सिंधुदुर्गातील खड्ड्यातील रस्ते म्हणजे भ्रष्ट कारभाराची झलक!
सिंधुदुर्गातील अनेक रस्ते गायब झाले आहेत आणि खड्डेच शिल्लक राहिले आहेत. रस्त्यांवरून वाहनं चालवायची कशी? हा वाहन चालकांना पडलेला प्रश्न. प्रवास करायचा कसा? प्रवाशांचा सवाल. जीवघेणे खड्डे पडूनही शासन काहीच करीत नाही. रस्ते तयार करायला शासन करोडो रुपयांचा निधी खर्च करते. पण ठेकेदार, प्रशासकीय अधिकारी, राजकीय पुढारी यांच्या संगनमताने कमकुवत रस्ते तयार होतात आणि जनतेचे पैसे ह्यांच्या खिशात जातात. अनेक वर्षे हे सुरु आहे. सरकार कोणतेही असो हा भ्रष्टाचार कोणीही थांबू शकलेला नाही; हे जनतेचे दुर्दैव! अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे नेते किंवा प्रशाकीय यंत्रणा चांगले रस्ते तयार करण्यासाठी काहीच करीत नाही. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार रस्ते तयार करणे आणि रस्ते दुरुस्ती करण्यासाठी जो निधी खर्च केला जातो, त्यातून होतो. म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्र खड्डेमय आहे.
मुंबईसारखे आंतरराष्ट्रीय शहर सुद्धा त्यातून सुटलेले नाही. तर ग्रामीण भागात काय अवस्था असेल? ह्याचा विचार न केलेला बरा! गेल्या दहा वर्षात ज्या ठिकाणी रस्त्यावर निधी खर्च झाला त्या रस्त्यांची आजची अवस्था काय? हे तपासण्याची गरज आहे. महाराष्ट्रात नव्वद टक्के रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. ह्याचाच अर्थ निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार केले गेले आहेत. हे रस्ते ज्यांच्या अधिकारात तयार झाले त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी; पण भ्रष्ट यंत्रणेत ते होत नाही म्हणून पुन्हा पुन्हा रस्त्यावर खड्डे पडतात आणि त्यात लोकांचे जीव जातात. प्रवाशांची शारीरिक हानी-आर्थिक हानी होते. फक्त आणि फक्त ठेकेदार, प्रशासकीय अधिकारी, राजकीय पुढारी यांची आर्थिक परिस्थिती हिमालयासारखी उंचावते.
हे चित्र बदलेल का? जनतेला चांगले रस्ते मिळतील का? ह्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच सोपी नाहीत!
सिंधुदुर्गातील काही रस्त्यांची यादी देत आहोत;
१) असलदे गावठण ते देवगड
२) नांदगाव ते फोंडाघाट
३) कासार्डे ते विजयदुर्ग
४) फोंडाघाट ते वैभववाडी
५) फोंडाघाट ते नरडवे
६) कणकवली ते कनेडी
७) कळसुली ते आंब्रड
८) सांडवे ते कुवळे
९) फोंडाघाट ते कासार्डे
१०) कणकवली ते तरंदळे साळशी
कुवळा ते भरणी ते आयनल ते माईन ते रेंबवली
११) बुधवळे ते खुडी ते कोटकामथे
१२) बुधवळे ते आचरा
१३) कणकवली ते वरवडे
१४) जानवली ते साकेड़ी
१५) हूंबरट ते फोंडा
१६) खारेपाटण ते कुंभवडे
१७) जामसंडे ते विरवाडी, पडेल-कॅन्टिन ते पडेल गाव ते मोंड ते बापार्डे
१८) किंजवडे ते नारींग्रे
१९) जांभवडे – घोडगे – सोनवडे
२०) मालवण कट्टा ते कुडाळ
२१) चौके ते कुडाळ
सिंधुदुर्गात असे अनेक रस्ते आहेत की ज्या रस्त्यांवरून प्रवास करणं म्हणजे वाहनांची बरबादी करणं, शारीरिक-आर्थिक नुकसान करणं आणि कधी कधी जीव घालविणं होय. अशा अनेक दुर्दशा झालेल्या रस्त्यांची प्रत्येकाने यादी बनवावी आणि त्याबाबत संबंधितांना जाब विचारावा!
-विजय हडकर