन महिने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या महोत्सवाचे संयोजन कणेरी सिद्धगिरी मठ महासंस्थान करत असले तरी संयोजनातील घटक मात्र केवळ परिसरातील ग्रामस्थच नव्हे तर महाराष्ट्र आणि कर्नाटकसह विविध राज्यातील भक्तगण करत आहेत. हा आमचा लोकोत्सव आहे, ही भावना प्रत्येकांच्या मनात असल्याने दोन महिन्यापासून सारे मनापासून आपलं योगदान देत आहेत. मठावर येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे योगदान या महोत्सवात राहील, यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत, यामुळे हा खऱ्या अर्थाने लोकोत्सव होणार आहे.

महोत्सवादरम्यान सात दिवसात मठावर पन्नास लाखांवर लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे. यामुळे कोणाचीही गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली आहे. रोज पाच लाखांवर लोकांना मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे. यासाठी पत्रावळ्या अथवा प्लास्टिक न वापरण्याचे ठरले आहे. म्हणून भक्तांनी ताट-वाटी आणि तांब्या द्यावे असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार मठावर रोज शेकडो ताट-वाट्या येत आहेत. सुशोभिकरणासाठी जुन्या साड्यांचा वापर करण्यात येत आहे. यासाठी महिलांकडून रोज हजारो साड्या दिल्या जात आहेत. आलेल्या लोकांना रोज काय जेवण द्यायचे, त्यामध्ये आपण कोणता पदार्थ द्यायचा याचा निर्णय गावागावांनी घेतला आहे. याशिवाय प्रत्येक घरातून सात दिवस चार ते पाच लाख भाकरी येणार आहेत. सध्या शिधाही मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. त्यासाठी विविध जिल्ह्यातील संयोजन कमिट्या कार्यरत आहेत.

या उत्सवासाठी पंचवीस राज्यातून भक्तगण येणार आहेत. त्यातील बहुतांशी लोकांच्या राहण्याची सोय परिसरातील गावांत असलेल्या घराघरात करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला आहे. मठावर प्लास्टिक कचऱ्याचे विघटन करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येकांनी एक किलो कचरा आणावा असे आवाहन केले आहे. महोत्सव काळात परिसरात मोठी गर्दी होणार असल्याने रस्ते रूंदीकरण करण्यात येत आहे, त्यासाठी अनेकांनी आपली जमीन दिली आहे. पार्किंगसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी आपले शेत मोकळे करून दिले आहे. रोज शेकडो भाविक सध्या मठाला भेट देत आहेत, त्यामध्ये प्रत्येकाजण ‘स्वामीजी, आम्ही काय देऊ ?’ अशीच विचारणा करत आहेत. काहीजण तर रिकाम्या हाताने न येता काहीना काही वस्तू घेऊनच येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण या महोत्सवात सक्रिय सहभागी होत आहे. हा लोकोत्सव होण्यात प्रत्येकजण खारीचा वाटा उचलत असल्याचे सांगत आहे. यामुळे तो खऱ्या अर्थाने लोकोत्सव होत आहे.

 

हा लोकोत्सव व्हावा यासाठी पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामींजींचे प्रयत्न सुरू आहेत, त्यासाठी प्रत्येकाचा यामध्ये सहभाग असावा असे उपक्रम राबविण्यात येत आहेत, या सर्वांना भक्तगण आणि परिसरातील ग्रामस्थांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे! -माणिक पाटील,चुयेकर, संयोजन कमिटी सदस्य

हा महोत्सव खऱ्या अर्थाने लोकोत्सव व्हावा यासाठी स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सध्या जो भक्तगणांकडून प्रतिसाद मिळत आहे, तो अतिशय सकारात्मक असल्याने हा उत्सव न भूतो, न भविष्यतो होणार याची खात्री आहे! -डॉ. संदीप पाटील, संयोजन समिती सदस्य

You cannot copy content of this page